भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर. मीराताई या बाबासाहेबांच्या सूनबाई, यशवंतराव तथा भय्यासाहेब आंबेडकरांची पत्नी व प्रकाश आंबेडकरांच्या आई. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला धम्म समाजात संवर्धित व्हावा, म्हणून मीराताईंनी आयुष्य वेचले. दया-करूणा सांगणाऱ्या धम्मासाठी कार्य करणाऱ्या मीराताईंच्या धम्मकार्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.
बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमी, दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर मुक्कामी जी ऐतिहासिक धम्मक्रांती केली, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर मानवमुक्तीचा जो लढा पुकारला, त्या लढ्याचे नेतृत्व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आदरणीय भय्यासाहेब आंबेडकर यांनी २१ वर्षे निष्ठापूर्वक केले. दि. १७ सप्टेंबर १९७७ रोजी या लढ्याचे नेतृत्व, म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्याकडे आली.
आदरणीय मीराताई आंबेडकरांनी ज्या वेळेस १९७७ साली भारतीय बौद्ध महासभेची सूत्रे हाती घेतली, त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याची राजकारणाकडे ओढ जास्त होती. पण धम्म चळवळ चालवणे अपेक्षित होते. धम्म चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता गटा-तटाच्या राजकारणामध्ये विभागला गेला होता, त्यामधून त्याला बाहेर काढणे आणि राजकारणविरहित धम्म कार्यांचे धडे देणे, हे अतिशय आव्हानात्मक कार्य मीराताई आंबेडकर यांनी केलेे आहे. तसेच एकंदर आंबेडकर समूहामध्ये धनदांडगे लोक नाहीत, उद्योगपती नाहीत, सरकारचा कुठलही फंड नाही. अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या ताकदीवर, समाजाच्या दानावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विहारे निर्माण झाली/करीत आहेत. हा आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या कुशल नैतृत्वाचा परिपाक आहे. तसेच कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर गेल्यानंतर आहे, त्या परिस्थितीमध्ये आदरणीय ताईसाहेब समाधान मानतात. त्यांची स्वतःसाठी अशी वेगळी विशेष अशी मागणी नसते. अनेक वर्षे त्यांनी स्लीपर कोचने प्रवास केला. शक्यतो महागडा प्रवास त्या टाळतात. हा नेतृत्वाचा गुण म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्ते त्यांची प्रेरणा, आदर्श घेऊन कामात लागलेले आहेत.
आदरणीय मीराताई आंबेडकरांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी जो संघर्ष केला, जो त्याग केला, ज्या जिद्दीने आणि खंबीरपणे त्या लढत राहिल्या, ते प्रशंसनीय आहे. त्यामधून त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले. त्यांच्या नेतृत्वाला धार आली. त्यांचे नेतृत्व हे अष्टपैलू नेतृत्व येणाऱ्या भावी पिढीला व धम्म चळवळीला दीपस्तंभासारखे दिशादर्शक आहे. मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाचे सर्वांत महत्त्वाचे पैलू म्हणजे, आदरणीय ताईसाहेबांचे नेतृत्व सर्व समावेशक आहे. त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दलही भेदभाव नाही. जो काम करेल, त्याग करेल, वेळ देईल, तो आपला. नेतृत्व करताना सर्व निर्णय समाजहितासाठी परिवर्तनीय स्वरूपाचे घ्यावे लागतात. त्या निर्णयाला समाजमान्यता मिळवावी लागते. ते निर्णय लोकाभिमुख असावे लागतात. असा निर्णय घेताना कणखरपणा असावा लागतो. तो कणखरपणा आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये अनेकवेळा पाहायला मिळाला.
उदाहरणार्थ ताईसाहेबांनी सन १९८० च्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये निर्णय घेतला की, राजकारणविरहित धम्मकार्य झाले पाहिजे. ज्याला राजकारण करायचे असेल, त्याला धम्म संस्थेच्या पदावर राहता येणार नाही. या निर्णयामुळे अनेक वरिष्ठ कार्यकर्ते दुखावले गेले. ते ताईसाहेबांच्या विरोधात गेले. त्यांनीच संस्थेमधून बाहेर पडून ताईसाहेबांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल केले. परंतु, आदरणीय मीराताई आंबेडकर डगमगल्या नाहीत. कारण तो निर्णय धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे, असा त्यांचा ठाम निर्धार होता आणि तो निर्धार आज तंतोतंत खरा ठरला आहे.
चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, निर्णय घेण्याचा दूर दृष्टिकोन आहे, तो सर्वागीण परिपूर्ण स्वरूपाचा म्हणजे सम्यक् असला पाहिजे. आपल्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा ताई नेहमीच विचार करतात. तसेच धम्म चळवळ ही खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी झालेली आहे. विज्ञानाशी सुसंगत झाली आहे.
नैतिकता/नितिमत्ता हा फार मोठा गुण आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आहे. कारण आतापर्यंत जे जे निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतले, त्याची अंमलबजावणी आदरणीय ताईसाहेब स्वतःपासून करतात. त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे माता रमाई स्मारकासाठी धम्मदान म्हणून प्रत्येक केंद्रीय पदाधिकारी यांनी पाच हजार रुपये द्यावेत, असे ठरले असताना आदरणीय मीराताई आंबेडकर यांनी त्या पहिल्याच बैठकीमध्ये रु. २५ हजार धम्मदान म्हणून रोख दिले. ही नितिमत्ता आहे. बऱ्याच ठिकाणी नेतृत्व हे घेण्याचे काम करतात. संस्थेचे सभासद होण्याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने दि. १ एप्रिल ते दि. ३१ मार्च या कालावधीत प्रत्येक वर्षाला सभासद झाले पाहिजे. ही संस्थेची आचारसंहिता आहे. आदरणीय मीराताई या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा असूनसुद्धा त्या स्वतः नैतिकता अतिशय काटेकोरपणे जपतात. मुंबई प्रदेशाचा कार्यकर्ता याला आजही ताईसाहेब राजगृहावर बोलावून दि. १ एप्रिलला आदरणीय ताईसाहेब स्वतःसह घरातील 18 वर्षांवरील सर्वांची सभासद पावती घेतात, ही नीतिमत्ता आहे, नैतिकता आहे. हा लाखमोलाचा गुण आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आहे. तथागत भगवान बुद्धांनी गाथेमध्ये सांगितल्याप्रमाणे
न तावता धम्मधरो, यावता बहू भासती
योच अपम्पी सुत्वान,धम्म कायेन पस्सती|
धम्म नैतिकता आदरणीय मीराताई आंबेडकरांच्या आचरणामध्ये आहे आणि नीतिमत्तेच्या जोरावर धम्म चळवळीतील अनेक अडथळ्यांना पार केले आहे. महाउपासिका मीराताई आंबेडकरांनी जे धम्मकार्य केलेले आई येणाऱ्या भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. केंद्रीय प्रशिक्षण विभागाची निर्मिती या माध्यमातून हजारो केंद्रीय शिक्षक/शिक्षिका, बौद्धाचार्य आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाले आहेत आणि आज ते देशभर धम्म प्रचाराचे काम करीत आहेत. ज्या महिलांना कुटुंबामध्ये मत मांडण्याचा अधिकार किंवा बोलण्याचा अधिकार नव्हता, त्याच महिला आज केंद्रीय शिक्षिका म्हणून दहा दिवस शिबिरासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये/प्रांतांमध्ये जातात. तेथील महिलांना धम्म शिकवतात, बोलायला शिकवतात. हे सर्व मीराताई आंबेडकरांमुळे घडले आहे.
(सदर लेख संकलन ॲड. डॉ. एस.के.भंडारे, बी. एच. गायकवाड, ॲड. डॉ. एस. एस. वानखडे यांनी केले आहे.)
9920804333