बुद्धांनी दु:खाचे मूळ सांगितले. ते म्हणाले, आसक्ती आणि मोह यामुळेच माणसाला दुःख मिळते. बुद्धांचे हे विचार किसागौतमीच्या जीवनकथेतून स्पष्ट संदेश देते. किसागौतमी ही गौतम बुद्घांच्या काळातील एक अत्यंत प्रसिद्ध स्त्रीशिष्या होती. तिच्या आयुष्याची कथा मानवी दुःख, आसक्ती आणि सत्याच्या स्वीकाराबद्दल जागृती करते. या लेखात किसागौतमीच्या जीवनाचा सारांश मांडला आहे.
किसागौतमी गरीब घरात जन्मलेली होती. तिचे शरीर खूप बारिक असल्यामुळे तिला किसा (कृश) असे म्हणत. लग्नानंतर ती सासरी आली; पण सुरुवातीला तिच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नव्हते. तिला कमीपणा दिला जात होता. मात्र जेव्हा तिला मुलगा झाला, तेव्हा तिच्या आयुष्यात बदल झाला. तिच्या मुलामुळे तिचा सासरी मान वाढला आणि ती आनंदाने संसार करू लागली. तोच मुलगा तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला. परंतु, नियतीला काही वेगळेच मान्य होते. एके दिवशी तिचा लहान मुलगा आजारी पडला आणि काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. हा आघात किसागौतमीला सहन झाला नाही. तिला हे मान्यच होत नव्हते की तिचा मुलगा आता जिवंत नाही. ती त्याला आपल्या हातात घेऊन गावोगावी फिरू लागली आणि प्रत्येकाला विचारू लागली की, "माझ्या मुलाला जिवंत करण्यासाठी काही औषध आहे का?” लोक तिच्याकडे दयाभावाने पाहात होते; पण कोणीही तिची मदत करू शकत नव्हते. काही लोक तिला वेडी समजू लागले. अखेरीस एका समजूतदार व्यक्तीने तिला गौतम बुद्धांकडे जाण्याचा सल्ला दिला. "ते महान ज्ञानी आहेत, तेच तुला मार्ग दाखवतील,” असे त्या व्यक्तीने सांगितले.
किसागौतमी लगेच बुद्धांच्या भेटीस गेली. तिने त्यांच्या चरणी पडून आपल्या मुलाला जिवंत करण्याची विनंती केली. तिच्या दुःखाची तीव्रता पाहून बुद्धांनी तिला थेट नकार दिला नाही. त्याऐवजी त्यांनी तिला एक वेगळे काम सांगितले. त्यांनी म्हटले, "तू गावात जाऊन अशा घरातून मोहरीचे दाणे आण, जिथे कधीही कोणाचा मृत्यू झाला नाही.” ही अट ऐकून किसागौतमी आशेने गावात निघाली. ती प्रत्येक घरात जाऊन मोहरी मागू लागली. लोक तिला मोहरी द्यायला तयार होते, पण ती एक प्रश्न विचारायची, "या घरात कधी मृत्यू झाला आहे का?” प्रत्येक घरातून तिला एकच उत्तर मिळायचे, "हो, आमच्या घरातही कोणीतरी मरण पावले आहे.”
काही घरांत वडील गेले होते, काहींमध्ये आई, काहींमध्ये मुले किंवा नातेवाईक. प्रत्येक घरात मृत्यूचे दुःख अनुभवले गेले होते. हळूहळू किसागौतमीला समजायला लागले की, मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा अटळ आणि सार्वत्रिक सत्य आहे. या जगात असे एकही घर नाही, जिथे मृत्यूने पाऊल ठेवलेले नाही. तिच्या मनात हळूहळू बदल घडू लागला. ती आपल्या वैयक्तिक दुःखातून बाहेर येऊन जगातील इतर लोकांच्या दुःखाशी जोडली गेली. शेवटी तिला बुद्धांचा संदेश समजला. ती परत बुद्धांकडे आली आणि म्हणाली, "भगवंत, मला आता समजले आहे की मृत्यू हा जीवनाचा भाग आहे. कृपया मला सत्याचा मार्ग दाखवा.”
त्यानंतर तिने आपल्या मुलाचा अंत्यसंस्कार केला आणि बुद्धांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगण्याचा निर्णय घेतला. पुढे ती बुद्धांची शिष्या बनली आणि तिने ज्ञानप्राप्तीचा मार्ग स्वीकारला. किसागौतमीची कथा आपल्याला शिकवते की, जीवनात दुःख अपरिहार्य आहे; पण त्यावर मात करण्यासाठी सत्याचा स्वीकार आणि समज आवश्यक आहे. मृत्यू हा सर्वांसाठी समान आहे आणि त्याचा स्वीकार केल्यानेच मनाला शांती मिळते. मनाच्या शांतीपेक्षा या जगात कुठलेच सुख मोठे नाही.
- योजना ठोकळे