KEM Dean Appointment : केईएमला नवा अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांची वर्णी
— शैक्षणिक अधिष्ठात्यासोबत अतिरिक्त पदभार
01-May-2026
Total Views |
मुंबई : (KEM Dean Appointment) परळ येथील केईएम रुग्णालयात अधिष्ठाता पदावर बदल झाला असून डॉ. संगीता रावत यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ. हरीश पाठक यांच्याकडे शैक्षणिक अधिष्ठात्यासोबत अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. महापालिकेच्या आदेशानुसार ही तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
परळ येथील केईएम रुग्णालय येथे अधिष्ठाता पदावर डॉ. हरीश पाठक यांची वर्णी लागली आहे. विद्यमान अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त होत असल्याने महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त पदभार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पुढील आदेश येईपर्यंत डॉ. पाठक अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. (KEM Dean Appointment)
डॉ. पाठक सध्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नियमित जबाबदाऱ्यांसोबतच अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कारभारही ते पाहणार आहेत. रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात सातत्य राहावे आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रिया सुरळीत सुरू राहावी, यासाठी हा तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (KEM Dean Appointment)
दरम्यान, डॉ. संगीता रावत यांच्या कार्यकाळात रुग्णसेवा आणि शैक्षणिक उपक्रमांना गती मिळाली होती. त्यांच्या निवृत्तीनंतर आता नव्या नेतृत्वाकडून त्याच धर्तीवर कामकाज सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (KEM Dean Appointment)