महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

    01-May-2026
Total Views |
Gautam Buddha
 
मानवतेला समता, करुणा आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे गौतम बुद्ध यांनी स्त्री-पुरुष समानतेचा विचार अडीच हजार वर्षांपूर्वीच मांडला. त्यांनी स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीची समान क्षमता असल्याचे स्पष्टपणे सांगितले. भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका या चारही समुदायांना समान स्थान देत त्यांनी महिलांनाही समाजप्रबोधन आणि धर्मप्रसाराची तितकीच जबाबदारी दिली. इतिहासातील कथांप्रमाणे यशोधरा, विशाखा, मल्लिका आणि आम्रपाली यांसारख्या महिलांनी निर्भयपणे स्त्री-अधिकार आणि समानतेचा मुद्दा मांडल्याची उदाहरणे दिसून येतात. यामुळे महिलांची निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि सामाजिक योगदान दिसते आणि ते त्या काळात स्वीकारले गेले, हेही स्पष्ट होते.
 
बुद्धांच्या या समतेच्या विचारांचा प्रभाव पुढे भारतीय संविधानात दिसून येतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांमुळे आज महिलांना समान हक्क आणि संधी उपलब्ध झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या समतेच्या विचारांना पुढे नेत समाजव्यवस्थेत मोठे परिवर्तन घडवून आणले. याच सम्यक् विचारांच्या आधारावर राज्य शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवत आहे. महिलांना स्वतंत्र निर्णय घेता यावेत, त्यांच्या कुटुंबातील निर्णयक्षमतेत वाढ व्हावी आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त व्हावे, यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना मिळत महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा रोखण्यासाठीही शासन कटिबद्ध आहे.
 
बुद्धांनी दिलेल्या अहिंसा आणि करुणेच्या मार्गावर चालत महिलांसाठी आधार केंद्र, पुनर्वसन केंद्र आणि ‘मनोधैर्य’ योजनेद्वारे मदत केली जाते. ‘कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्या’ची प्रभावी अंमलबजावणी करून महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे काम सुरू आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील ‘लोकुत्तर धर्म’ आणि ‘लोकिय धर्म’ या संकल्पनांचा विचार करून सामाजिक सुधारणा राबविल्या जात आहेत. लिंगभेदविरहित समाजाच्या निर्मितीसाठी गर्भलिंगनिदानावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, मुलींच्या जन्माला आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘माझी कन्या भाग्यश्री’ यांसारख्या योजना प्रभावी ठरत आहेत. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य बालपणापासून रुजवण्यासाठी नावासमोर आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि त्याची यशस्वी अंमलबजावणीही होत आहे.
 
बालविवाह रोखण्यासाठी राज्यात विशेष मोहिमा राबविल्या जात असून महाराष्ट्र या अभियानात आघाडीवर आहे. यशोधरा यांच्या कथेतून महिलांच्या निर्णयक्षमतेचे महत्त्व अधोरेखित होते. त्यांनी बुद्धांना पटवून देत मठात केवळ प्रौढांना प्रवेश असावा, हा निर्णय घडवून आणला. यावरून महिलांमध्ये ठाम विचार आणि निर्णयक्षमता असल्याचे स्पष्ट होते. याच विचारांवर आधारित शासन सुपोषणाकडे वाटचाल करत आहे. एकात्मिक ‘बाल विकास सेवा योजने’द्वारे गर्भवती महिलांपासून ते बालकांपर्यंत पोषण आहार दिला जातो. अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांमार्फत आरोग्य सेवा पुरवली जाते, ज्यामुळे महिलांचे आणि बालकांचे आरोग्य सुधारत आहे. महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय सेवेत आरक्षण देण्यात आले आहे. तसेच, अनाथ बालकांनाही शासकीय सेवेत संधी देऊन सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकूणच, सम्यक् विचार, करुणा आणि समता या बौद्ध मूल्यांवर आधारित राज्य शासनाचे कार्य महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरत आहे. महिलांचा वाढता सहभाग हा राज्याच्या सर्वांगीण विकासाचा मुख्य आधार बनत असून, समताधिष्ठित आणि प्रगत समाजाच्या निर्मितीकडे राज्याची वाटचाल दृढपणे सुरू आहे.
 
- अदिती तटकरे
(लेखिका मंत्री, महिला बालविकास विभाग महाराष्ट्र)
 
शुभेच्छा! जगद्गुरू तथागत भगवान बुद्ध यांच्या २५७०व्या जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ ‘धम्मकीर्तीतील स्त्री’ या विषयावर विशेषांक प्रकाशित करत आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. तथागत बुद्ध यांनी माणसाच्या दुःखमुक्तीसाठी धम्ममार्ग सांगितला असून, त्यांच्या काळापासून स्त्री-पुरुष समानता रुजविण्याचे काम सुरू आहे. तथागत बुद्ध यांच्या काळात भिक्खुणी संघसुद्धा निर्माण केला गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे स्त्री-पुरुष समता प्रस्थापित केली. त्यामुळे स्त्रियांना शिक्षण, नोकरी मिळाली, स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या, ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेत महिला मोठ्या प्रमाणात असून, त्यांचा धम्मकार्यात सिंहाचा वाटा आहे. आजही संपूर्ण जगात महिला संसाराचा त्याग करून बौद्धधम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भिक्खुणी होत आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’ यांनी ‘धम्मकीर्तीतील स्त्री’ म्हणून १५ भिक्खुणी व विचारवंत महिला यांचा विशेष अंक काढून भारतातील स्त्रियांना धम्मकार्य करण्यासाठी प्रेरणा, स्फूर्ती मिळेल आणि धम्मकार्यात महिलांचा सहभाग निश्चितपणे वाढेल. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा! नमो बुद्धाय! जयभीम! जय संविधान!
 
-डॉ. भीमराव य. आंबेडकर, ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’
 
तथागतांचा धम्म जगात सर्वत्र रुजला. याचे कारण, धम्मप्रचारासाठी निःस्वार्थीपणे कार्य करणारा भिक्खू आणि भिक्खुणी संघ.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘धम्मकीर्तीतील स्त्री’ या विशेषांकाद्वारे या वंदनीय भिक्खुणींच्या कार्याचा जागर केला आहे. त्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ला शुभेच्छा.धम्माच्या कार्यात अनेक आदरणीय भिक्खुणींचे कार्य शब्दातीत आहे. महामाया ते आम्रपाली आणि उप्पलवना ते किसा गौतमी सगळ्यांच्या जीवनामध्ये धम्माचे सार सामावले आहे. तत्कालीन समाजरचनेनुसार, जीवन व्यतित करणार्‍या त्या महिला बुद्धाला शरण गेल्या. त्या धम्म जगल्या आणि त्यांच्या प्रेरणेने धम्माचा वारसा निर्माण झाला. २५५० वर्षांनंतरही जगात बौद्ध धम्म शांती आणि करुणेचा वसा घेऊन जगाला दिशा दाखवतो. समाजात विषमताविरहित व्यवस्था निर्माण व्हावी आणि सर्व समाजाचे कल्याण व्हावे, हे धम्माचे तत्त्वज्ञान. या तत्त्वज्ञानानुसारच, समता परिषदेचे कार्य अखंड सुरू आहे. बुद्धांनी दिलेला समतेचा मार्ग आणि अष्टांग मार्ग सामाजिक कार्यात आम्हाला प्रेरणा देतो. तसेच धम्माची करुणेची संस्कृती जगभरात आजही आपले अस्तित्व राखून आहे. त्याचे कारण, ‘धम्मकीर्तीतील स्त्रीशक्ती’! त्याच अनुषंगाने मंगलमयी, त्रिवार वंदन.
 
- विजय भाई गिरकर
(लेखक समता परिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच माजी समाजकल्याण मंत्री आहेत.)
 
आशीर्वाद तथागत बुद्ध यांनी माणसाचे दुःख आणि स्त्री-पुरुष समानतेबाबत काम केले असून, तथागत बुद्ध यांनी धम्म प्रचार-प्रसारासाठी पुरुषांच्या भिक्खू संघाबरोबरच महिलांचा भिक्खुणी संघसुद्धा निर्माण केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाद्वारे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले. धम्मकार्यात महिला मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. आजही संसाराचा त्याग करून बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भिक्खुणी निर्माण होत आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत यांनी ‘धम्मकीर्तीतील स्त्री’ भिक्खुणी व विचारवंत महिला यांचा काढलेला विशेषांक भारतातील स्त्रियांना धम्मकार्य करण्यासाठी, भिक्खुणी होण्यासाठी उपयुक्त होईल. दै. ‘मुंबई तरुण भारत’ यांच्या या उपक्रमाला भिक्खू संघाच्या वतीने मंगलमय शुभेच्छा व आशीर्वाद. नमो बुद्धाय!
 
-भंते बी संघपाल महाथेरो,
बौद्ध महासभा भिक्खू संघप्रमुख ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’