गर्जा महाराष्ट्र माझा!

    01-May-2026   
Total Views |
 
Maharashtra Development History Growth
 
महाराष्ट्राच्या नैतिक आणि आर्थिक विकासाचा रथ आज जागतिक पटलावर स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने महाराष्ट्राच्या तेजस्वी यशोगाथेचा आढावा घेणारा लेख...
 
महाराष्ट्र वीरांची आणि संतांची भूमी. विद्वान आणि दार्शनिक, त्याचबरोबर स्वाभिमानी जनतेचीही भूमी! या देशावर अनेक परकीय आक्रांतांनी आक्रमण केले, त्यांपैकी एक क्रूर औरंगजेब. त्या औरंगजेबाने धर्मांधतेचा उच्छाद मांडला. पण, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या अन्यायी साम्राज्याला सुरुंग लावला. पुढे त्याची कबर या महाराष्ट्रातच गाडण्यासाठीचा पराक्रमी इतिहास, महाराजांनी निर्माण केला. इंग्रजांच्या अत्याचारी राजवटीलाही तितक्याच परिणामकारक पद्धतीने उत्तर देण्यासाठी, पुढे सरसावला तो आपला महाराष्ट्रच! देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात महाराष्ट्रातील किती योद्धे वीरगतीला प्राप्त झाले, याची गणतीच नाही. महाराष्ट्रात तर स्वातंत्र्ययज्ञात स्वतःच्या प्राणाची आहुती देण्ााऱ्यांची स्पर्धा होती. ‌‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच‌’ म्हणणारे लोकमान्य टिळक असू देत की, ‌‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण‌’ असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, किती जणांची नावे घ्यावीत? दुसरीकडे समाजसुधारणेसाठी कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज ते महात्मा फुले ते संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांची कर्मभूमी महाराष्ट्रच!
 
या महाराष्ट्रात जातिपातीचे भेद लांघत, कर्तृत्ववान व्यक्तींनी दिव्य इतिहास घडवला. मग ते आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे असू देत की, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे! एक ना अनेक, ही महापुरुषांची भूमी आहे. माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, माता रमाई आणि ‌‘मेरी झांशी नही दुंगी‌’ म्हणत, इंग्रजांना पळता भुई थोडी करणारी, स्वातंत्र्यासाठी प्राणपणे लढणारी राणी लक्ष्मीबाई याच भूमीतली. पुण्यलोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य आणि जीवन तर जगभरातल्या स्त्री-पुरुषांसाठी दीपस्तंभच! महाराष्ट्राच्या मातीतच ही रत्ने जन्मली. महाराष्ट्राने नेहमीच पुरोगामित्वाची भूमिका घेतली. ही भूमिका जशी विचारांची होती, तशीच विकासाचीही होती. अखंड भारताच्या शाश्वत कल्याणासाठी, महाराष्ट्राने नेहमीच योगदान दिले. देशाच्या राजधानीलाही गरजेच्या वेळी विश्वास वाटेल, असे राज्य म्हणजे महाराष्ट्र! म्हणूनच, शाहीर साबळे म्हणाले आहेत, ‌‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!‌’
 
महाराष्ट्राच्या इतिहासाचा जागर यासाठी की, आज महाराष्ट्र विकासाच्या परिप्रेक्ष्यात उत्तुंग झेप घेत आहे. दि. १ मे १९६० ते दि. १ मे २०२६ याकाळात महाराष्ट्राचा नैतिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून, महाराष्ट्र नावाचे नवे शासकीय राज्य स्थापन झाले. अर्थातच, ही प्रशासकीय व्यवस्था होती. महाराष्ट्राचे अस्तित्त्व अनादीकाळापासून असल्याचे दाखले आहेतच.
 
तर, महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आणि भूमिपुत्र मराठी माणसाला हक्काचा आवाज मिळाला. राज्य प्रशासनाद्वारे त्याचे अस्तित्व सुरक्षित आणि संवर्धित झाले. विकासाची गती किती मोजावी? तर, देशभरातल्या कोणत्याही कोपऱ्यात जा, मग ते छत्तीसगढचे दुर्गम जंगल असू दे की, तामिळनाडूचे गाव, किंवा प. बंगालचे शहर किंवा काश्मीरच्या बर्फाळ प्रदेशातील गाव, कुठेही गेले तरी असे लोक सापडतात ज्यांना महाराष्ट्रात यायचे आहे, मुंबई-पुण्यात वसायचे आहे, महाराष्ट्राचे गड-किल्ले आणि अथांग सागरकिनारे पाहायचे आहेत. त्यांना कोकणची लाल माती ‌‘याची देही याची डोळा‌’ पाहायची आहे आणि मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते उत्तर महाराष्ट्र अशा महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांत जाऊन, तिथली खानपान संस्कृती अनुभवायची आहे.
 
२०१४ नंतर तर महाराष्ट्राचा विकासरथ अधिकच गतिमान झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. यात पायाभूत सुविधा आणि दळणवळण क्षेत्रात क्रांतीच झाली. त्यामध्ये ‌‘समृद्धी महामार्ग‌’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. मुंबई, नागपूर, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रो प्रकल्प, मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा ‌‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक‌’, ‌‘मिसिंग लिंक‌’, दुसरीकडे ‌‘मॅग्नेटिक महाराष्ट्र‌’ या उपक्रमांतर्गत परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यातही महाराष्ट्र आघाडीवरच राहिला. उद्योगांसाठीच्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारली. महाराष्ट्र उत्पादन आणि निर्यातीत देशात आजही आघाडीवर आहे. ग्रामीण भागात दिवसा १२ तास वीज पुरवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात सौर प्रकल्प आणि कृषी पंपांचे धोरणही महाराष्ट्राने राबवले. त्याचबरोबर राज्यातील दुष्काळी भाग सिंचनाखाली आणण्यासाठी, नदीजोड योजनांना चालना दिली. राज्यातील अनेक शहरांना ‌‘स्मार्ट‌‘ करण्यासाठी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली.
 
दुसरीकडे महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्यांचाही समाचार घेतला. यात, नक्षलमुक्तीकडे महाराष्ट्राची वाटचाल महत्त्वाची. नक्षली हिंसक कारवाया, तसेच शहरी नक्षलवाद्यांमुळे राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, सध्या महाराष्ट्रात नक्षलवाद शेवटची घटका मोजत आहे. अंधश्रद्धा आणि धर्मांतरणासारख्या मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने, स्वतःमध्ये सकारात्मक बदल केला. ‌‘लव्ह जिहाद‌’, ‌‘ड्रग्ज जिहाद‌’,‌‘लॅण्ड जिहाद‌’,‌‘कॉर्पोरेट जिहाद‌’ विरोधातही महाराष्ट्र एकत्रितपणे लढत आहे. सध्या महाराष्ट्राचा लढा सुरु आहे, तो नशामुक्त महाराष्ट्रासाठी! त्यासाठी विविध स्तरांवर कार्य सुरू आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नशेचा व्यापार करणाऱ्यांविरोधात, ‌‘झिरो टॉलरेन्स‌’ची भूमिका घेतली आहे. त्यानुसार,
 
गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई : ‌‘ड्रग्ज-तस्करी‌’मध्ये सामील असलेल्यांवर ‌‘मकोका‌’अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
मालमत्ता जप्ती : अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू.
 
ॲन्टी नार्कोटिक टास्क फोर्स : राज्यात ड्रग्जविरोधी कारवाया अधिक प्रभावी करण्यासाठी ‌‘ॲन्टी नार्कोटिक टास्क फोर्स‌’ची स्थापना.
 
पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई : ‌‘ड्रग्ज-तस्करां‌’शी संबंध आढळल्यास, पोलीस कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचेआदेश.
 
ड्रग्ज-फ्री कॅम्पस : शिक्षणसंस्थांची प्रांगणेकॅम्पस नशामुक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम.
 
आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर कारवाई : मुंबई आणि महाराष्ट्रातील ड्रग्ज नेटवर्कची साखळी उद्ध्वस्त करणे.
 
नायजेरियन नागरिकांवर कारवाई : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि ड्रग्ज व्यवसायात सामील असलेल्या नायजेरियन नागरिकांवरील कारवाई तीव्र.
 
पोलिसांवर कडक कारवाई : ‌‘ड्रग्ज-तस्करी‌’त थेट सहभागी आढळल्यास पोलीस कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश आणि कार्यवाहीही.
 
याच परिप्रेक्ष्यात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ‌‘मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज‌’ मोहीम, तसेच ‌‘नशामुक्त मुंबई समाजशक्ती अभियान‌’ सुरू केले. दि. १ मे २०२६ ते दि. १ मे २०२७ असे वर्षभर हे अभियान राबवले जाणार असून, दि. १ मेच्या पवित्र दिवशी विश्वास वाटतो की, महाराष्ट्र या लढ्यातही जिंकेल. ‌‘नक्षलमुक्त महाराष्ट्र ते नशामुक्त महाराष्ट्र‌’ हे सत्यात उतरणारे स्वप्न आहे. महाराष्ट्र ही लढाई पुन्हा जिंकणार आहे. गर्जा महाराष्ट्र माझा!
 
9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.