धार्मिक कट्टरता किंवा उन्मादातून परधर्मियांवर हल्ले करण्याच्या घटना जगभर वाढत चालल्या आहेत. मिरा-भाईंदरमधील धक्कादायक घटनेनंतर लंडनमध्येही दोन ज्यू व्यक्तींची नुकतीच हत्या झाली. युरोपमध्ये गर्दीच्या ठिकाणी पादचार्यांच्या अंगावर गाडी घालून, त्यांच्याही हत्या करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यातील चिंतेची बाब म्हणजे, हे हल्ले एकट्यादुकट्या व्यक्तीकडून केले जात असून, ते केव्हा व कुठे होतील, याचा अंदाज बांधणे अवघड.
मिरा रोडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दोन सुरक्षारक्षकांवर, एका तरुणाने केलेला हल्ला हा भावी काळातील अशा हल्ल्यांची नांदी म्हणावी लागेल. झैब झुबेर अन्सारी असे नाव असलेला हा तरुण उच्चशिक्षित असून, तो अमेरिकेत नोकरी करीत होता. काही महिन्यांपासून तो येथे भाड्याच्या घरात एकटाच राहात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याचे महत्त्व व गांभीर्य अशासाठी आहे की, हा हल्ला काही वैयक्तिक वैमनस्यातून वा लुटालुटीच्या हेतूने केलेला नव्हता, तर तो धार्मिक उन्मादातून केला गेला होता. या सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्यापूर्वी झुबेरने त्यांना त्यांचा धर्म विचारला आणि इस्लामचा ‘कलमा’ म्हणून दाखविण्यास सांगितले. हा ‘कलमा’ पाठ नसल्याने, त्याने या दोन्ही सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. याचा अर्थ, हा हल्ला पहलगाममध्ये गतवर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची थेट पुनरावृत्ती होती, असे दिसते. गतवर्षी दि. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी, पर्यटनाचा आनंद घेणार्या २५ हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि ‘कलमा’ पढता न आल्याने गोळी घालून ठार केले. या दोन हल्ल्यांतील फरक इतकाच की, मिरा रोडचा हल्ला एकट्या व्यक्तीने केला होता.
मुंबईसारख्या महानगराजवळ अशाप्रकारचा हल्ला होणे, ही गंभीर व चिंताजनक घटना म्हणावी लागेल. मुंबईत जगातील सर्व धर्माचे लोक राहतात आणि कामानिमित्त येत-जात असतात. तेथे आता कट्टर धार्मिकतेच्या भावनेने भारलेल्या व्यक्तींकडून हल्ले होत असतील, तर ती सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हटली पाहिजे. कारण, अशी व्यक्ती कधी, कुठे व कोणावर हल्ला करील, त्याची काहीच कल्पना करता येणार नाही. यापूर्वी, मुंबईजवळ भिवंडीत आणि त्याच्यापासून जवळच असलेल्या पडघा येथे, ‘इसिस’ या कट्टरपंथीय संघटनेने आपले जाळे पसरल्याचे उघडकीस आले होते. पडघा येथे तर संपूर्ण गावच ‘इसिस’ने आपल्या कट्टरपंथी अनुयायांनी भरून टाकले होते. या संघटनेने तर पडघ्याचे नावही इस्लामी केले होते. ज्या शहरांमध्ये मुस्लिमांची वस्ती आहे, त्या वस्त्यांमध्ये आजकाल बिगर-मुस्लिमांचे येणे-जाणे जवळपास थांबले आहे. अनेकदा पोलीसही अशा वस्त्यांमध्ये जाण्याचे धाडस करीत नाहीत. याचाच गैरफायदा घेत, या वस्त्यांमध्ये देशी व विदेशी कट्टरपंथी संघटना शिरकाव करतात आणि आपल्या दहशतवाद्यांना तेथे आश्रय देतात. अशा वस्त्यांतील मशिदींमध्ये बेकायदा हत्यारेही साठवून ठेवली जातात. दंगलीच्या वेळी या हत्यारांचा पुरवठा होतो. हरियाणातील नूंहमधील दंगल असो की, उत्तर प्रदेशातील संभलमधील दंगल असो, दंगलखोरांना मशिदींमधूनच हत्यारांचा आणि दगडांचा पुरवठा केला जातो, हे वेळोवेळी दिसले आहे. बांगलादेशातून येणार्या घुसखोरांसाठी, मुस्लीमबहुल भागातील मशिदी ही सुरक्षित आश्रयस्थाने बनली आहेत. तेथे त्यांना आश्रय तर मिळतोच पण, स्थानिक असल्याची कागदपत्रेही तयार करून मिळतात.
भारतात वाढत चाललेला ‘लव्ह जिहाद’देखील, अशाच एकट्यादुकट्या धार्मिक कट्टरपंथीयांकडून होत चाललेल्या हल्ल्याचाच एक भाग आहे. फरक इतकाच की, या प्रकारात हिंसाचार होत नाही पण, हिंदू तरुणींना मोह आणि आमिषाला बळी पाडून त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. क्वचितप्रसंगी त्यांना परदेशात ‘इसिस’च्या तळांवर विकलेही जाते. महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर, परभणी वगैरे अनेक शहरांमध्ये अशा घटना उघड होत चालल्या आहेत. त्यामुळे वैयक्तिक जिहाद हाही संघटित जिहादचाच एक भाग बनविला गेला की काय, अशी शंका निर्माण होते. दोनच दिवसांपूर्वी उत्तर लंडनमध्ये एका इसमाने, दोन ज्यू व्यक्तींना भोसकल्याची घटना सामोरी आली होती. ते ज्यू होते, केवळ याच कारणास्तव त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात झाला होता. यापूर्वी, युरोपच्या अनेक देशांमध्ये गर्दीच्या ठिकाणी पादचार्यांची मोटारगाडीखाली चिरडून, हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लंडनमध्येही अशा एकट्यादुकट्या व्यक्तीकडून (लोनवूल्फ अटॅक)काहीजणांना भोसकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
मिरा रोड काय की, लंडन काय, यातील हल्लेखोरांच्या मानसिकतेत काही फरक नाही. तसेच विकसित देश असो की विकसनशील, दोन्ही देशांतील कोणत्याही शहरांमध्ये अशाप्रकारचे हल्ले होऊ शकतात, हेच यातून दिसून येते. म्हणजेच, वैयक्तिक कट्टरपंथीय होण्याची साथ जगभरच पसरल्याचे दिसते. एरव्ही, ‘दहशतवाद्याला धर्म नसतो’ म्हणणार्यांनीही अशा हल्ल्यांचा निषेध केलेला नाही. सर्व मुस्लीम कट्टरपंथी नसतात, असे सांगणे सोपे आहे पण, या साध्या मुस्लीम नागरिकांकडूनही अशा हल्लेखोरांचा कधी निषेध केला जात नाही. दिल्लीतील उत्तमनगर या वसाहतीत होळीच्या दिवशी दीपककुमार नावाच्या एका निरपराध तरुणाची, काही मुस्लिमांनी क्षुल्लक कारणावरून हत्या केली. हे हल्लेखोर कोणत्याही दहशतवादी संघटनेचे दहशतवादी नव्हते, तर ते त्याच परिसरातील नागरिक होते. पण, त्यांचा निषेध किती मुस्लिमांनी केला? किती मशिदींच्या इमामांनी उघडपणे या हत्येचा निषेध केला? यावरूनच अशा कट्टरपंथीयांना मुस्लीम धर्मगुरूंचा पाठिंबा असल्याची भावनाही तयार होते.
कट्टर इस्लामी संघटनांकडून निरपराध बिगर-मुस्लिमांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याच्या, बॉम्बस्फोट घडविण्याच्या घटना आजवर घडत होत्या. मात्र, सर्वच देशांनी अशा संघटनांवरील पाळत वाढवून आणि आपल्या गुप्तहेर संस्थांकडून माहिती मिळविली आहे. परिणामी, अशा संघटनांकडून होणारे हल्ले कमी होत चालले आहेत. त्यामुळे आता एकेकट्या व्यक्तीकडून, बिगर-मुस्लिमांची हत्या करण्याचे नवे षड्यंत्र तर रचले गेले नाही ना? अशी शंका येते. आज ‘महाराष्ट्र दिन’ आहे. यासारख्या विशेष दिवशी, मुद्दामच घातपाती कारवाया करण्याची दहशतवादी संघटनांची सवय असते. आता वैयक्तिक हल्लेखोरांपासूनही सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. या वैयक्तिक कट्टरपंथीयांच्या हल्ल्यांमुळे सामाजिक सलोख्याला मोठा धक्का पोहोचला आहे, ही सर्वांत दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल.