करूणामयी उपासिका सुजाता

    01-May-2026
Total Views |
Sujata & Gautam Buddha
 
अनेक उपासिकांनी बौद्ध धम्म समृद्ध केला. आपले जीवन समृद्ध व सुखी करत असताना तथागतांना शरण जाऊन त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. याअनुषंगाने तथागतांच्या आत्मज्ञानप्राप्तीमध्ये सुजाताने महत्त्वाची भूमिका निभावली. सुजाताचे करुणामयी वर्तन हे मानवी मूल्यांची परिभाषा स्पष्ट करते. धम्मप्रवासात उपासिका सुजाताचे योगदान या लेखात विशद केले आहे.
 
सर्व ऐहिक सुख पायाशी लोळण घेत असताना राजकुमार सिद्धार्थ यांनी जगाच्या कल्याणासाठी व आत्मज्ञानप्राप्तीसाठी राजगृहाचा, आदर्श पत्नी यशोधरा व लहानगा पुत्र राहुल यांचा त्याग केला. आत्मज्ञानप्राप्तीच्या पथावर त्यांनी प्रवास सुरू केला. सहा वर्षांच्या या खडतर प्रवासामध्ये त्यांना अनेक अडथळे आले. त्यांनी अनेक प्रकारच्या ध्यान साधना केल्या. सुमारे ४९ दिवस त्यांनी अन्नत्याग केला. याकाळात त्यांची प्रकृती अत्यंत कृश झाली. या अवस्थेत त्यांना पुढील तपश्चर्या करणे जवळजवळ अशक्य झाले होते. परंतु, ज्ञानप्राप्तीचा त्यांचा निश्चय दृढ होता. बुद्धगयेमध्ये सेनानी गावातील वटवृक्षाखाली त्यांची अखंड तपश्चर्या चालू होती. त्याच वेळेस एक अलौकिक घटना घडली. यास कारणीभूत ठरली सुजाता सेनानी.
 
सुजाता ही बोधगया (उरुवेला) येथील सेनानी गावच्या एका सधन जमीनदाराची मुलगी होती. वटवृक्षासमोर तिने एक इच्छा प्रकट केली होती. तिचा विवाह एका चांगल्या परिवारात होवो व पुत्ररत्नाची प्राप्ती होवो. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर, नवस फेडण्यासाठी त्या वटवृक्ष देवतेस विशेष भोजन दरवर्षी अर्पण करू, असा तिचा संकल्प होता. सुजाताचे लग्न एका सज्जन गृहस्थांशी होते व पुढे तिला पुत्रप्राप्ती होते. आपला संकल्प पूर्ण झाल्यावर तिने वटवृक्ष देवतेला तांदूळ, दूध व साखर घालून खीर तयार केली व मोठ्या श्रद्धेने ती खीर अर्पण करण्यासाठी नेरंजना नदीच्या काठी असलेल्या विशाल वटवृक्षाजवळ गेली. तेथे सिद्धार्थ अखंड तपश्चर्या करत होते. त्यांनी अनेक दिवस अन्नत्याग केला होता. त्यांची प्रकृती अतिशय कृश झाली होती. पण, संकल्प दृढ होता. ज्ञानप्राप्तीच्या मार्गात त्यांच्या शरीराचा कृशपणा आडवा येत होता. त्याच काळात सुजाता त्या विशाल बोधीवृक्षाजवळ आली व तेथे तपश्चर्या करत असलेल्या सिद्धार्थांना तिने मनोभावे खीर अर्पण केली. सिद्धार्थांनी ती खीर प्राशन केली आणि ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुकर झाला. सिद्धार्थांना मध्यम मार्ग मिळाला. ज्ञानप्राप्तीसाठी शरीरास तीव्र यातना द्यायची गरज नाही. सुजाताने दिलेल्या खिरीमुळे सिद्धार्थांची पुढील तपश्चर्या सुकर झाली आणि त्यांना बोधीवृक्षाखाली अलौकिक अशी आत्मज्ञानप्राप्ती झाली.
 
या घटनेस आज अडीच हजारपेक्षा जास्त वर्षे झाली. जगात दु:ख आहे, हे सत्य आहे. पण, या दु:खावर मात ‘अष्टांग’ मार्गाने होऊ शकते, याचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले. पुढे सुमारे ४५ वर्षे त्यांनी लाखो अनुयायांना सुखी, सार्थक जीवनाचा मार्ग दाखविला. हा मार्ग फक्त भिक्खूंसाठीच नव्हता, तर तो समस्त समाजासाठी होता. या सर्वांसाठी तथागतांच्या जीवनात सुजाताने केलेले खीरदान महत्त्वाचे ठरले.
 
सुजाताच्या या अन्नदानाचे अनेक गहन अर्थ निघतात :
 
१) करुणा आणि उदारता :- हे दान नि:स्वार्थ होते. करुणा हा बौद्ध धर्माचा आत्मा आहे.
 
२) आध्यात्मिक यात्रेत ज्ञानप्राप्तीसाठी अन्नत्याग करून आत्मत्याग करण्याचा मार्ग तथागतांनी सोडला व त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला.
 
३) सर्व प्राणिमात्रांमध्ये सौहार्दाचे संबंध असावे, त्यामध्ये भेदभाव नसावा; हा संदेश सुजाताच्या कृतीतून मिळतो.
 
तथागतांच्या उपदेशांनी प्रभावित होऊन आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात सुजाता ‘भिक्खुणी’ झाली. धम्मप्रसाराचे कार्य करत सुजाताने आपली जीवनयात्रा वैशालीजवळील एका बुद्धविहारात संपवली. बौद्ध साहित्यात सुजाताला मानाचे स्थान आहे. सुजाताचा उल्लेख ‘थेरोगाथा’मध्ये आहे. जीवनाच्या शेवटापर्यंत ती धम्मप्रसार करत राहिली. थोर उपासिका सुजाता हीस त्रिवार प्रणाम!
 
 -  डॉ. मिलिंद शेजवळ