ज्ञानभारतम्‌‍ : भारतीय पारंपरिक ज्ञान उजेडात आणणारा प्रकल्प

    01-May-2026
Total Views |
Dnyan Bharatam Manuscripts India
 
प्राचीन काळापासून भारतीय ज्ञानशाखांनी समाजाला दिशा दिली. यामुळेच जीवनातील शाश्वत विकासाचा विचार टिकून राहिला. मौखिक परंपरेच्या माध्यमातून हा ज्ञानविचार इथल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग झाला. हस्तलिखितांच्या माध्यमातून तत्कालीन समाजजीवनाचा विचार अनेकांनी नोंदवूनही ठेवला. हाच इतिहास जपण्याच्या उद्देशाने हस्तलिखितांचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारने ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राच्या सर्वेक्षण मोहिमेत केवळ २० दिवसातच दोन लाखांहून अधिक दुर्मिळ हस्तलिखिते सापडली. आज ‌‘महाराष्ट्र दिना‌’च्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या महत्त्वाचा घेतलेला मागोवा...
 
भारताला पारंपरिक ज्ञानाचा फार मोठा वारसा लाभलेला असून, बौद्धिक व सांस्कृतिक स्वरूपातील हे पारंपरिक ज्ञान, पिढी दरपिढी प्रसारित होत आले आहे. पूर्वी, हे ज्ञान गुरूकडून शिष्याकडे, मौखिक परंपरेच्या माध्यमातून प्रसारित होत असे. कालौघात लिहिण्याचा शोध लागला आणि हे ज्ञान हस्तलिखितांद्वारे प्रसारित होऊ लागले. भारतीय ज्ञानाच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा सांगणारी ही हस्तलिखिते आजही देशभर उपलब्ध असली, तरीही सर्व हस्तलिखिते ही जागोजागी विखुरलेल्या स्वरूपात आहेत. सदरील हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करून, ते एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. म्हणूनच, यादृष्टीने भारत सरकारने ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ या प्रकल्पाची आखणी केली. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, ‌‘डिजिटायझेशन‌’ व प्रसार करणे हा आहे.
 
‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ या प्रकल्पाची घोषण दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याकरिता भारत सरकारकडून सुमारे ४९१ कोटी इतका निधीही मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दि. १६ मार्च २०२६ पासून प्रारंभही करण्यात आला.
 
भारतीय ज्ञानपरंपरेत हस्तलिखितांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हस्तलिखिते म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या जुन्या पोथ्या. परंतु, हस्तलिखितांचे विश्व हे अफाट आणि सर्वसमावेशक आहे. धार्मिक ज्ञान, तत्त्वज्ञानाबरोबरच विज्ञानाच्या क्षेत्रातही हस्तलिखितांचे योगदान अतुलनीय असेच. ‌‘आयुर्वेदा‌’विषयीच्या हस्तलिखितांमध्ये वनस्पतीशास्त्राबरोबरच शरीरशास्त्र व उपचार पद्धतीविषयीचीही तपशीलवार माहिती आपल्याला आढळते. तसेच खगोलशास्त्र, वास्तुशास्त्र यासंबंधीच्या हस्तलिखितांतून, तर तत्कालीन भारतीय ज्ञान हे काळाच्या किती पुढे होते, हेच अधोरेखित होते. याबरोबरच संगीत, नृत्य व नाट्यशास्त्र या विषयांवरही काही हस्तलिखिते प्रकाश टाकतात. योगासनांवर भाष्य करणाऱ्या हस्तलिखितांचा संदर्भ तर आजच्या काळातही तितकाच लागू पडतो. संख्याशास्त्र, गंधशास्त्र, पाककला अशा विषयांची हस्तलिखिते, आज संदर्भ साधने म्हणून वापरण्यात येत आहेत.
 
भारतात आढळणाऱ्या जवळजवळ सर्वच प्रमुख भाषांमध्ये ही हस्तलिखिते आढळून येतात. तसेच ती ‌‘ब्राह्मी‌’, ‌‘खारोष्टी‌’, ‌‘पाली‌’, ‌‘देवनागरी‌’, ‌‘मोडी‌’, ‌‘शारदा‌’ इत्यादी अनेकविध लिप्यांमध्येही आढळून येतात. ज्ञानाचा हा अफाट खजिना, आजवर जवळजवळ दुर्लक्षितच राहिला आहे. हे ज्ञान एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता यावे, म्हणूनच ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याकरिता हस्तलिखिते ही कमीत-कमी ७५ वर्षे जुनी असणे आवश्यक असून, ती पारंपरिक ज्ञानाशी संबंधित असावीत.
 
‌‘केंद्रीय अर्थसंकल्प - २०२५’मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था, तसेच खासगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून, तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचाही केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खासगी संग्राहक यांचीच राहणार असून, कोणाला स्वखुशीने सदरील हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करावयाची झाल्यास शासन ती स्वीकारणार आहे.
 
हा प्रकल्प एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात भारतभर विखुरलेल्या या हस्तलिखितांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे हस्तलिखितांची संख्या, त्यांची भाषा व लिपी, त्यांची अवस्था, त्यांचे ठिकाण अशी माहिती एकत्र केली जाणार आहे. यामुळे हस्तलिखितांच्या संख्या समजण्याबरोबरच, त्यांचे ‌‘जिओ मॅपिंग‌’ही करण्यात येणार आहे.
 
तद्नंतरच्या टप्प्यात या सर्व हस्तलिखितांचे ‌‘डिजिटायझेशन‌’ करून ती ‌‘राष्ट्रीय डिजिटल संग्रहा‌’वरही ‌‘अपलोड‌’ करण्यात येणार आहेत. ‌‘डिजिटायझेशन‌’ करण्याचा सर्व खर्च केंद्र सरकारच करणार आहे. शेवटच्या टप्प्यात जीर्ण झालेल्या हस्तलिखितांचे, केंद्र शासनातर्फे संवर्धनही करून देण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये हस्तलिखितधारकाला कोणताही खर्च करावयाचा नसून, शासन त्यांच्या हस्तलिखितांचे मोफत संवर्धन करून देणार आहे.
 
महाराष्ट्रात ही हस्तलिखिते हिंदू मंदिरे, जैन मंदिरे, मठ; शासकीय, तसेच विविध विद्यापीठांची ग्रंथालये, शासकीय व अशासकीय वस्तुसंग्रहालये, वैयक्तिक संग्रह अशी विविध ठिकाणी विखुरलेली आहेत. या सर्व ठिकाणच्या हस्तलिखितांची माहिती एकत्र करणे, हे एक मोठेच आव्हान आहे.
 
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असून, त्याकरिता मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‌‘राज्यस्तरीय ज्ञानभारतम्‌‍ समिती‌’ची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, मराठी भाषा विभाग व महसूल विभाग यांच्याकडून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ‌‘राज्य नोडल संस्था‌’ म्हणून सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत ‌‘पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई‌’ या कार्यालयाची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेत, तर, अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था, तथा अभिजात मराठी भाषा कक्ष, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तसेच राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये, तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याचबरोबर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्था, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र या केंद्र शासनाच्या संस्थांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.
 
तसेच महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत ः
  • कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर क्लस्टर केंद्र
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे क्लस्टर केंद्र
  • आनंद आश्रम संस्थान, पुणे- स्वतंत्र केंद्र
  • भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे स्वतंत्र केंद्र
स्वतंत्र केंद्रांचे काम हे त्यांच्या स्वतःकडील हस्तलिखितांचे केंद्र शासनाकडून ‌‘डिजिटायझेशन‌’ करून घेणे हे असून, ‌‘क्लस्टर‌’ केंद्रांची भूमिका ही त्यांच्या स्वतःकडील हस्तलिखितांचे ‌‘डिजिटायझेशन‌’ करण्याबरोबरच, महाराष्ट्रातील हस्तलिखिते धारण करणाऱ्या इतर संस्थांचेही सर्वेक्षण करून ‌‘डिजिटायझेशन‌’ करून घेणे, अशी दुहेरी आहे.
 
महाराष्ट्रात हस्तलिखिते जशी विविध संस्थांकडे आहेत, तसेच ती वैयक्तिक संग्राहकांकडेही आढळून येतात. विविध पंथांच्या अनुयायांच्या घरी, विविध प्रकारच्या पोथ्या व इतर हस्तलिखिते सापडतात. या सर्व हस्तलिखितांचे सर्वेक्षण होणे आवश्यक असल्याने केंद्र शासनाने ‌‘हर घर दस्तक‌’ ही योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील घराघरांत हस्तलिखितांचा शोध घेण्यात येणार आहे. ही जबाबदारी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून, ग्राम महसूल अधिकारी यांना देण्यात आली असून, गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शालेय विद्याथ, राष्ट्रीय कॅडेट कोर, राष्ट्रीय सेवा योजना यांचे विद्याथ, सार्वजनिक मंडळे यांच्या साहाय्याने हे कार्य पार पाडले जाणार आहे.
 
सदर सर्वेक्षणासाठी ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ प्रकल्पांतर्गत ‌‘Gyan Bharatam' हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. हे ॲप्लिकेशन ‌‘ॲपल ॲप स्टोअर‌’ व ‌‘गुगल प्ले स्टोअर‌’वर सहज उपलब्ध असून, त्यामध्ये हस्तलिखित धारकांचे नाव, पत्ता, हस्तलिखितांची संख्या, त्यांची छायाचित्रे अशी मोजकीच माहिती भरावयाची आहे. हे ॲप्लिकेशन कोणीही व्यक्ती ‌‘डाऊनलोड‌’ करू शकते व आपल्याकडील हस्तलिखितांची माहिती त्यावर ‌‘अपलोड‌’ही करू शकते.
 
तसेच ॲड. आशिष शेलार, मंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून, विविध स्तरावर ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ प्रकल्पासंबंधी बैठका घेण्यात येत आहेत. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडूनही संस्थात्मक व वैयक्तिक स्तरावर याचा पाठपुरावा सुरू आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे; तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खासगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील हस्तलिखितधारक संस्था व व्यक्तींनी आपल्याकडील हस्तलिखितांची माहिती या ‌‘ज्ञानभारतम्‌‍‌’ ॲप्लिकेशनवर ‌‘अपलोड‌’ करावी व या राष्ट्रकार्यात सहभाग नोंदवावा. त्यामुळे इतकी वर्षे अंधारात असलेला ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला होईल.
 
सुजितकुमार उगाले