बौद्ध धर्माच्या इतिहासात अनेक भिक्खू आणि भिक्खुणींनी आपल्या ज्ञान, साधना आणि धर्मप्रसारामुळे विशेष स्थान मिळवले आहे. त्यांपैकी एकूण १३ भिक्खुणींना धम्मप्रसारात ‘अग्र’ अशी उपाधी मिळाली होती. त्यांपैकी एक धम्मदिना भिक्खुणी होत्या. त्यांच्या जीवनाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
धम्मदिना या अत्यंत विदुषी, तत्त्वज्ञानी आणि आदर्श साधिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि सखोल धर्मज्ञानामुळे त्यांना बौद्ध परंपरेत विशेष स्थान प्राप्त झाले आहे. धम्मदिना या सुरुवातीला एक गृहिणी होत्या. त्यांचे पती विश्वाख (किंवा विशाख) नावाचे एक श्रीमंत व्यापारी होते. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत होते. एके दिवशी त्यांच्या पतीवर गौतम बुद्ध यांच्या शिकवणीचा प्रभाव पडला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी पुढे भिक्खू जीवन स्वीकारले आणि अध्यात्माच्या मार्गावर प्रगती केली. पतीच्या या निर्णयाचा धम्मदिनांवरही खोल परिणाम झाला. त्यांनीही संसारातील मोह-माया सोडून बौद्ध भिक्खुणी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संघात प्रवेश करून कठोर साधना, ध्यान आणि अध्ययनाला सुरुवात केली. त्यांच्या चिकाटी, समर्पण आणि प्रामाणिक साधनेमुळे त्यांनी लवकरच उच्च आध्यात्मिक स्तर गाठला.
धम्मदिना भिक्खुणींचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे सखोल तत्त्वज्ञान आणि स्पष्ट विचारसरणी. त्या बौद्ध धर्मातील गुंतागुंतीच्या संकल्पना अगदी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगत असत. एकदा त्यांच्या माजी पतीने त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी त्यांना अनेक गूढ प्रश्न विचारले. या प्रश्नोत्तरांमधूनच ‘चुल्लवेदल्ल सूत्त’ तयार झाले आहे.
या संवादामध्ये बौद्ध धर्मातील अनेक महत्त्वाच्या संकल्पनांची चर्चा करण्यात आली आहे. धम्मदिनांनी अत्यंत सोप्या आणि स्पष्ट भाषेत खालील विषय समजावून सांगितले :
पंचस्कंध - रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचे स्वरूप
सक्काय (स्व-भावना / व्यक्तीची ओळख)- ‘मी’ ही भावना कशी निर्माण होते
निर्वाण-दुःखातून पूर्ण मुक्ती म्हणजे काय अष्टांगिक मार्ग - योग्य जीवन जगण्यासाठीचा मार्ग चेतना आणि अनुभव-मनाची
कार्यपद्धती धम्मदिनांनी या सर्व संकल्पना इतक्या अचूकपणे आणि सखोलपणे स्पष्ट केल्या की विश्वाख प्रभावित झाले. नंतर त्यांनी ही चर्चा गौतम बुद्ध यांना सांगितली. बुद्धांनी धम्मदिनांच्या उत्तरांचे कौतुक केले आणि ती पूर्णपणे योग्य असल्याचे मान्य केले.
धम्मदिना भिक्खुणी या बौद्ध साहित्यात विशेषतः ‘चुल्लवेदल्ल सुत्त’ या ग्रंथामुळे प्रसिद्ध आहेत.हे ‘मज्जिम निकाय’मध्ये समाविष्ट आहे. ‘चुल्लवेदल्ल सूत्त’ हा बौद्ध धर्मातील एक अमूल्य ज्ञानस्रोत आहे आणि भिक्खुणी धम्मदिना या त्याच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणादायी व्यक्ती आहेत. या सुत्तामध्ये त्यांनी आत्मा, भावना, चेतना, निर्वाण यांसारख्या महत्त्वाच्या तत्त्वज्ञानात्मक विषयांवर सखोल चर्चा केली आहे. या सूत्ताचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण :
हे स्त्रियांच्या ज्ञान आणि आध्यात्मिक क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे बौद्ध तत्त्वज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजतात. संवादाच्या माध्यमातून शिकवण्याची प्रभावी पद्धत यात दिसते.
भिक्खुणी धम्मदिना यांचे व्यक्तिमत्त्व या सूत्तामधून खूप प्रभावीपणे समोर येते. त्या केवळ साधिका नव्हत्या, तर एक उत्तम शिक्षिका आणि तत्त्वज्ञ होत्या. त्यांनी दाखवून दिले की, प्रामाणिक साधना आणि ज्ञानाच्या जोरावर कोणीही उच्च स्थान मिळवू शकतो. त्यांच्या जीवनातून आपल्याला अनेक प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळतात. त्यांनी दाखवून दिले की, स्त्रियादेखील आध्यात्मिक क्षेत्रात उच्च स्थान मिळवू शकतात. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात आदर्श निर्माण केला. त्यांचे जीवन हे संयम, साधना आणि ज्ञानाच्या शक्तीचे उत्तम उदाहरण आहे. धम्मदिना भिक्खुणींच्या कार्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार आणि समज वाढवण्यात मोठी मदत झाली. त्यांनी केवळ स्वतःच्या आत्मकल्याणासाठी नव्हे, तर समाजाच्या मार्गदर्शनासाठीही आपले ज्ञान वापरले. त्यामुळे त्या बौद्ध धर्मातील एक महान आणि आदर्श भिक्खुणी म्हणून ओळखल्या जातात. आजच्या काळातही धम्मदिना भिक्खुणींचे जीवन आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जिद्दीने, ज्ञानाने आणि साधनेने त्यांनी जे स्थान मिळवले, ते प्रत्येकासाठी अनुकरणीय आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला शिकायला मिळते की, खऱ्या अर्थाने प्रगती ही आत्मज्ञान आणि सद्गुणांमुळेच होते.
स्मिता कवडे
9892090494