कोणत्याही भेदभावापासून मुक्त असे समतेचा मार्ग सांगणारे तथागत गौतम बुद्धांचे विचार. आज तेच विचार जगाचे मार्गदर्शक आहेत. या बुद्ध विचारांच्या प्रवाहात आणि इतिहासामध्ये मान्यवर भिक्खुणींचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या जीवनगाथा या बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या जिवंत कथा आहेत. या लेखात आम्रपालीपासून काही आधुनिक भिक्खुणींचा मागोवा घेतला आहे.
बौद्ध धम्माचा इतिहास बहुतेक वेळा तथागत गौतम बुद्धांच्या जीवन आणि उपदेशांवर आधारित सांगितला जातो. परंतु, या कथेला पूर्णत्व येत नाही, जोपर्यंत बुद्ध धम्मातील भिक्खुणींच्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेतली जात नाही. बुद्धांच्या कुटुंबातील स्त्रिया, नगरवधू, राण्या आणि साधक या सर्वांनी प्रारंभीच्या बौद्ध धम्माच्या नैतिक आणि आध्यात्मिक घडणीत मोठी भूमिका बजावली आहे. आजही महिला भिक्खुणी ही परंपरा पुढे नेत आहेत आणि धार्मिक नेतृत्वात नवे आयाम निर्माण करत आहेत. प्राचीन भारतात स्त्रियांची भूमिका प्रामुख्याने पितृसत्ताक व्यवस्थेमुळे मर्यादित होती. अशा परिस्थितीत, बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत क्रांतिकारक होता. यामुळे स्त्रियांना आध्यात्मिक मुक्तीकडे जाण्याचा मार्ग खुला झाला.
या मार्गात आम्रपाली जितकी महत्त्वाची वाटते, तितकीच यशोधरादेखील, जी राजकुमार सिद्धार्थांची पत्नी होती. तथागताच्या प्रवासाकडे निघालेल्या सिद्धार्थाने गृहत्याग केल्यानंतर यशोधरा मागे राहिली; परंतु तिने अपार संयम आणि धैर्य दाखवले. नंतर तीही संघात सामील झाली आणि तिने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले. तिचा प्रवास स्त्रियांच्या अंतर्गत शक्तीचे आणि आध्यात्मिक क्षमतेचे उदाहरण आहे. आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे, महाप्रजापती गौतमी, जी बुद्धांची सावत्र आई होती. तिनेच प्रथम स्त्रियांसाठी दीक्षा मागितली. सुरुवातीला नकार मिळाल्यानंतरही तिने हार मानली नाही आणि अखेर भिक्खुणी संघाची स्थापना झाली. तिच्या चिकाटीमुळे स्त्रियांना धार्मिक जीवनात स्थान मिळाले.
आम्रपालीच्या जीवनातून परिवर्तन, यशोधरेच्या जीवनातून सहनशक्ती आणि महाप्रजापती गौतमीच्या जीवनातून नेतृत्व आणि सुधारणेच्या कथा बौद्ध धम्मातील एक मूलभूत तत्त्व म्हणून पुढे येतात आणि स्त्रियांमध्येही मोक्ष प्राप्त करण्याची जी क्षमता पाहिजे होती, ती पुरुषांप्रमाणेच समान आहे, हे दाखवून देतात. आजही महिला भिक्खुणी बौद्ध धम्माच्या प्रसारात आणि जतनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंका, थायलंड, भारत यांसारख्या देशांमध्ये स्त्रिया पुन्हा भिक्खुणी परंपरा पुनरुज्जीवित करत आहेत.
जेतसुन्म तेनझिन पलमो या आधुनिक काळातील एक प्रभावशाली भिक्खुणी आहेत. त्यांनी हिमालयाच्या गुहेत १२ वर्षे ध्यान साधना केली आणि स्त्रीरूपातच ज्ञानप्राप्ती करीन, असा संकल्प अढळ ठेवला. पुढे जाऊन त्यांनी स्त्रियांच्या पूर्ण दीक्षेसाठी मोठे कार्य केले आहे. भिक्खूणी पेमा चोदरोन या त्यांच्या लेखनातून आणि प्रवचनातून बौद्ध तत्त्वज्ञान जागतिक स्तरावर पोहोचवत आहेत. त्यांनी करुणा आणि सजगतेवर विशेष भर दिला आहे. थायलंडमधील धम्मानंदा या भिक्खुणी परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी कार्यरत आहेत आणि त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे.
भारतातील भिक्खुणी परंपरेचा पुनर्जागरण हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक संघर्षाचा इतिहास आहे. विविध संशोधन, लेख आणि वृत्तांनुसार या भिक्खुणींनी मोठ्या अडचणींवर मात करून संघ पुन्हा उभा केला आहे. भिक्खुणी विशाखा महाथेरी यांना आधुनिक भारतातील पहिली भिक्खुणी मानले जाते. त्यांनी १९६७ साली दीक्षा घेतली; पण दीर्घकाळ त्यांच्या दीक्षेला मान्यता मिळाली नाही. नंतर उपसंपदा प्राप्त केल्यानंतर त्या थेरवाद परंपरेतील सर्वांत वरिष्ठ भिक्खुणी म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांच्या काळात भिक्खुणींना निवारा, मान्यता आणि सामाजिक स्वीकार, यासाठी मोठा संघर्ष करावा लागला; गावोगावी फिरून धम्मप्रसार करताना त्यांना राहण्यासाठी जागाही मिळत नसे. आंबेडकरी समुदायातील भिक्खुणींची कहाणी तर आणखीच प्रेरणादायी आहे. भंते सुनीती यांनी कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन, वकिली करून, दलित हक्कांसाठी त्या लढत राहिल्या आणि पुढे २०१३ मध्ये त्यांनी भिक्खुणी दीक्षा घेतली. त्यांची बहीण भंते विजया मैत्रेया यांनी लेखन, प्रवचन आणि कार्यशाळांद्वारे बुद्ध-आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले. जात आणि लिंग या दोन्ही दडपशाह्यांना तोंड देत त्यांनी समतेचे बीज रुजवले. ‘धम्मा सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भिक्खुणींनी संघाला औपचारिक स्वरूप देण्याचे कार्य केले आणि नव्या पिढीला प्रेरणा दिली.
वंदनीय सद्धा सुमना यांसारख्या भिक्खुणींनी दशकानुदशके बुद्धधम्माचा प्रसार करत, विशेषतः तरुण मुलींना भिक्खुणी जीवन आणि शिक्षणाची दिशा दिली आहे. या भिक्खुणी केवळ धार्मिक कार्यापुरत्याच मर्यादित नसून सामाजिक जागृती, शिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरणासाठीही कार्यरत आहेत.
इतिहास जणू वर्तुळ पूर्ण करत आहे. सम्राट अशोकाची कन्या भिक्खुणी संघमित्रा यांनी बौद्ध धर्म श्रीलंकेत नेला. आज भारतातील भिक्खुणी पुन्हा एकदा हरवलेल्या परंपरेला जिवंत करत आहेत. डॉ. आंबेडकरांनी 1956 साली जे समता, करुणा, प्रज्ञेचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न या भिक्खुणी आपल्या जगण्यातून सिद्ध करत आहेत. बुद्धाच्या वाटेवरील या स्त्रिया केवळ साध्वी नाहीत, तर त्या एका सामाजिक क्रांतीच्या जिवंत प्रतीक आहेत.
डॉ. संगीता अंभोरे
(लेखिका शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई, सा. प्राध्यापक आहेत.)
9967539840