बुद्धं शरणं गच्छामि...

    01-May-2026
Total Views |
Buddha Purnima
 
जगाला प्रेम, शांतता आणि समतेचा संदेश देणार्‍या गौतम बुद्ध यांच्या जीवनात, वैशाख शुद्ध पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा या नावानेच जगभरात ज्ञात आहे. गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेले शांतता, प्रेम आणि समतेचा संदेश आजही जगाला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारा ठरतो. आजच्या बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा बुद्धविचारांचे चिंतन करणारा हा लेख...
 
चित्रा पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी मंदिरांमध्ये उत्सव साजरे केले जात असतानाच, देशातील प्रत्येक घरात समृद्धी नांदो, अशी मी प्रार्थना करतो. बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व बंधुभगिनींना शुभेच्छा देताना, मला अत्यंत आनंद होत आहे. भारताने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांमध्ये, बौद्ध धर्म सर्वांत अग्रस्थानी आहे. भगवान बुद्धांचे आयुष्य आणि शिकवण, आजही जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकत आहे. भारताने जगाला आत्मसाक्षात्काराचे महत्त्व शिकवले. ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थच ‘एक जागृत व्यक्ती’ असा आहे. मानवतेला आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवणार्‍या या महान विभूतीचा जन्म आणि त्यांना झालेला साक्षात्कार एकाच दिवशी होणे, हेदेखील विशेषच!
 
राजपुत्र सिद्धार्थाचे बालपण अत्यंत ऐषोआरामात गेले. वयाच्या २९व्या वर्षी आपला राजवाडा, पत्नी, पुत्र आणि सर्व ऐहिक संपत्तीचा त्याग करून, आध्यात्मिक सत्याच्या शोधात त्यांनी घर सोडले. सहा वर्षांच्या कठोर आत्मक्लेशानंतर, बोधगया येथील बोधीवृक्षाखाली त्यांना परमोच्च ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी ‘बुद्धपद’ धारण केले. चार आर्य सत्यांचा साक्षात्कार आणि नैतिकतेच्या मार्गाचे आचरण यामधूनच एका नवीन तत्त्वज्ञानाचा आरंभ झाला, जे पुढे जागतिक इतिहासात भारतासाठी अभिमान ठरले. वाराणसीजवळील सारनाथ येथे त्यांनी, पाच तपस्वींना आपला पहिला उपदेश दिला. ‘धम्मचक्कप्पवत्तन सुत्त’ किंवा ‘धर्माचे चक्र फिरवणे’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्यांच्या शिकवणुकीतून, बौद्ध धर्माचा पाया रचला गेला आणि बौद्ध धर्माचा अधिकृतपणे आरंभ झाला. कालांतराने, अनेकजण त्यांच्या शिकवणीकडे आकर्षित झाले. मगधचे राजा बिंबिसार यांनी, राजगीर येथील वेणुवन (बांबूचे वन) मठ दान केले. श्रीमंत अनाथपिंडिकाने मठ बांधण्यासाठी, संपूर्ण जेतवन वनाला सोन्याच्या नाण्यांनी मढवले. अशा कृतींमधूनच भारतात अस्तित्वात असलेल्या धर्मावरील गाढ श्रद्धेचे दर्शन घडते.
 
बौद्ध धर्माची पायाभूत शिकवण असलेल्या चार आर्य सत्यांचा प्रसार मठांद्वारे केला जातो, इच्छा हे दुःखाचे मूळ कारण आहे, इच्छेचा नाश केल्यानेच दुःखावर मात करता येते. अष्टांग मार्गाचे अनुसरण करून, व्यक्ती दुःखापासून मुक्ती मिळवू शकते.
बुद्धांनी दिलेली शिकवण : भूतकाळात रमू नका, आपले मन वर्तमानावर एकाग्र करा. सत्य हीच शक्ती असून, आपले मन हेच सर्व कृतींचे स्रोत आहे. म्हणूनच, सकारात्मक विचारांची जोपासना करा. कठीण काळात मनाला भयग्रस्त होऊ देऊ नका. आयुष्याचा प्रवास हा अंतिमतः वैयक्तिक असून, या प्रवासाला एका आध्यात्मिक मार्गाची जोड द्या. शब्द जखमा करू शकतात, म्हणूनच सौम्यपणे बोला. प्रेम आणि अहिंसा अत्यंत आवश्यक आहेत. नेहमी शिकत राहा, कधीही थांबू नका.
 
‘मणिमेकलाई’ आणि ‘कुंडलाकेसी’ यांसारख्या प्राचीन तामिळ महाकाव्यांमध्ये, बौद्ध तत्त्वज्ञानाची अत्यंत सुंदररीत्या मांडणी केली आहे. प्राचीन ग्रंथसंपदेपैकी बरेचसे ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झाले असले, तरी त्यांचे योगदान आजही अमूल्यच आहे. ज्यांच्या मनात कोणतीही मोहमाया उरलेली नाही, अशा सज्ञानी माणसांनी मद्यपान आणि जीवहत्या यांसारख्या गोष्टींचा त्याग केला. ते म्हणतात की, "आपण एक बाब समजून घ्यायला हवी ती म्हणजे, जन्म आणि मृत्यू, तसेच मृत्यूनंतर पुन्हा होणारा जन्म, हे चक्र म्हणजे निव्वळ झोपणे आणि जागे होण्यासारखेच आहे, हेच खरे सत्य आहे. जे लोक योग्य काम करतात, त्यांना आयुष्यात सन्मानाचे स्थान मिळते आणि जे वाईट कर्म करतात, त्यांना असंख्य यातनाही सोसाव्या लागतात. हे सत्य ज्यांना जाणून घेता आले, त्यांनाच या जगातील सर्व बंधने तोडता आली आहेत,” अशा शब्दांतच ‘मणिमेकलाई’ या महाकाव्यात, बौद्ध धर्माचे सार मांडले आहे. (आथिराई पिच्चईयित्ता काथाई : ८४-९०).
 
अहिंसा, चोरी न करणे, व्यभिचारापासून दूर राहणे, सत्याची कास धरणे आणि मादक पदार्थांपासून दूर राहणे या पाच नीतिमूल्यांवर त्यांनी भर दिला. त्यांनी धर्माच्या पलीकडे जात, मन हेच सर्व गोष्टींचे मूळ मानले. सकारात्मक विचार आणि कृतींमुळे एक सौहार्दपूर्ण जीवन लाभते, तसेच तसाच समाजही निर्माण होतो. त्यांनी दुःखचक्रात अडकलेल्या जीवांच्या जगण्यात स्पष्टता आणली, त्यांचे आयुष्य उजळवले, म्हणूनच तर त्यांचा ‘लाईट ऑफ एशिया’ अर्थात, ‘आशियाची प्रकाशज्योत’ अशा शब्दांत गौरव केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितलेली एक गोष्ट मला आठवते. त्यांनी म्हटले होते की, ’भगवान गौतम बुद्धांनी दिलेला जीवन संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे. शांततेची सुरुवात आपल्या आतूनच होत असते, स्वतःवर मिळवलेला विजय हाच सर्वोत्तम असून,’ हीच शिकवण गौतम बुद्धांनी आपल्याला दिल्याची जाणीव पंतप्रधानांनी आपल्याला करून दिली होती. आज जग ज्या तणाव आणि संघर्षातून जात आहे, त्या पार्श्वभूमीवर बुद्धांची शिकवण अधिकच महत्त्वाची ठरत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
 
सम्राट अशोकांच्या उदाहरणातून भगवान बुद्धांच्या शिकवणीने घडून येणारे परिवर्तन, आपल्याला ठळकपणे दिसते. बुद्ध विचारांच्या प्रभावामुळे सम्राट अशोकसारख्या राज्यकर्त्याचे रूपांतर, शांतीच्या पुरस्कर्त्यामध्ये घडून आले होते. सम्राट अशोक यांनी शिलालेखांच्या आणि स्तूपांच्या माध्यमातून, बौद्ध विचारातील तत्त्वांचा देशभर प्रचार-प्रसार केला. आजही जगभरातील असंख्य लोक सांची आणि सारनाथ इथले स्तूप पाहण्यासाठी येतात. सारनाथ इथली ‘सिंहमुद्रा’ तर आता भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. सम्राट अशोक यांनी बौद्ध भिखू आणि स्वतःच्या कुटुंबासह मिळून, संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्म विचारांचा प्रचार-प्रसार केला. ‘महावंश’ काव्यातील नोंदींप्रमाणे, सम्राट अशोक यांचा पुत्र महिंदा याने, भगवान गौतम बुद्धांची ही शिकवण श्रीलंकेपर्यंत नेली. असे मानले जाते की, बौद्ध भिखूंनी तामिळनाडूमध्येदेखील धर्मप्रसारासाठी मदत केली होती, आजही तामिळनाडूच्या अनेक भागांत बौद्ध धर्माच्या खुणा आढळतात.
 
बौद्ध भिखूंनी कोणत्याही भेदाभेदाशिवाय, मोफत वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी ‘त्रिपिटक’ यांसारख्या पवित्र ग्रंथांची शिकवण दिली, ‘जातककथा’ही त्यांनीच शिकवल्या. त्याचवेळी लोकांमधील जनजागृती वाढावी, यासाठीही लोकांना ध्यानसाधनेचेही मार्गदर्शनही केले. दानधर्म, विशेषतः गरिबांना अन्नदान करणे, हे मूलभूत कर्तव्य मानले जात असे. भुकेलेल्यांना अन्न देणे म्हणजे एका अर्थाने जीवन देण्यासारखेच आहे, हीच भावना तमिळ साहित्याने मांडली आहे. हजारो वर्षांपासून या भूमीवर अनेकविध आध्यात्मिक विचार आणि तत्त्वज्ञान आकाराला आले, बहरले, विकसित झाले. बौद्ध धर्म असो वा जैन धर्म, कोणताही धर्म असो, असा प्रत्येक धर्म संपूर्ण भारतात एकात्मतेच्या भावनेने स्वीकारला गेला. यातून एक गोष्ट ठळकपणे दिसून येते, ती म्हणजे हा देश संस्कृती आणि परस्पर सामायिक भावनांच्या बाबतीत कायमच एकसंध राहिला आहे. बौद्ध धर्माने आयुष्यभर शिक्षणावर भर देत मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था आणि ग्रंथालयांची उभारणी केली. इ. स. पाचव्या शतकातच, ‘नालंदा विद्यापीठ’ हे शिक्षणाचे एक मुख्य केंद्र म्हणूनही विकसित झाले होते. या विद्यापीठात सुमारे दहा हजार विद्यार्थी आणि एक हजार, ५०० शिक्षकांचे संख्याबळ होते.
 
‘नालंदा’प्रमाणेच तामिळनाडूतील कांचीपुरम येथेही, एक प्रसिद्ध विद्यापीठ अस्तित्वात असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. ‘विक्रमशिला’ आणि ‘ओदंतपुरी’ यांसारख्या विद्यापीठांनी, असंख्य साहित्यकृतींसह देशाच्या बौद्धिक उंचीचे दर्शन जगाला घडवले. बौद्ध शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांमध्ये संपूर्ण आशियातून, अनेक विद्वान अध्ययनासाठी भारतात येत असत. चिनी भिखू फॅक्सियन/फा-हियान यांनी बौद्ध धर्माच्या अध्ययनासाठी, तब्बल १५ वर्षांची प्रदीर्घ यात्रा केली होती. तर, चिनी भिखू ह्युएनसांग यांनी भारतात १६ वर्षे ‘नालंदा’ येथे अभ्यास करण्यात आणि अनेक ग्रंथ संकलित करण्यात घालवली आणि त्यानंतर ते चीनमध्ये परतले. ह्युएनसांग यांच्या प्रवासवर्णनानुसार, त्यांनी तामिळनाडूतील कांचीपुरमलाही भेट दिली होती. जिथे त्यांनी एका बौद्ध विद्यापीठात वास्तव्य करून, अध्ययन केले, हस्तलिखितांची प्रत तयार केली. असे म्हटले जाते की, त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विशेष व्याख्यानेदेखील दिली होती. कठोर तपश्चर्येनंतर अशक्त झालेल्या बुद्धांविषयी करुणा बाळगून, सुजाताने त्यांना प्रेमाने दुधाची खीर अर्पण केली, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले आणि त्यांना बोधीवृक्षाखाली ध्यान करण्याची शक्ती मिळाली. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण ‘पायसम’ तयार करून आणि अर्पण करून, त्यांच्या प्रेम आणि दयाळूपणाचे स्मरण करतो. "प्रेम हे आनंदाचा स्रोत आहे, प्रेम हे जगाचा प्रकाश आहे, प्रेम हीच सर्वांत मोठी शक्ती आहे,” बुद्धांची ही शिकवण, आजही तितकीच प्रासंगिक आहे. संपूर्ण जगात प्रेम आणि शांतता नांदो, हीच प्रार्थना.
 
 
- सी. पी. राधाकृष्णन (मा. उपराष्ट्रपती)