स्त्रीचा आदर, सन्मान केवळ तिच्या सौंदर्यावरून करायचा नाही, तर तिच्यातल्या अंतरात्म्यातले मातृत्व आणि माणूसपण यांचा सन्मान महत्त्वाचा. वासनेच्या आणि देहासक्तीच्या पलीकडे जाऊन स्त्रीशक्तीचे महत्त्व सांगणारे आम्रपालीचे जीवन. या लेखात आम्रपालीच्या जीवनाचा मागोवा घेतला आहे.
ख्याती पावली ती वैशालीनगरी वैभवशाली
त्या नगरीची रूपगर्विता
नर्तकी आम्रपाली
शरण बुद्धाला गेली
शरण बुद्धाला आली
तथागत बुद्धांना शरण गेलेली आम्रपाली.आम्रपालीचा जन्म इ. स. पू. ५०० च्या आसपास झाला. ती एक अनाथ बालिका होती. तिला महनामून (महानंद) नावाच्या एका ‘लिच्छवी’ सामंताने सांभाळले. ‘आम्र’ (आंबा) आणि ‘पल्लव’ (झाडाची पाने) यावरून तिचे नाम ‘आम्रपाली’ पडले.
आम्रपाली ही प्राचीन भारतातील विशेषत: ५०० च्या सुमारास वैशाली (बिहार) येथे बाल्यावस्था ते तारुण्यात पदार्पण केले. तिचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता एवढी होती की, ती सर्वांनाच हवीहवीशी वाटू लागली. जो-तो तिला मिळविण्याचा प्रयत्न करू लागला.
वैशालीनगरीची शांतता भंग होऊ नये, म्हणून एक सभा बोलाविण्यात आली. ऐतिहासिक संदर्भानुसार, वयाच्या 11व्या वष तिला राज्यातील सर्वांत सुंदर मुलगी घोषित करण्यात आले होते. आम्रपाली अत्यंत सुंदर असल्यामुळे तरुणांमध्ये संघर्ष होऊ लागला. हा संघर्ष टाळण्यासाठी वर नमूद केलेल्या एका सभेमध्ये एक निर्णय घेण्यात आला आणि आम्रपाली हिला ‘नगरवधू’ म्हणून नियुक्त करण्यात आले. ‘नगरवधू’ म्हणजे संपूर्ण शहराची वधू घोषित करण्यात आले. ‘सुंदरता शाप की वरदान’ असे त्यावेळेस आम्रपालीला झाले असेल. वैशालीच्या राज्याने निर्णय दिला की, ती वैशालीची ‘नगरवधू’ होईल. मात्र, हे ऐकून तिच्या वडिलांना धक्काच बसला. त्यावेळी आम्रपाली आपल्या पित्याच्या रक्षणासाठी पुढे होऊन म्हणाली, “मी खूप सुंदर आहे. हा माझा दोष आहे का? त्याची शिक्षा माझ्या पित्याला का? माझ्या पित्याच्या हातातील प्रथम बांधलेल्या बेड्या काढा. मी वैशालीची ‘नगरवधू’ होण्यास तयार आहे.” पित्यासाठी ‘नगरवधू’ होण्यास मान्यता देणाऱ्या आम्रपालीने त्यानंतर काही अटी सांगितल्या. ती म्हणाली, “माझ्या काही अटी आहेत, त्या मान्य होणार असतील; तरच मी ‘नगरवधू’ होण्यास तयार आहे.” ती अटी सांगते की- (१) वैशालीनगरामध्ये भव्यदिव्य असा महाल बांधून तो सर्व सुखसोयीयुक्त असावा (सप्तभूमी प्रासाद). (२) महालाची व्यवस्था एका किल्ल्याप्रमाणे असावी. (३) महालात येणाऱ्या-जाणाऱ्याची चौकशी करता कामा नये. (४) हा करार दहा वर्षांकरिता राहील.
‘नगरवधू’ झाल्यामुळे नगराच्या मधोमध महालात राहण्याची सोय, दिमतीला नगर-चाकर.आम्रपाली जेव्हा वैशालीची ‘नगरवधू’ बनली, तेव्हा ती कोणाचीही खासगी पत्नी राहिली नाही. परंतु, संपूर्ण नगराची संपत्ती मानली गेली. प्राचीन भारतातील ‘लिच्छवी’ गणराज्यात ‘नगरवधू’ हे पद अत्यंत सन्मानजनक आणि उच्च मानले जात असे. ‘नगरवधू’ म्हणून आम्रपालीला आपसूकच भरपूर अधिकार होते.
तिला ‘राजनर्तकी’पद मिळाले होते. ती वैशालीच्या सर्वांत सुंदर आणि प्रतिभावान स्त्रियांमध्ये एक म्हणून निवडली गेली होती. वैशालीतील श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांकडून मनोरंजन केल्याबद्दल तिला प्रचंड धन मिळत असे. तिने स्वत:चा एक भव्य राजवाडा बांधला होता. स्वतंत्र निर्णय ती घेऊ शकत होती. कोणत्याही एका व्यक्तीच्या अधीन नव्हती. तिची इच्छा असेल तेव्हा ती कोणाचे मनोरंजन करायची. ‘नगरवधू’ म्हणून तिला समाजातील प्रभावशाली लोकांमध्ये स्थान होते. तिला राजकीय क्षेत्रात अप्रत्यक्ष महत्त्व प्राप्त होते. दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्षे जात होती. पण, सौंदर्य आणि त्या सौंदर्यामुळे मिळालेला सन्मान, संपत्ती आणि अधिकार यामुळे आम्रपाली खूप गर्विष्ठ झाली. तिचे आयुष्य परिवर्तन होण्याचा कालावधी म्हणजेच, आम्रपाली आणि तथागत गौतम बुद्ध यांची भेट, ही बौद्ध इतिहासातील एक हृदयस्पश कथा.
तथागत गौतम बुद्ध जेव्हा वैशालीमध्ये आले, तेव्हा शहरातील सर्वच जनता भगवान बुद्धांच्या दर्शनाला त्यांना भेटावयास येऊ लागली. त्यांच्या प्रवचनात सारी रयत तल्लीन झाली. शहरातील सर्वच श्रीमंत, गरीब, लहानसहान यांनी तथागतांची भेट घेतली; परंतु आम्रपाली अद्याप त्यांच्या भेटीस गेली नव्हती. कारण, नगरात येणारे कुणीही तिला भेटायला यायचे, तिच्या भेटीची प्रतीक्षा करायचे. त्यामुळे तिला असे वाटत होते की, बुद्धांनी तिच्या भेटीस यावे. आम्रपालीची सेविकादेखील भगवान गौतम बुद्धांच्या प्रवचनात गेली होती. तिने तल्लीन होऊन, तेथील लोक प्रवचनात कसे तल्लीन झाले आणि ती स्वत:ही स्वत:ला कशी विसरली हे आम्रपालीसमोर कथन केले. तेव्हा आम्रपालीला उत्सुकता वाटली. सगळी जनता ज्याच्या प्रवचनाने तल्लीन झाली, तो कोण आहे हे पाहूया म्हणून ती गौतम बुद्ध ज्या जागी वास्तव्यास होते, तेथे गेली. तथागतांचे रूप पाहून ती त्यांच्या रूपावर मोहित झाली. तिने त्यांना तिच्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. बुद्धांनी ते निमंत्रण स्वीकार केले. तिला वाटले, मी एवढी रूपवान, गुणवान आहे. मी जशी मोहित झाले, तसे भगवान गौतम बुद्धदेखील होतील. दुसऱ्या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्या काही बौद्ध अनुयायांसह (भिक्खू) आम्रपालीच्या महालात आगमन केले. आम्रपालीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने सर्व बौद्ध भिक्खूसह भगवान गौतम बुद्धांचे आदरातिथ्य केले. राजस भोजन ग्रहण केल्यानंतर तथागत आम्रपालीला उद्देशून म्हणाले, “माता धन्यवाद! धन्य हो माते” ही वाणी ऐकून ती खूप लज्जित झाली. तिला वाटते होते, तिच्या सौंदर्याने ती सर्वांना भुरळ पाडू शकते. पण, तसे काहीच झाले नाही. उलट, बुद्धांनी तिला ‘माता’ म्हटले. एक सुविचार आहे, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’. माता, आई, जननी; एका ‘नगरवधू’ला एवढा मोठा सन्मान, मान या एका वाक्याने आम्रपालीचे पूर्ण आयुष्य पालटले. बुद्धांच्या उपदेशामुळे आम्रपालीचे मन पूर्णपणे बदलले. तिला जाणीव झाली की, बाह्यसौंदर्य हे तात्पुरते आहे. तिने आपल्या विलासी जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला व तो अमलातदेखील आणला. ती बौद्ध संघामध्ये सामील झाली. ती एक ‘अर्हत’ बनली. तिने तिची प्रसिद्ध ‘अंबबन’ (आंब्याची बाग) तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांना राहण्यासाठी दान केली. आम्रपालीची जीवनकहाणी ही नैतिक मूल्यांच्या श्रेष्ठत्वाची कहाणी आहे. एक स्त्री बाईच नसते, तर ती आईही असते. स्त्रीच्या सौंदर्यावर वासनांध होऊन केवळ तिच्या सुंदर शरीरामुळे तिचा सन्मान करण्यापेक्षा तिच्या गुणांचा आणि कार्याचा सन्मान करायला हवा. तिच्यामध्ये असलेल्या मातृसुलभ भावनेचा आदर करायला हवा. आम्रपालीची ही कथा आजही प्रेरणादायी आहे आणि नैतिक मूल्यांचा जागर करणारी आहे.
शुभांगी जाधव
9892999311