अधिरथ
‘अधि’ म्हणजे स्वाधीन आणि ‘रथ’ म्हणजे जीवनाचा रथ. ज्याला आपल्या जीवनात ज्ञानप्राप्ती करण्याकरिता सूत म्हणजे साधना करून पुढे जावयाचे आहे, अशा साधकातील वृत्तीस्थैर्याला व्यास ‘सूत अधिरथ’ असे म्हणतात. या अधिरथाला ज्ञानगंगेतून वाहणारा ‘कर्ण’ मिळाला, आणि अधिरथाने अपूर्ण ज्ञानात आनंद मानणार्या राधेला त्या कर्णाचा पुत्र म्हणून सांभाळ करण्यास सांगितले. म्हणूनच, व्यासांनी कर्णाला ‘सूतपुत्र’ व राधेचा पुत्र ‘राधेय’ अशी निरनिराळी नावे दिली आहेत.
श्रवणालाच ज्ञान मानण्याची बुद्धीहीन असल्यामुळे, कर्णाला हीन जातीचा सूतपुत्र मानण्यात आले; परंतु कर्ण शरवेध करण्यात आणि बुद्धिचापल्यात श्रेष्ठ होता. म्हणून त्याचा परिचय झाल्यावर, दुर्योधनाने त्याला मत्स्य देशाचा राजा बनवून त्याला आपल्यासह ठेवले. ‘मत्स्य’ म्हणजे गंगेतील फल आणि ज्ञानगंगेतील फल म्हणजे, केवळ श्रवणबुद्धी मानणारा मत्स्य देश होय. कर्ण अशा तर्हेने मत्स्य देशाचा अधिपती झाला; परंतु तो वाईट वृत्तीच्या दुर्योधनाचा मित्र असल्याने, त्याची देशरूप स्थिर भावनासुद्धा वाईटच होती. तेव्हापासून पांडवांचा ज्येष्ठ भ्राता राहूनही कर्ण पक्षपाती राहिला. अपूर्ण वाईट वृत्ती ही वाईटाच्याच संगतीत राहणार. कर्ण-दुर्योधनाचे असे अतूट सख्य शेवटपर्यंत अबाधित राहिले. अशा तर्हेने कर्णाला राज्य देऊन, राजा करून त्याला दुर्योधनाने आपल्या मानल्या गेलेल्या क्षत्रिय जातीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु ज्ञाते कर्णाला ‘सूतपुत्र’ म्हणजेच नीच जातीचा (नीच वृत्तीचा) मानत असत, असे संपूर्ण ‘महाभारता’त व्यासांनी कथेद्वारे दाखविले आहे.
द्रौपदी स्वयंवराच्या वेळी कर्णसुद्धा गेला होता. परंतु द्रौपदीने तो शूद्र (सूतपुत्र) असे सांगून, त्याच्याबरोबर विवाह करण्याचे नाकारले. द्रुतगतीने आत्मज्ञान प्राप्त करू शकणारी द्रौपदीवृत्ती, स्वतःला केवळ शाब्दिक पांडित्याद्वारा आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते, असे मानणार्या कर्णवृत्तीला आपला पती म्हणून कसा स्वीकारेल? नंतर आलेल्या अर्जुनाने एकच ब्रह्म भेदणार्या बाणाने मत्स्याचा डोळा फोडून द्रौपदीला पणात जिंकले. तेव्हापासून कर्णास अर्जुनाविषयी अधिकच द्वेष वाटू लागला होता. म्हणूनच, कर्णाने दुःशासनाद्वारे केलेले द्रौपदीचे वस्त्रहरण बिनदिक्कतपणे पाहिले, पांडवांना वनवास करविला. एक वर्षाच्या अज्ञातवासामध्ये दुर्योधनाबरोबर त्याने विराट राजाच्या विराटनगरीवर हल्ला करून, विराट राजाच्या गायी पळविण्याचाही प्रयत्न केला. या उत्तर गोग्रहणात कर्णाने एका देवगायीला इतके मारले की, गाय अर्धी जमिनीत गाडली गेली. त्या देवगायीने कर्णाला शाप दिला की, तूसुद्धा असाच मरशील आणि तसेच झाले.
कर्ण त्यावेळी कौरवसेनेचा सेनापती होता. त्याचा तो दुसरा दिवस होता. कर्ण दोनच दिवस सेनापती होता. आपल्याला ज्ञानाची माहिती आधी कानानेच होते व कानसुद्धा दोनच असतात. कर्णाने विश्वासाने दुर्योधनाला सांगितले की, तो सर्व पांडवांना नष्ट करेल. इतयात, अर्जुनाशी युद्ध करता-करता कर्णाच्या रथाचे एक चाक अर्धे जमिनीत खचले. शरीररूपी रथाची दोन चाके असतात. एक मन व दुसरे विवेकबुद्धी. कर्णाचे विवेकबुद्धीरूप चाक जमिनीत खचले. त्या चाकाला बाहेर काढण्याच्या हेतूने कर्ण रथावरून खाली उतरला आणि चाक बाहेर काढू लागला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की, आता कर्ण तर्कवितर्करूप शस्त्र-अस्त्रविहीन आहे आणि कर्णाला मारण्याची योग्य संधी हीच आहे. कर्ण त्यावेळी कथित धर्माची आठवण देऊन सांगतो की, निःशस्त्र शत्रूवर हल्ला करणे हा अधर्म आहे. श्रीकृष्ण त्यावेळी म्हणतो की, त्या अधर्मी कर्णाला अधर्मानेच मारणे हाच खरा धर्म आहे. अर्जुनाने आपल्या ब्रह्मरूप बाणाने कर्णवृत्तीचा अंत केला. गोग्रहण कथेत ‘गौ’ म्हणजे ‘इंद्रिये’ असे मानल्यास कथेचा अर्थ स्पष्ट होईल. अशा तर्हेने कर्णवृत्तीने आपल्या देवतुल्य इंद्रियरूप गायीचे ताडन केले, ज्यामुळे वृत्तीरूप युद्धात तो अर्जुनाकरवी मारला गेला.
उत्तर गोग्रहण
पांडव कौरवांकडून ‘द्यूता’मध्ये हरतात. अटीनुसार, आता पांडवांना १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागणार अस्तो. अज्ञातवासात असताना जर पांडवांना शोधून काढले, तर त्यांना पुन्हा १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागण्याची अट असते. म्हणून स्वतः ला गुप्त ठेवण्यासाठी पांडव सावधगिरी बाळगतात. कौरव पांडवांना शोधण्याच्या प्रयत्नात असतात. अज्ञातवासात असताना पांडव विराटनगरीत स्वतःची नावे बदलून राहतात. ज्येष्ठ भ्राता धर्मराज विराट राजाच्या सभेत ‘कंक’ नावाचा ब्राह्मण, भीम ‘बल्लव’ नावाचा स्वयंपाकी, अर्जुन नाचगाणे शिकविणारी स्त्रीवेषधारी ‘बृहन्नडा’, द्रौपदी राणीची खास ‘दासी’ आणि नकुल, सहदेव अन्य प्रकारचे राजाचे नोकर म्हणून वास्तव्य करतात. महत्प्रयासानंतर कौरवांना असे समजते की, पांडव विराटनगरीत आहेत; पण ते कोठे आहेत व कशा स्वरूपात आहेत, याचा मात्र थांगपत्ता लागत नाही. म्हणूनच पांडवांना शोधून काढण्यासाठी, दुर्योधन विराटनगरीवर हल्ला करून विराट राजाच्या गायी पळविण्याचे ठरवतो. योजना तयार होते आणि कौरव पक्षातील सारेच वीर भीष्म, कर्ण, दुर्योधन आदी विराटनगरीवर हल्ला करण्यास निघतात. कौरवसेना विशाल होती. तिचे दोन भाग केले जातात आणि असे ठरविले जाते की, सेनेचा एक विभाग विराटनगरीच्या दक्षिण द्वारावर हल्ला करेल व दुसरा विभाग उत्तर द्वारावर हल्ला करेल, ज्याचे नेतृत्व स्वतः दुर्योधन करेल. दक्षिण द्वारावर हल्ला करून राजांचा पराभव करणे सोपे जाईल.
दक्षिणद्वारावर हल्ला होताच राजा विराट, त्याची बरीचशी सेना, बल्लव (भीम), नकुल, सहदेव आणि कंक (धर्मराज) आदी हल्ला रोखण्यासाठी पुढे येतात. आता उत्तर द्वारावर दुर्योधन हल्ला करतो. उत्तर द्वारावरील हल्ला थोपविण्यासाठी कोणीही विराटनगरीतील वीर बाकी न राहिल्यामुळे, ‘बृहन्नडारूप’ अर्जुनाने उत्तरेकडील द्वारावरील हल्ला थोपविण्याचा विचार केला. बृहन्नडेचे रूप घेऊनच अर्जुन युद्ध करण्यास जातो. त्याआधी अर्जुन विराटनगरीबाहेरील शमी वृक्षावर एका शवाखाली झाकून ठेवलेली अस्त्र-शस्त्रे काढतो. त्या अस्त्र-शस्त्रांकडे कोणाचे लक्ष जाऊ नये, यासाठी ती शवाला बांधून ठेवलेली असतात, त्यालासुद्धा एक वर्ष लोटले असते. ही शस्त्रास्त्रे काढण्याचे काम करून घेण्यासाठी, बृहन्नडा विराट राजाचा पुत्र उत्तर याला आपल्याबरोबर आपला सारथी म्हणून निवडते. उत्तर यास मोठे आश्चर्य वाटले की, ‘बृहन्नडा’ जी त्याला गाणे-बजावणे शिकवत असे, ती आज अचानक वीरासारखे वर्तन कशी करीत आहे? त्यावेळी अर्जुनाने त्याला आपले खरे रूप दाखवितो आणि त्याला बजावतो की, याबाबतीत कोणाजवळही काही बोलू नकोस.
योगिराज हरकरे
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७