Nashik KumbhMela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मांसविक्री नियमनाची गरज

हरिद्वारच्या निर्णयानंतर नाशिकसाठीही तत्सम धोरणाचा विचार करण्याची अपेक्षा

    09-Apr-2026   
Total Views |
Nashik KumbhMela
 
मुंबई : (Nashik KumbhMela) अर्धकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार नगर निगमने शहराला पूर्णपणे मांस विक्रीपासून मुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. महापौर किरण जायसवाल यांच्या मते, शहरातील सर्व परवानाधारक आणि अवैध मांस दुकाने सराय गावात स्थलांतरित केली जाणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही अशाच प्रकारचे धोरण राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली जातेय. लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणाची पवित्रता, स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने या दिशेने ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी पुढे येत आहे.(Nashik KumbhMela)
 
हरिद्वारच्या नगर निगमाने सराय गावात ५७ दुकानांचे संकुल तयार केलेय. श्रद्धाळूंच्या भावनांचा आदर राखण्यासाठी आणि शहराची धार्मिक पवित्रता टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नगर आयुक्त नंदन कुमार यांनी सांगितले की, १९३५ च्या नियमांनुसार हर की पौडीच्या ५ किलोमीटर परिसरात आधीपासूनच मांस आणि मद्य विक्रीवर बंदी होती. आता हा निर्बंध संपूर्ण शहरात लागू करण्यासाठी उपनियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे आता कच्च्या मांसाची विक्री पूर्णपणे शहराबाहेर होणार असून मेळ्यादरम्यान शिस्त आणि स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे.(Nashik KumbhMela)
 
त्याच धर्तीवर नाशिकमध्येही कुंभमेळ्याच्या कालावधीत किमान प्रमुख धार्मिक क्षेत्रांमध्ये मांस विक्रीवर तात्पुरते निर्बंध आणणे किंवा ती दुकाने शहराबाहेर हलवणे, हा पर्याय सरकारने गांभीर्याने विचारात घ्यावा, असे मत व्यक्त होत आहे. नाशिक हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख केंद्र असून, गोदावरी नदीच्या तीरावर लाखो भाविक स्नानासाठी येतात. या पार्श्वभूमीवर शहरात धार्मिक संवेदनशीलता टिकवून ठेवणे आणि स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हरिद्वारप्रमाणेच नाशिकमध्येही नियोजनबद्ध पद्धतीने मांस विक्रीचे नियमन करण्याचा निर्णय घेतल्यास व्यवस्थापन अधिक सुलभ होऊ शकते.(Nashik KumbhMela)
 
तथापि, या निर्णयाचा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शहराबाहेर नियोजित संकुल उभारून व्यवसाय सुरू ठेवण्याची सुविधा दिल्यास दोन्ही बाजूंमध्ये समतोल राखता येईल. दरम्यान, नाशिक महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर धार्मिक, सामाजिक आणि प्रशासकीय सर्व घटकांचा विचार करून सरकारने हरिद्वारच्या धर्तीवर योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(Nashik KumbhMela)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : नाथ संप्रदायात गहिनीनाथांचे महात्म्य मोठे...  
 
ज्याप्रमाणे हरिद्वारच्या तीर्थक्षेत्र परिसरात मांसविक्रीवर बंदी आणली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यात जेवढे तीर्थक्षेत्रं आहेत, तिथे अशा स्वरूपाचा निर्णय घ्यायला हवा. नाशिकमधील येणारा कुंभमेळा लक्षात घेता, जगभरातून लोक या भूमीमध्ये येत असतात, ते एक विशिष्ट आस्था आणि श्रद्धेने येत असतात. परंतु इथे आल्यानंतर त्यांना तीर्थक्षेत्रावर मद्य-मांस विक्री केंद्र अशा गोष्टी दिसल्यानंतर त्यांचे मन दुखवले जाते. विधर्मीयांकडून याचा दुष्प्रचारासाठी प्रामुख्याने वापर केला जातो. ती लोकं मांस विक्री केंद्रातील टाकाऊ माल गोदा पात्रात फेकतात. हा हिंदू संस्कृतीचा अपमान आहे. त्यामुळे सरकारने याविषयी लवकरात लवकर विचार करून कठोरात कठोर कारवाई कशी होईल, याची रुपरेषा सर्वांसमक्ष मांडली पाहिजे.(Nashik KumbhMela)
 
- महंत पीठाधीश्वर अनिकेतशास्त्री, महर्षि पंचायतन सिद्धपीठम्, नाशिक
 
नाशिकमधल्या गाडगे महाराज पुलाजवळ बोम्बिल विक्रेते मोठ्या प्रमाणावर बसतात. येणारे यात्रेकरूंसाठी पार्किंगची व्यवस्था त्याचठिकाणी आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे अशास्वरुपाचा निर्णय तत्काळ घेणे गरजेचे आहे. प्रयागराजला महाकुंभावेळी अशा निर्णयाची उत्तम अंमलबजावणी झाली होती. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातही व्हावी अशी इच्छा आहे. तीर्थक्षेत्र परिसरातील मांस विक्रीकेंद्रांबाबत राज्य शासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.(Nashik KumbhMela)
 
- महंत सुधीरदास महाराज, काळाराम मंदिर मुख्य पुजारी
 
अयोध्येत मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी राम मंदिर परिसरातील मांस विक्री केंद्रांवर बंदी आणली. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभामध्ये सुद्धा याची प्रचिती आली. वृंदावनमध्ये सुद्धा असेच चित्र आहे. आमची हीच मागणी आहे, की जर या दोन्ही ठिकाणी हे शक्य होत असेल तर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र परिसरांत, विशेषतः सिंहस्थ कुंभमेळा परिसरातील मांस विक्री केंद्रांबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यायला हवा.(Nashik KumbhMela)
 
- महंत भक्तिचंद्रदास महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते वैष्णव आखाडा परिषद तथा पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत, नाशिक
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक