संतांसी शरण जावे सुखे

    09-Apr-2026
Total Views |

Simhastha Kumbh Mela

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असून, त्यानिमित्ताने नाशिक येथे ‘अखिल भारतीय संत समिती’च्या राष्ट्रीय कार्यकारणीची दोन दिवसीय सभा संपन्न झाली. यावेळी सिंहस्थाबरोबरच हिंदू धर्मासमोरच्या विविध अडचणी, संधी, उपाययोजना यावर सविस्तर चर्चाही झाली. यावेळी विविध विषयावर सकल संतसमाजाने काही निर्णय देखील घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या संतांच्या सहवासामध्ये उपस्थित होते. या सभेचा घेतलेला हा आढावा...

आगामी त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभाच्या पार्श्वभूमीवर ‘अखिल भारतीय संत समिती’ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिक येथील श्रीस्वामीनारायण मंदिर (बीएपीएस) येथे दि. ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीस देशातील २६ राज्यांमधून आलेल्या विविध संप्रदायांच्या २३८ संत-महात्म्यांनी सहभाग घेतला, ज्यात १७ जगद्गुरू व सर्व १३ आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीच्या समारोपाला आलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतांनी आशीर्वाद देत, त्यांना ‘देशाचे भविष्य’ असे संबोधले. तसेच, धर्म-संस्कृतीशी संबंधित विषयांवर त्यांनी केलेल्या कार्याचे आणि त्यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले.‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ संमत केल्याबद्दलही महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वानुमते संमत करून, वरिष्ठ संतांच्या शुभहस्ते मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, भोंदू खरातवर करण्यात आलेल्या कारवाईबद्दलही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करून, भविष्यात अशा भोंदूंवर कारवाई करण्यासाठी सर्व संत तुमच्या पाठीशी आहेत, असे आश्वासनही ‘अखिल भारतीय संत समिती’च्यावतीने देण्यात आले.
या बैठकीचे अध्यक्षस्थान ‘अखिल भारतीय संत समिती’चे राष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरू अविचल देवाचार्य यांनी भूषविले. मुख्य निर्देशक श्रीमहंत ज्ञानदेव सिंह, महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, ‘अखिल भारतीय आखाडा परिषद’चे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरी (महानिर्वाणी), महामंत्री महंत राजेंद्र दास, विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री मिलिंद परांडे, तसेच देशभरातील संत-महात्म्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या बैठकीत संस्थापक ब्रह्मलीन संत वामदेव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, देशभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची तयारी, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि काशी-ज्ञानवापी विषय, राष्ट्रीय एकता आणि अखंडता, धर्मांतरण व घरवापसी, जनगणना २०२७ मध्ये हिंदू हितांचे संरक्षण, देशातील हिंदू मठ-मंदिरांचे सरकारी अधिग्रहण थांबवणे, तीर्थक्षेत्रांचे संरक्षण आणि धार्मिक क्षेत्रातील पाखंडी लोकांच्या वाढत्या हस्तक्षेपावर विविध सत्रांमध्ये सविस्तर चर्चा झाली. सर्व संतांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले आणि पूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही दिवस हजेर राहात, सर्व संतांच्या मागण्या लक्षपूर्वक ऐकून व नोंदवून घेतल्या व सहकार्याची ग्वाही दिली. तर, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी तयारीचा सविस्तर आढावा सादर केला.
संतांनी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि काशी-ज्ञानवापी प्रकरणांवरील न्यायालयीन प्रक्रियेचा आढावा घेत लवकर तोडगा निघावा, यासाठी आवश्यक तयारी करण्यावरही या बैठकीदरम्यान भर देण्याता आला. देशात काही राष्ट्रविरोधी शक्ती हिंदू-संस्कृती व धर्माला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याची चिंता, संतांनी व्यक्त केली. तसेच धर्मांतरणाच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, धर्मांतरणविरोधी कायद्याचेही समर्थन केले. घरवापसी करु इच्छिणार्‍यांना सर्वतोपरी मदत करण्याचाही निर्णयही या बैठकीमध्ये संतांच्यावतीने घेण्यात आला. तसेच, ‘जनगणना २०२७’मध्ये सर्व हिंदूंनी आपला धर्म ‘हिंदू’ असा नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले. तसेच हिंदू मठ-मंदिरांवरील सरकारी नियंत्रण थांबवून, ते पुन्हा समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली.
तीर्थक्षेत्रांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण देण्याची आवश्यकता या दरम्यान अधोरेखित करण्यात आली, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी ही तीर्थस्थळे सुरक्षित राहतील. धार्मिक क्षेत्रातील पाखंडी व भोंदू साधूंच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल संतांनी नाराजी व्यक्त केली आणि माध्यमांनी अशा लोकांना प्रसिद्धी देऊ नये, असे आवाहनही केले. गोरक्षण आणि संवर्धनाबाबतही संतांनी ठोस भूमिका घेत, देशभरातील भक्तांनी गोपालनासाठी पुढे यावे असे आवाहन केले. तसेच राष्ट्रीय स्तरावर ‘गोवंश हत्याबंदी’चा कायदा करण्याची मागणीही करण्यात आली. देशातील २०० जिल्ह्यांमध्ये घटणारी हिंदू लोकसंख्या आणि बदलती लोकसंख्यात्मक परिस्थिती याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्या भागांमध्ये संतांनी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

अखिल भारतीय संत समितीसह आखाडा परिषद, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गंगा महासभा, श्रीकाशी विद्वत परिषद, त्र्यंबकेश्वर तीर्थ पुरोहित समिती, गंगा-गोदावरी पुरोहित संघ, सनातन वैदिक धर्म सभा आणि संस्कारसंवर्धिनी सभेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते.
-आचार्य तुषार भोसले

(लेखक भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आहेत.)