‘त्या’ दोघी आणि खर्गे

    09-Apr-2026   
Total Views |

Mallikarjun Kharge

'कुराण शरीफ’मध्ये साफ लिहिले आहे की, नमाज पढताना विषारी साप समोर आला, तर त्या सापाला मारा. आज रा. स्व. संघ आणि भाजप साप आहे. त्यांना मारले नाही, तर तुम्ही वाचणार नाही”- इति काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे. वाह व्वा! हेच ते राहुल गांधीचे ‘मोहब्बत’चे दुकान बरं का! मुस्लिमांना ‘कुराण’चा हवाला देऊन त्यांना रा. स्व. संघ आणि भाजप कार्यकर्त्यांना जाहीरपणे ठार मारायला सांगणारे खर्गे! यांच्या अंगात जरा जरी स्वाभिमान असता, डोक्यात बुद्धी शाबूत असती, तर ते असे बोलले नसते. कारण, खर्गेंच्या आयुष्यात जे घडले, त्यानुसार भाजप, रा. स्व. संघ विषारी साप नाही, तर हैदराबादचे ‘रझाकार’, तसेच धर्मांध कट्टरतावादी हे विषारी साप होते किंवा आहेत, ज्यांना देशात ‘शरिया’ आणायचा होता किंवा आहे.
 
असो. साल १९४६... धर्मांध ‘रझाकार’ तत्कालीन हैदराबादच्या वर्वटी गावात शिरले. त्यांनी एका घराला आग लावली. त्या घरात एक महिला, तिची तरुण मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा होता. त्याला ही बातमी कळताच, भयंकर दुःखाने रडत धावत तो घरी गेला. घराने पेट घेतला होता. त्याने त्या तिघांना वाचवायचा प्रयत्न केला; पण पत्नीला आणि मुलीला वाचवता आले नाही. इस्लामच्या राज्याच्या नावाने धर्मांधांनी लावलेल्या आगीत दोघींची राख झाली. त्यांच्या किंकाळ्या, मरणयातना सगळेच असहनीय. छे! शब्दांपलीकडचे. पण, तीन वर्षांच्या बालकाला तो वाचवू शकला. ते बालक कोण होते; तर ते होते विद्यमान काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे. आगीत क्रूरपणे जाळल्या गेलेल्या त्या दोघीजणींपैकी एकजण मल्लिकार्जुन यांची आई, तर दुसरी त्यांची बहीण. एकूण काय, तर मल्लिकार्जुन खर्गे हे चांगले नेता तर नाहीतच; पण चांगले पुत्र आणि बंधूही नाहीत. कदाचित, खर्गे यांच्या रक्तात आई-बहिणीला जिवंत उभे जाळणार्‍या धर्मांध मनोवृत्तीबद्दल तेव्हापासून जी भीती दाटून राहिली आहे, ती आजपर्यंत आहे. त्यामुळेच तर कट्टरपंथीयांना खूश करण्यासाठी ते असे बडबडतात. कल्पना करा, खर्गे यांची आई आणि बहीण त्या भयानक हल्ल्यातून वाचल्या असत्या तर? तर, आज खर्गे ज्यांचे लांगूलचालन करत ‘कुराण’चा हवाला देतात, ते पाहून दोघींनी नक्कीच खर्गेंचे थोबाड (श्रीमुख नाही म्हणायचे आहे) रंगवले असते, हे नक्कीच!
 
मनोरंजन में कोई कमी नही!

 
काही रोजगार निर्माण होत आहेत, ते फक्त चीन, व्हिएतनाम आणि चीनच्या आजूबाजूच्या देशांत,” असे उद्गार कोणी काढावेत? तर ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत, चीनने ज्यांचा विश्वासघात करत भारतावर युद्ध लादले, त्यांचे पणतू राहुल गांधी यांनी. सत्ता नाही म्हटल्यावर सैरभैर झाल्याची अतिशय विमनस्क स्थिती राहुल गांधी यांची झालेली दिसते. आता तर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखेच नेते बनणार्‍यांचेही काही खरे नाही. तेसुद्धा याच मानसिकतेचे बळी झाले आहेत. सत्तेचा उपभोग घेता येत नाही म्हटल्यावर त्यांचे विचारांवरचे नियंत्रण सुटल्यासारखे दिसते. त्यामुळेच राहुल गांधींना पाहून ‘आप आये बहार आयी’ असे म्हणणारे मराठीप्रेमी संजय राऊतही असेच काहीसे म्हणताना दिसतात. सध्या ते आंतरराष्ट्रीय राजकारणावर तारे तोडत आहेत. राहुल तिकडे चीनची प्रगती न थकता सांगतात; तर इथे त्यांचे साथीदार संजय यांनी नुकतेच पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय घडामोडीतले योगदान यावर मत मांडले.
 
"पाकिस्तानने किती प्रगती केली बघा. बघा, ट्रम्पनी पाकिस्तानचे आभार मानले, आपले विश्वगुरू कुठे आहेत, भारत कुठे आहे? भारताने का युद्ध थांबवले नाही” वगैरे वगैरे ते बोलत आहेत. आता मुद्दा असा आहे की, भारताने युद्ध का थांबवले नाही किंवा ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले, यात भारताचे काय देणे-घेणे? ट्रम्प काय बोलतात, त्यानुसार भारताचे मोठेपण आणि कर्तृत्व ठरते, असे संजय राऊत यांना वाटते का? अर्थातच, भारताची एक आंतरराष्ट्रीय भूमिका आहे. त्यानुसार, मैत्री आणि तटस्थता कुणासोबत राखावी याचे तंत्र आहे. त्याबाबत बोलून भारताला आणि भारताच्या नेतृत्वाला कमी लेखून राऊतांना काय समाधान मिळत असेल? बरं, राहुल यांनी चीनबद्दल किंवा राऊतांनी पाकिस्तानबद्दल मोदींना प्रश्न विचारला, तर याबाबत ना चीन, ना पाकिस्तान, ना ट्रम्प, ना मोदी कुणीही राहुल आणि राऊतांना गांभीर्याने घेणार नाही. पण, तरीही दोघे असली विधाने करण्यात मग्न. पण, त्यांचेतरी काही चुकत नाही म्हणा. कारण, बरोबरच आहे; त्यांनी असे केले नाही, तर कसे चालेल? ‘मनोरंजन में कोई कमी नही आनी चाहिए’ यावर ते ठाम आहेत. धन्य!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.