लोकशाहीमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाला फार महत्त्व आहे. लोकशाही सशक्त आणि निरोगी राहाण्याच्या दृष्टीने असे करणे आवश्यक असेच. जगातील अनेक देश आज लोकशाही मार्गाचा स्वीकार करत असतानाच, व्हिएतनाममध्ये मात्र एकाच व्यक्तीच्या हाती त्या देशातील सर्व महत्त्वाची पदे एकवटण्याची घटना घडली आहे. व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते तो लाम यांनी व्हिएतनामच्या राष्ट्रपतीपदाची धुरा स्वीकारताच, व्हिएतनाममध्ये सत्तेचे केंद्रीकरण नव्या टप्प्यावर पोहोचलेले दिसते.
आजवर व्हिएतनामची राजकीय रचना पारंपरिकपणे सामूहिक नेतृत्वावर आधारित होती. यामध्ये पक्ष, सरकार आणि राष्ट्रपती यांच्यातील अधिकारांचे विभाजन हे त्या प्रणालीचे वैशिष्ट्य होते. मात्र, तो लाम यांच्या निवडीमुळे हे संतुलन ढासळण्याची भीती व्हिएतनामच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रमुख आणि राष्ट्रप्रमुख ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे आल्याने निर्णय-प्रक्रिया अधिक वेगवान आणि केंद्रित होण्याची शयता अधिक. यामुळे विकासाची दिशा समांतर राहून, धोरणात्मक पातळीवर एकात्मताही दिसून येईल, यात शंका नाही.
व्हिएतनाममधील ही राजकीय घडामोड लक्षात घेता, तेथील राजकारण चीनसदृश राजकीय प्रारूपाकडे झुकताना दिसते. चीनमध्ये शी जिनपिंग यांनी ज्याप्रकारे पक्ष आणि राज्यकारभार या दोन्ही स्तरांवर सत्ता एकहाती काबीज केली आहे, तसाच समान प्रवाह व्हिएतनाममध्येही दिसून येतो. यामुळे विकासाभिमुख सुप्त हुकूमशाहीला बळ मिळते. पण, या नव्या सत्ताकेंद्रित रचनेमुळे व्हितनामच्या प्रगतीला गती मिळेल की, संस्थात्मक मर्यादा निर्माण होतील, हे भविष्यात स्पष्ट होईल.
व्हिएतनामने गेल्या काही दशकांत आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, ‘जीडीपी’च्या पातळीवर ही वाढ उल्लेखनीय अशीच राहिली आहे. मात्र, देशाचा ‘जीडीपी’ वाढत असतानाच, ग्रामीण भागातील गरिबी हीदेखील व्हिएतनामसमोरची मूलभूत समस्या. त्याचबरोबर गेली काही वर्षे व्हिएतनाममध्ये नागरिक-स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दादेखील मोठा चर्चेचा विषय झाला होता. मानवी अधिकारांबाबत भाष्य करणार्या अनेक जागतिक अहवालांमधून व्हिएतनाममधील माध्यम-स्वातंत्र्य, मानवी अधिकारांवरील गदा, भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थिरतेवर सातत्याने बोट ठेवण्यात आले होते. त्यामुळे शासन व्यवस्थेविषयीच्या जनतेमधील नाराजीने टोक गाठले होते. याचाच फायदा तो लाम यांनी घेतल्याचे दिसते.
आर्थिक दृष्टीने सध्या व्हिएतनामने कात टाकण्याचे ठरवले असून, पुढील पाच वर्षे सातत्याने दहा टक्के ‘जीडीपी’ विकासदर कायम ठेवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निर्धारित केले आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या ऊर्जा-संकटाच्या झळा व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेलाही सोसाव्या लागत आहेत. जरी २०२६च्या पहिल्या तिमाहीत त्यांचा विकासदर मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे, ७.६ टक्के इतका राहिला असला; तरी या गतीने दहा टक्के विकासवाढीचे लक्ष्य गाठणे सहजशक्य होणारे नाही. मात्र, लाम यांच्याकडे बहुमत आणि निर्णयक्षमतेची शक्ती आली असून, लाम यांनी अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्याचे निश्चित केले आहे.
व्हिएतनाम परराष्ट्र धोरणातील त्याच्या ‘बांबू डिप्लोमसी’साठी प्रसिद्ध आहे. व्हिएतनामचे कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव राहिलेल्या गुयेन फू ट्रोंग यांना या ‘बांबू डिप्लोमसी’चे श्रेय जाते. अधिकाधिक मैत्र जोडत जाण्याच्या व्हिएतनामच्या परराष्ट्र धोरणाला ‘बांबू डिप्लोमसी’ म्हणून ओळखले जाते. यासाठी लागणारी लवचीकता बांबूपासून व्हिएतनामने घेतली होती. सध्या चीन हा व्हिएतनामचा सर्वाधिक व्यापार असलेला देश असून, त्याच्याबरोबरच काही विवादही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचवेळी अमेरिका ‘सरप्लस’ व्यापारामुळे व्हिएतनामवरील दबाव वाढवत आहे. त्यामुळे सत्तेतील पदे एकाच व्यक्तीकडे आली असली, तरीही संकटेही तुल्यबळ अशीच आहेत. त्यामुळे तो लाम यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. एकूणच, व्हिएतनाममधील ही सत्ताबदलाची घटना व्यापक अर्थाने ‘राजकीय प्रयोग’ म्हणून पाहता येईल. आता तो यशस्वी होतो की, फसतो याची उत्तरे काळाच्या पोटातच दडली आहेत.
- कौस्तुभ वीरकर