‘रेजिम चेंज’; पण ट्रम्प यांचीच!

    09-Apr-2026
Total Views |

Trump

इराणी जनता आपल्या राज्यकर्त्यांवर कितीही नाराज असली, तरी कोणा बाहेरच्या शत्रू-देशाने आपल्या या अंतर्गत मामल्यात हस्तक्षेप करणे त्यांनी खपवून घेतलेले नाही. देशावर परचक्र आले असता, आपल्या राज्यकर्त्यांच्या विरोधात जाण्यास त्यांनी नकार दिला. उलट, अमेरिकेत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एका वर्षाच्या आतच ट्रम्प यांना त्यांनी स्वत:च निवडलेल्या माणसांच्या बदल्या कराव्या लागत आहेत. ट्रम्प यांच्या एकंदरच निर्णयक्षमतेवर त्यामुळे प्रश्न उपस्थित होते.

इराणमध्ये ‘रेजिम चेंज’ अर्थात सत्तापरिवर्तनाचे ढोल पिटत अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लष्करी हल्ले चढवून युद्ध छेडले खरे; पण लवकरच सारा डाव अंगलट येताना दिसू लागला. अमेरिकेसारख्या लष्करी महासत्तेला इराणने जो जबरदस्त प्रतिकार केला आणि एका महिन्यापेक्षा अधिक काळ त्या देशाला जसे झुंजवत ठेवले, ते पाहिले तर त्याच्या चिकाटीची प्रशंसाच करावी लागते.

इराणवर सुमारे ५० वर्षे कट्टर धार्मिक धर्मगुरूंची पकड असून, त्यांनी संपूर्ण देशालाच एका कारागृहाचे रूप दिले आहे. कालबाह्य झालेल्या रूढी आणि परंपरा, तसेच आजच्या काळाशी विपरीत राहणीमान टिकवून धरण्याचा त्या कट्टरवादी सत्ताधारी मुल्ला-मौलवींच्या सत्तेचा विळखा त्या देशाला पडला. त्या देशाकडे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा जितका साठा आहे तो पाहता, आतापर्यंत हा देश एखाद्या पश्चिम युरोपियन देशाइतका विकसित व्हावयास हवा होता. पण, आजही एक मागास आणि दरिद्री देश म्हणूनच तो ओळखला जातो. या कट्टर धार्मिक मानसिकता असलेल्या सत्ताधार्‍यांमुळे हा देश जगात एकटा पडला. पण, या देशाने या कट्टरतेचे दहशतवादात रूपांतर करून हा दहशतवाद अन्य देशांमध्ये निर्यात करण्यास प्रारंभ केला, तेव्हा त्या देशाची राजवट बदलण्याची गरज जगाला भासू लागली. हे काम करण्याची क्षमता फक्त अमेरिकेकडे आहे. अमेरिकेने त्या देशावर याच प्रमुख हेतूने आक्रमण केले; पण देशावर परचक्र आल्यावर देशातील जनता आपल्या राज्यकर्त्यांच्याच पाठीशी उभी राहते, ही गोष्ट अमेरिका विसरली.

अमेरिकेने दि. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर चढविलेल्या हल्ल्याच्या पहिल्याच फेरीत त्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची पहिली फळी नष्ट केली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, देशाचे लष्करप्रमुख, तसेच अन्य क्षेत्रांतील नेते या पहिल्याच भीषण हल्ल्यात ठार झाले. ज्या नेत्यांविरोधात अवघ्या दोन महिन्यांपूर्वी देशातील जनता जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होती, ती जनता आपल्या हल्ल्याचे स्वागत करील आणि आतून उठाव करून ही राजवट उलथून पाडेल, हा अमेरिकेचा अंदाज मात्र साफ कोलमडला. आपल्या राज्यकर्त्यांविरोधात जनतेत कितीही रोष असला, तरी कुणा परया देशाने आपल्या घरच्या मामल्यात हस्तक्षेप करून त्यात बदल करावा, हे इराणी जनतेला अमान्य होते. त्यामुळे अमेरिकेने आज इराणवर कितीही भीषण हल्ले केले आणि धमक्या दिल्या, तरी जनतेतून या राजवटीविरोधात साधा हुंकारही उमटलेला नाही. उलट, देशाचे वीजनिर्मिती व अणुऊर्जा प्रकल्प उडवून दिले जातील, अशी धमकी अमेरिकेने दिल्यावर जनतेने या प्रकल्पांभोवती मानवी साखळी उभी केली.
 
‘आम्ही मरायला तयार आहोत; पण तुमच्या धमकीपुढे आपण झुकणार नाही,’ हेच या साखळीने दाखवून दिले. आज दीड महिना होत आला, तरी इराणमधील कट्टरपंथी राजवट आपल्या जागी भक्कमपणे बसली आहे. खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली असली, तरी जनतेला त्यांचे नखही दृष्टीस पडलेले नाही. मात्र, त्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही. बहुतांश जनतेचा आपल्या नेत्यांवरील विश्वास अभंग आहे. उलट, इराणची राजवट बदलता-बदलता डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्याच राजवटीतील अनेक मोहरे बदलावे लागत आहेत. केवळ वर्षभरापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी विविध संस्थांच्या प्रमुखपदी नेमलेल्या व्यक्तींना तडकाफडकी काढून टाकण्याचा निर्णय ते घेत आहेत.
 
ट्रम्प हे अमेरिकी जनतेत सध्या इतके अप्रिय झाले आहेत की, आज निवडणूक झाली, तर ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष अतिशय वाईट पद्धतीने पराभूत होतील. जनतेतील ट्रम्प यांची नापसंती ७८ टक्क्यांवर गेली आहे. इतका अप्रिय नेता अमेरिकेत क्वचितच पाहायला मिळतो. केवळ जनताच नव्हे, तर ट्रम्प यांचेच अनेक सहकारीही त्यांच्या धोरणावर नाराज आहेत. त्यांच्या ‘काऊन्टर इंटेलिजन्स’ विभागाचे प्रमुख ज्यो केंट यांनी मध्यंतरी राजीनामा दिला होता. ट्रम्प यांनी आपली अंतर्गत सुरक्षा (गृहमंत्री) मंत्री क्रिस्टी नोएम यांनाच काढून टाकले. इतकेच नव्हे, तर ट्रम्प यांनी गाजावाजा करीत नेमलेली अटर्नी जनरल (म्हणजे कायदामंत्री) पॅम बोन्डी यांचीही हकालपट्टी केली. हे पद अमेरिकेचे खूप महत्त्वाचे आणि मानाचे मानले जाते. राष्ट्रपतींनंतर प्रमुख पदांच्या अनुक्रमात सुमारे चौथ्या-पाचव्या स्थानावर हे पद येते. पॅम बोन्डी यांना काढण्याचे कारण काय, तर त्यांनी म्हणे, ‘जेफ्री एपस्टिन फाईल’ प्रकरणात ट्रम्प यांचा जोरदार बचाव केला नाही.
 
इतर पदांचे जाऊ द्या. चक्क उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स हेही ट्रम्प यांच्या मर्जीतून उतरले आहेत. इराणला शरणागती पत्करण्यासाठी त्याच्याशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती व्हान्स यांच्यावर सोपविली होती. पण, त्यात व्हान्स यांना तितकेसे यश आले नाही. ‘इराण शरणागती प्रकरणात अपयश आले, तर त्याचे सारे खापर व्हान्स यांच्या कपाळावर फुटेल. पण, त्यात जर ते यशस्वी झाले; तर त्याचे सारे श्रेय माझे असेल,’ अशी दर्पोक्ती ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे सध्या व्हान्स हे पडद्याआड राहूनच काम करताना दिसतात. केवळ राजकीय नेत्यांवरच ट्रम्प यांच्या कुर्‍हाडीची धार पडलेली नाही, तर नुकतेच त्यांनी अमेरिकेचे लष्करप्रमुख रॅण्डी जॉर्ज यांचीही हकालपट्टी केली आहे. आता ज्या अन्य नेत्यांना विविध संस्थांच्या प्रमुख पदांवरून काढण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय गुप्तचर संस्थे’च्या प्रमुख असलेल्या तुलसी गबार्ड आणि ‘एफबीआय’चे प्रमुख काश पटेल यांचाही त्यात समावेश आहे.
 
ट्रम्प यांना त्यांच्या कट्टर समर्थकांचाही पाठिंबा झपाट्याने घटत चालला आहे. टीव्ही शोजमधून प्रचलित राजकीय घटनांवर भाष्य करणार्‍यांचा बराच प्रभाव अमेरिकी जनतेवर असतो. असेच एक प्रभावी वक्ते आणि ट्रम्प यांचे कट्टर समर्थक ज्यो रॉबिन, टक कार्लसन, पत्रकार मेगन केली यांनीही ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे. म्हणजे, ट्रम्प यांच्या राजवटीतच बदल होतो आहे; इराण खूपच दूर आहे!

- राहुल बोरगांवकर