संघर्षातून साकारलेले स्वप्न...

    09-Apr-2026   
Total Views |

Nitesh Misaal
 
प्रतिकूल परिस्थितीतही आशेचा किरण शोधत, स्वतःसोबतच इतरांनाही सक्षम करण्याची जिद्द बाळगणार्‍या नितेश मिसाळ यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाविषयी...

एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेला एक मुलगा... घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, सात भावंडांचे मोठे कुटुंब... आई-वडील मजुरी करणारे आणि अशातच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्षाची सावली. ही कथा आहे नितेश मिसाळ यांची, ज्यांनी स्वतःच्या वेदना शक्तीत रूपांतरित करून हजारो वंचितांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवला.
 
नितेश यांचे बालपण म्हणजे अभाव, जबाबदार्‍या आणि जिद्दीची एकत्रित कहाणी. वडिलांची तब्येत बिघडत असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी आईवर पडली होती. सात मुलांचा सांभाळ, पोटाची खळगी भरणे आणि संसाराची गाडी ओढणे ही सगळी कसरत त्यांच्या आईने एकटीने पार पाडली. गावात रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अखेर कुटुंबाने मुंबईचा रस्ता धरला. स्वप्ने मोठी होती; पण खिशात साधने नव्हती. मुंबईत आईने मिळेल ते काम करून मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान केले. नितेश यांनी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले. ते अभ्यासात हुशार होते; पण परिस्थितीने त्यांची सतत परीक्षा घेतली. एक काळ असा होता की, घरात अन्नही उपलब्ध नसायचे. अशा वेळी त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी त्यांना दुपारच्या जेवणाचा डबा देऊन आधार दिला. हे केवळ अन्न नव्हते, तर त्यांच्या आयुष्यातील पहिली ‘मदतीची प्रेरणा’ होती. नितेश यांची शिक्षणाची ओढ मात्र कधीच कमी झाली नाही. परिस्थितीशी दोन हात करत, नितेश यांनी पुढे खासगी शाळेत प्रवेश घेतला.
 
घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी पहाटे चार वाजता उठून घरोघरी पेपर टाकण्याचे काम सुरू केले. सकाळी काम आणि दुपारी शाळा, असा त्यांचा दिनक्रम. संघर्ष जरी कठीण होता, तरी त्यांची जिद्द त्याहून मोठी होती. दहावीनंतर त्यांनी माटुंग्याच्या रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि ११वी-१२वीचे आणि त्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू केले. मात्र, आयुष्याने पुन्हा एकदा कठीण वळण घेतले. फी भरता न आल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. हा प्रसंग त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक होता. स्वप्ने डोळ्यांसमोर कोसळल्याची जाणीव त्यांना खूप खचवून गेली. पण, इथेच त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ मिळाला. त्यांच्या आईने पुन्हा त्यांना उभारी दिली.
 
आपल्या वेदना इतरांसाठी प्रेरणा बनवायच्या, हा विचार नितेश यांनी आपल्या मनाशी पक्का केला. स्वतःप्रमाणेच अनेक हुशार मुले आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत, हे त्यांनी जवळून पाहिले होते. आणि तेव्हाच त्यांनी ठरवले की, आपण अशा मुलांसाठी काहीतरी करायचे. याच विचारातून २०१९ मध्ये ‘आरीन फाऊंडेशन’ची स्थापना झाली. ही संस्था वंचित आणि उपेक्षित समुदायांमधील महिला आणि मुलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करते. शिक्षण, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य आणि उपजीविका या विविध क्षेत्रांमध्ये संस्था कार्यरत आहे. आज ही संस्था दरवर्षी हजारो महिलांना आणि मुलांना आधार देते. या संस्थेचे ध्येय स्पष्ट आहे; ते म्हणजे, प्रत्येक स्त्री सन्मानाने आणि समृद्धीने जगणारा भारत घडवायचा. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगारक्षम कौशल्यांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे, हे संस्थेचे मिशन.
 
‘राईट टू एज्युकेशन’ प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती, मोफत ट्युशन आणि शालेय साहित्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असून, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी झाले आणि मुलींच्या शिक्षणात लक्षणीय वाढ झाली आहे. ‘डिजिटल साक्षरता’ उपक्रमामुळे युवक आणि महिलांना संगणक व ‘आयटी’ कौशल्ये मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ‘प्रोजेट शक्ती’ आणि ‘प्रोजेट कौशल्य’ यांच्या माध्यमातून महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जात आहे, ज्यामुळे अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. ‘प्रोजेट आरोग्य’ आणि ‘प्रोजेट गंगा’अंतर्गत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, तसेच मासिक पाळीबाबत जागरूकता निर्माण करून हजारो लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडवला आहे. याशिवाय,‘आत्मनिर्भर/रोजगार’ प्रकल्पाद्वारे लघुउद्योग प्रशिक्षण देऊन घरबसल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यात मदत केली जात आहे. या सर्व उपक्रमांचा एकत्रित परिणाम म्हणून समाजात शिक्षणाची पातळी उंचावली, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले, आरोग्याविषयी जागरूकता वाढली आणि एक आत्मविश्वासपूर्ण, स्वावलंबी व समताधिष्ठित समाज घडण्यास हातभार लागला.
 
‘आरीन फाऊंडेशन’ संस्थेला ‘प्रोजेट शक्ती’साठी ‘सर्वोत्कृष्ट महिला सक्षमीकरण व उन्नती उपक्रम’, ’प्रोजेट राईट टू एज्युकेशन’साठी ‘सर्वोत्कृष्ट शिष्यवृत्ती उपक्रम’, नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार’, ‘नवी मुंबई सेवा पुरस्कार’, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचा ‘टीबीमुक्त अभियाना’तील योगदानासाठी विशेष गौरव, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असले, तरी गरजूंच्या आयुष्यात घडणारा सकारात्मक बदल आणि त्यातून घडणारे उज्ज्वल भविष्य हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा आणि खरा पुरस्कार आहे. नितेश मिसाळ यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!
 
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक