नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसु जडं
तवापाङ्गालोके पतित- मनुधावन्ति शतशः |
गलद्वेणीबन्धाः कुचकलश-विस्त्रिस्त-सिचया
हटात् त्रुट्यत्काञ्यो विगलित-दुकूला युवतयः ॥ १३ ॥
आदि शंकराचार्यांनी ‘सौंदर्यलहरी’मध्ये जगन्मातेच्या स्वरूपाचे जे वर्णन केले आहे, ते केवळ काव्यात्म नसून ते ‘शाक्त’ उपासनेचे दर्शन आहे. हे दर्शन अत्यंत गुह्य अशी तंत्र-सूत्रे आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्य, यांचा समसमा संयोग आहे. १३व्या श्लोकात शंकराचार्य देवीच्या कटाक्षाचे अर्थात, साधकावर पडणार्या ओझरत्या दृष्टिक्षेपाचे वर्णन करत आहेत. हे वाचताना प्रथमदर्शनी एखाद्या श्रृंगारिक काव्याचा भास होतो. परंतु, या श्लोकाच्या आत ‘शाक्त’ उपासनेचा गाभा असणारे, एक अत्यंत गहन आध्यात्मिक सत्य दडलेले आहे.
आचार्य म्हणतात, "हे माते, तू एखाद्या निस्तेज, बुद्धीने जड आणि आकर्षणहीन वृद्ध पुरुषावर नेत्रकटाक्ष टाकण्याचे फळ अद्भुत आहे. तुझ्या केवळ कृपाकटाक्षाचे सामर्थ्य असे आहे की, शेकडो तरुण स्त्रिया त्याच्यावर अनुरक्त होतात. त्याच्या समीप जाण्यासाठी त्या धावत सुटतात. त्या इतया भावविव्हळ झालेल्या असतात की, आपल्या वेण्या सुटत आहेत, आपली चोळी उन्मुक्त होते आहे, आपला कमरपट्टा गळून पडतो आहे याचेसुद्धा त्यांना भान उरत नाही.” या श्लोकाला वाचल्यावर प्रथमतः हाच समज होतो की, हा श्लोक स्त्रीला वश करण्यासाठी अर्थात, वशीकरण हेतूने लिहिला आहे का? परंतु, याचा गुह्य अर्थ अत्यंत वेगळा आहे.
शाक्त-परंपरेत देवीचा कृपाकटाक्ष म्हणजे, केवळ आपल्या अबोध साधकाकडे मातृभावाने, प्रेमाने बघणे नाही. देवीचा कृपाकटाक्ष हाच एक ‘शक्तिपात’ विधी आहे. या कटाक्षाच्या माध्यमातून, शक्तीच्या कृपेचा चैतन्यप्रवाह देवीकडून साधकाकडे प्रवाहित होतो. जेव्हा जगन्माता एखाद्यावर प्रसन्न होते, तेव्हा तिची त्याच्यावर दृष्टी पडते आणि त्या कटाक्षाने त्या व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्वच बदलून जाते. हा कटाक्ष एका दृष्टीने गुरुकृपेचे, शक्तिपाताचे प्रतीक आहे. तंत्रशास्त्रात याला ‘अपाङ्गकृपा’ असे म्हटले जाते. ही दृष्टी साधकाची सुप्त चेतना केवळ जागृतच करत नाही, तर त्या चेतनेला ऊर्ध्वगामी करून त्याला जीवन्मुक्त करू शकते.
या श्लोकात वर्णिलेला वृद्ध पुरुष प्रतीकात्मक आहे. शंकराचार्य सांगतात तो ‘नयनविरस’ आहे. म्हणजे त्याच्या डोळ्यांत जगाला आकर्षित करण्याची शक्ती नाही. तो नर्मसु जड आहे म्हणजे, त्याच्याकडे सांसारिक विनोद, माया, आकर्षण यांचे साधन नाही. थोडयात, तो सर्व सांसारिक दृष्टींनी अत्यंत साधारण, निर्बल आणि निस्तेज आहे. हा वृद्ध पुरुष म्हणजे, प्रत्यक्षात निर्गुण साधक आहे; जो बाह्य जगाच्या दृष्टीने कदाचित सामान्य, निर्धन, निरलंकार आहे; परंतु ज्याच्यावर देवीचा कृपाकटाक्ष आहे, ज्याला देवीने निवडलेले आहे, साक्षात जगन्मातेची कृपादृष्टी ज्याच्यावर आहे. असा तो बाह्यरूपाने कितीही अनाकर्षक असला; तरीही त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक अलौकिक चुंबकत्व येते, जे जगाला जाणवते आणि संपूर्ण जग त्याच्या मोहात बद्ध होते. अर्थात, याचे कारण सामान्य माणसाला समजू शकत नाही; पण ही देवीच्या कृपादृष्टीने निर्माण झालेली लीला आहे.
या श्लोकाचा गुह्यभाग जाणून घेण्यासाठी, शाब्दिक प्रतीके आणि त्यामागील गहन विचार या स्वरूपात विश्लेषण करणे आवश्यक आहे. शेकडो तरुण स्त्रिया त्याच्यामागे धावतात, याचा गुह्य अर्थ फार वेगळा आहे. शाक्तदर्शनात स्त्री हे शक्तीचे प्रतीक आहे. या शेकडो युवती म्हणजे, सृष्टीतील समस्त शक्ती- पंचमहाभूते, त्रिगुण, दश महाविद्या, चौसष्ट कला; या सर्व जणू त्या साधकाच्या दिशेने ओढल्या जातात. ज्याच्यावर देवीची कृपादृष्टी आहे, निसर्ग त्याची सेवा करतो, परिस्थिती त्याच्या अनुकूल होते. संधी त्याच्याकडे आपोआप येतात. हे सारे देवीच्या कटाक्षाचे फलित आहे.
‘गलद्वेणीबन्धाः’ अर्थात, केशसांभार उन्मुक्त होतो, हे अत्यंत सूचक प्रतीक आहे. शाक्त-परंपरेत केस हे शक्तीचे प्रतीक आहेत. ‘कुंडलिनी’ जेव्हा ऊर्ध्वगामी होते, तेव्हा ती मुक्त होते. बांधलेली वेणी म्हणजे बद्ध शक्ती आणि ती सुटणे म्हणजेच शक्तीचे मुक्त होणे. देवीच्या कटाक्षाने ज्या साधकावर कृपा होते, त्याच्या सभोवतालची सर्व बद्ध शक्ती मुक्त होते, प्रवाहित होते. ‘कुचकलश-विस्त्रिस्त-सिचया’ अर्थात, कलशाप्रमाणे असलेल्या स्तनांवरील चोळी गळून पडते. हे तांत्रिक रहस्य आहे. कलश हे भारतीय परंपरेत पूर्णत्वाचे, समृद्धीचे प्रतीक आहे. देवीच्या श्रीयंत्रात कुंभ हे सृष्टीच्या उत्पत्तिशक्तीचे स्थान आहे. ‘विस्त्रिस्त-सिचया’ म्हणजे ते आवरण दूर होणे. अर्थात, ज्या साधकावर देवीची कृपा होते, त्याला सृष्टीचे रहस्य उलगडते, मायापटल दूर होते आणि शक्तीचे पूर्ण स्वरूप त्याला ज्ञात होते.
‘त्रुट्यत्काञ्यो’ अर्थात, कमरेचे दागिने तुटतात. कमरेचे दागिने म्हणजे ‘मणिपूरचक्रा’चे प्रतीक. हे चक्र इच्छाशक्ती, अहंकार आणि वासनेशी निगडित आहे. ते तुटणे म्हणजे, देवीच्या कृपाप्राप्त साधकाच्या सान्निध्यात अहंकार, वासना, त्यांचे बंध हे सगळेच गळून पडते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे त्याच्या सान्निध्यात आलेले सामान्य जनसुद्धा विकार आणि अहंकारमुक्त होतात.
‘विगलित-दुकूला’ अर्थात, दुकूल म्हणजे रेशमी वस्त्र. हे माया, आवरण, देहभाव यांचे प्रतीक आहे. याचा अर्थ, देवीच्या कृपाकटाक्षाने साधकाचा देहाभिमान, देहबुद्धी, मायेचे आवरण हे सगळेच गळून पडते. या सर्व प्रतीकांचा एकत्रित अर्थ काय? देवीचा कटाक्ष म्हणजे ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्ती-प्रवाह आहे. जेव्हा हा प्रवाह एखाद्या साधकावर कृपा-वर्षावाच्या रूपाने कोसळतो, त्यावेळी त्याचे बाह्य स्वरूप गौण होऊन, त्याच्याकडे सृष्टीतील समस्त शक्ती आकर्षित होतात.
हे आकर्षण भौतिक नसून आत्मिक असते आणि विज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर देवीच्या कृपेने साधक हा आकर्षण केंद्र बनतो. देवीची कृपा भौतिक उपचारांनी आणि कर्मकांडाच्या स्तोमाने साधणार नसून, निरहंकारी साधकाने निष्ठेने देवीच्या चरणी समर्पण केले, तर तो तिच्या कृपेचा अधिकारी होऊ शकतो; हेच या श्लोकाचे सार आहे. हा श्लोक देवीच्या अपाङ्गकृपेचे अर्थात, कटाक्षकृपेचे स्वरूप सांगणारे हे सूत्र आहे. शंकराचार्यांनी शृंगाररसाच्या आवरणात, ही अत्यंत गहन आध्यात्मिक सत्ये लपवली आहेत. हे त्यांचे कौशल्य आहे. सामान्य दृष्टीने शृंगारकाव्य वाटणारे हे श्लोक साधकाला ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि शक्तिसाधना यांचे एकत्रित दर्शन घडवतात.
देवीच्या कृपाकटाक्षांचे सामर्थ्य अन्य एका ग्रंथात फार विस्तारपूर्वक मांडले आहे. मूक कवीने रचलेले ‘मूक पंचशती’ हे काव्य अत्यंत अनुपम आहे. या काव्य ‘पंचशती’मधील ‘कटाक्ष शतक’ हे भक्त आणि भगवती यांच्यातील गूढ नात्याचे दर्शन घडवते. देवीचा कटाक्ष म्हणजे केवळ दृष्टी पडणे नसून, तर तो एका ब्रह्मांडव्यापी ऊर्जेचा सातत्यपूर्ण प्रवाह प्राप्त होणे आहे. देवी कामाक्षीचा कटाक्ष हा नीलकमळाप्रमाणे शीतल आणि मोहक आहे. ज्याप्रमाणे चंद्रप्रकाश रात्रीच्या तप्त धरेला शांत करतो, तसाच देवीचा एका क्षणाचा दृष्टिक्षेप भक्ताच्या अंतःकरणातील त्रिविध ताप (आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक) नष्ट करतो.
या कटाक्षाचे वैशिष्ट्य असे की, तो एकाच वेळी अनेक कार्ये करतो. तो अज्ञानी माणसाला ‘मूक’ असूनही ‘कवी’ बनवतो, दरिद्य्राला ऐश्वर्य देतो आणि मुमुक्षूला मोक्ष प्रदान करतो. कवी म्हणतात, हे आई, तुझ्या डोळ्यांतील ती निळाई केवळ रंगाची नाही, तर ती तुझ्या अपार करुणेची घनता आहे. देवीचा कटाक्ष हा मदनाला भस्म करणार्या शंकराच्या कोपाला शांत करून त्यांना प्रेमाने अंकित करतो, म्हणजेच तो ‘शक्ती’ आणि ‘शिव’ यांच्यातील अद्वैत साधणारा दुवा आहे.
थोडयात, देवीचा कटाक्ष हे असे अमोघ अस्त्र आहे, जे शत्रूचा संहार न करता त्याच्यातील ‘अहंकाराचा’ संहार करते आणि त्याला ज्ञानाच्या प्रकाशात न्हाऊ घालते. ज्याच्यावर हा कटाक्ष पडतो, त्याचे जीवन कृतार्थ होते; हेच या काव्याचे मर्म आहे.
(क्रमश:)
९३७००४३९०१