समाजमाध्यमांच्या डिजिटल व्यसनाधीनतेचा आनंदावर आघात...

    08-Apr-2026
Total Views |

नुकताच संयुक्त राष्ट्राने ‌‘जागतिक आनंद निर्देशांक अहवाल‌’ जाहीर केला. त्यामुळे जगातील कोणता देश अधिक आनंदी आहे हे समोर आले, तर सर्वाधिक दुःखी असलेले देशदेखील समोर आले आहेत. या क्रमवारीत आपले स्थान 147 देशांपैकी 116वे. मुळात या अहवालाकडे किती गांभीर्याने पाहायचे, याबद्दल जरूर मतभेद असतीलही; पण या अहवालाच्या पार्श्वभूमीवर निश्चित केलेल्या निकषात एक महत्त्वाचा निकष होता, तो म्हणजे समाजमाध्यमांवरील खर्च होणारा वेळ. समाजातील आनंद कमी होण्याच्या कारणाचा विचार केला, तर समाजमाध्यमांचा वाढता वापर आणि त्यामुळे जीवनातील हरवत चाललेला खराखुरा आनंद, याचा किमान विचार करण्याची गरज आहे.

वर्तमानात भारतातील तरुणाई ही समाजमाध्यमांच्या आहारी गेली आहे. समाजमाध्यमांत वेळ खर्च करून त्यांना अधिक सुख मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. हे आभासी सुख त्यांना मिळत असले, तरी जीवनातील खऱ्या आनंदाला मात्र त्यांना पारखे व्हावे लागत आहे, हे वास्तवही यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. आपला देश आनंदाच्या निर्देशांक क्रमवारीत उंचावलेला हवा असेल, तर तरुणाईने विवेकाने किती वेळ समाजमाध्यमांवर व्यतित करायचा, हे ठरवायला हवे. त्याचबरोबर सरकारनेदेखील यासंबंधी निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहायला हवे.

तरुणाईचा अधिकाधिक वेळ समाजमाध्यमांवर खर्च होतो, याचा अर्थ देशातील अधिकाधिक लोकसंख्या समाजमाध्यमांवर गुंतलेली आहे. जितकी जास्त संख्या समाजमाध्यमांवर गुंतलेली असेल, तितक्या मोठ्या प्रमाणावर समाजातील आनंदाच्या आलेखाला उतरती कळा लागणार आहे. जागतिक विविध सर्वेक्षण अहवालानुसारदेखील जगातील सर्वाधिक काळ आंतरजाल व समाजमाध्यमांचा उपयोग करणारे जे देश आहेत, त्यात भारताचा समावेश आहे. हा समाजमाध्यमांवरील वाढता काळ आनंदाचा आलेख जसा खालावत नेतो, त्याप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता, सर्जनशीलता आणि तार्किक विचार-प्रक्रियेवरदेखील परिणाम करतो. त्यामुळे आताच विचार करायला हवा.

संयुक्त राष्ट्राने विविध देशांतील आनंदाच्या निर्देशांकांचे मापन करण्यासाठी जे निकष निश्चित केले आहेत, त्यामध्ये संबंधित देशातील नागरिकांचे दरडोई असलेले उत्पन्न, संकटकाळात मिळणारी साथ म्हणजे सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, जीवन जगण्याचे स्वातंत्र्य, एकमेकाला मदत करण्याची वृत्ती म्हणजे औदार्य आणि समाजमनात भ्रष्टाचाराबद्दलची धारणा या सहा निकषांचा विचार केला गेला आहे. मात्र, या निकषांच्या बरोबरच यावेळीच्या अहवालात समाजमाध्यमांच्या प्रभावावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जे तरुण दिवसातून पाच तासांपेक्षा जास्त वेळ समाजमाध्यमांवर खर्च करतात, त्यांच्यातील आनंदाचे प्रमाण कमी झाले आहे, असा एक निष्कर्ष नोंदवण्यात आलेला आहे. विशेषतः 15 वर्षांच्या मुलांवर याचा परिणाम जास्त दिसून आला आहे. याउलट, दिवसातून एक तासांपेक्षा कमी समाजमाध्यम वापरणारे तरुण अधिक आनंदी असल्याचे आढळले आहे. या अहवालातील इतर निकषांचा विचार होत असताना, समाजमाध्यमांच्या वापरासंदर्भाने अधिक खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे.

तरुणाई तासन्‌‍तास मोबाईलवर ‌‘स्क्रोल‌’ करत असल्याचे चित्र आहे. पण, तासाभरापेक्षा जास्त काळ समाजमाध्यमांवर घालवणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूव जगभरात केलेल्या विविध संशोधनातून समोर आले आहे. समाजमाध्यमांवरील ‌‘दिखाऊ‌’ आयुष्य आणि आपली तुलना इतरांशी करणे, हे आजच्या दुःखाचे मुख्य कारण. मुळात समाजमाध्यमांमध्ये दिसणारे आयुष्य हे वास्तव नाही, हे लक्षात घेण्याची गरजच वापरकर्त्यांना वाटत नाही. सातत्याने समाजमाध्यमांवर खर्च केला जाणारा वेळ लक्षात घेतला, तर विवेकाची रेषा आपोआप आखूड होत जाते. विवेकाची वाट हरवली की, आनंदाचा आलेख कमी होत जातो.

आपल्या राज्याचा विचार केला, तर राज्यात सप्टेंबर 25 अखेर 80.29 लाख दूरध्वनीच्या जोडण्या आहेत, तर भ्रमणध्वनींची संख्या ही 1271.11 लाख इतकी आहे. याचा अर्थ, एक लाख लोकसंख्येमागे सहा हजार, 229 दूरध्वनीच्या जोडण्या उपलब्ध आहेत; तर 98 हजार, 611 भ्रमणध्वनी जोडण्या आहेत. त्याचवेळी आंतरजालाचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांची संख्या साधारण 11.36 कोटी इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यात मोबाईलची सुविधा असेल आणि आंतरजालाची जोडणी असले, तर दुःखाचा आलेख आपल्याही वाट्याला अधिक असणार यात शंका नाही. राज्यात साधारण दीड टक्के लोकांकडे मोबाईलची सुविधा नाही. अर्थात, त्यांच्याकडे नाही, याचे कारण आदिवासी, डोंगराळ, ग्रामीण क्षेत्रातील नेटवर्क सुविधा नाही, म्हणून तेथे ग्राहक असण्याची शक्यता नाही. मात्र, आपल्याकडे आनंदाचा आलेख पाहिला; तर हेच लोक अधिक सुखी आहेत, असे म्हणावे लागेल. आज आपल्या देशातील तरुणाई अधिकाधिक समाजमाध्यमांचा उपयोग करत असल्यामुळे मानसिक ताण तरुणाईच्या मनावर अधिक आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक अस्थिरता आणि महागाईचा परिणाम स्पष्टपणे दिसतो. भारतापेक्षा पाकिस्तानला पुढचा क्रमांक मिळण्याच्या कारणांमध्ये पाकिस्तानमध्ये ‌‘सामाजिक नेटवर्क‌’ आणि ‌‘अडचणीत एकत्र येणारे लोक‌’ यांचा स्तर भारताच्या तुलनेत थोडा चांगला आहे. भारतात शहरीकरण आणि एकाकी जीवनाच्या वाढत्या प्रकरणांनी क्रमवारी निर्देशांकावर प्रभाव टाकला आहे. 2026च्या ‌‘जागतिक आनंद दिना‌’ची संकल्पना ही ‌‘आनंद आणि समाजमाध्यम‌’ अशी होती, त्यातून हे परिणाम समोर आले आहेत.

आपल्याकडे शहरीकरणाचा वेग अधिक चांगला उंचावला आहे. अर्थात, एकट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर राज्यात शहरीकरणाचा वेग हा साधारण 52 टक्के इतका. शहरीकरणात औद्योगिक विकास, तसेच रोजगाराच्या संधी, कामाच्या वेळा, वाढती महागाई, यामुळे प्रचंड प्रमाणावर धावाधाव करावी लागते. ग्रामीण भागासारखे शहरी भागात मानवी नात्याचे बंध तयार होत नाहीत. अलिप्तपणा अधिक प्रमाणात जाणवतो. ‌‘फ्लॅट संस्कृती‌’मुळे विचारांची देवाणघेवाण होत नाही. सोसायटी आणि आपले घर, इतकेच काय ते विश्व. त्यातून आनंदाचे मार्ग बंद होतात. संवाद हरवण्याचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक आहे. त्याचबरोबर नातेसंबंधाचे बंधही सैल झाल्याने माणसे एकमेकांच्या जवळ नसल्याने एकाकीपणा वाट्याला अधिक येतो. शहरीकरणाचा जो सर्वाधिक वाईट परिणाम आहे, त्यात एकाकी जीवनाची वाट चालावी लागत असल्याचे प्रतिबिंबित होते आहे. त्यामुळेदेखील आनंद हरवत असल्याचे चित्र आहे. शहरी भागात नोकरीच्या संधी, त्यात पत्नी-पती दोघेही नोकरी करतात. कदाचित, आर्थिक उत्पन्न अधिक असेल; पण वाढती महागाई आणि असुरक्षितता याचा परिणाम म्हणून आनंदाच्या वाटा आपोआप अरूंद होत गेल्याचे चित्र आहे. त्यातून शहरी भागात अधिकाधिक वेळ खर्च करण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग केला जातो. ज्या देशात आणि समाजात संघर्ष आणि अस्थिरता असते, तेथे दुःखाचा आलेख अधिक उंचावलेला असतो.त्यामुळे जगात अफगाणिस्तान पुन्हा एकदा जगातील सर्वांत दुःखी देश ठरला आहे. यानंतर सिएरा लिओन, मलावी आणि लेबनॉन यांसारख्या देशांचा क्रमांक लागतो, तर सर्वाधिक आनंदी देश म्हणून फिनलंडचा क्रमांक आहे. फिनलंडने गेली नऊ वर्षे सातत्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे जगाला आनंदाच्या वाटांनी प्रवास करायचा असेल, तर फिनलंडची वाट निवडावी लागणार आहे.

माणसाच्या आयुष्यात काय मिळाले म्हणजे माणसे समाधानी होतात? असा प्रश्न विचारला, तर माणसाला अधिकाधिक भौतिक प्रगती हवी आहे. मात्र, जगात अत्यंत श्रीमंत असलेले आणि भौतिक सुख पायावर लोंटागण घालत असलेले ते लोकदेखील सुखी-समाधानी नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. पैसा खूप असला म्हणजे आनंद वाट्याला येतो, असे घडत नाही. माणसांच्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी उत्तम आरोग्य हवेच. मात्र, आरोग्य बिघडले तर किमान उपचाराच्या सुविधा अधिकाधिक उत्तम दर्जाच्या आणि विश्वासार्ह असायला हव्यात. वैद्यकीय क्षेत्रातील विश्वास माणसाला अधिक आनंदी ठेवण्याची शक्यता असते. अर्थात, जेथे आरोग्यसुविधांचा दर्जा उत्तम नसतो, त्या देशात उत्तम दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी विशिष्ट संस्था ओळखल्या जातात. तेथील उपचारासाठी अधिकाधिक पैसा ओतावा लागत असेल, तर त्या देशात भ्रष्टाचाराचा आलेख आपोआपच उंचावलेला दिसतो. मुळात हे सारे एक दुष्टचक्र आहे. हे चक्र भेदायचे असेल, तर केवळ एका निकषावर काम करून माणसे आनंदी ठेवता येणार नाहीत. त्यामुळे आनंदासाठी उत्तम आरोग्य हा महत्त्वाचा भाग आहे. त्यासोबत मूलभूत गरजा भागतील, अशी व्यवस्था प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असायला हवी. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण व्हायला हव्यात. जगण्यासाठी लागणारे पैसे यातून मिळायला हवेत. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक या गोष्टीदेखील आपल्या आनंदावर परिणाम करत असतात. व्यक्तीच्या जीवनात समजूतदार, जोडीदार हा एक महत्त्वाचा घटक आहे. मुळात आपल्या देशात कुटुंबसंस्थांना जे महत्त्व आहे, त्यामागे आनंदाचा विचार आहे. जोडीदार समजून घेणारा असेल, तर जगातील कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळत असते. आज पैसा मुबलक आहे; पण नातेसंबंधात दुरावा आला आहे. घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. मुबलक पैसा असूनही घटस्फोट होता आहेत. अशा वेळी संवादाची गरजही महत्त्वाची आहे. समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होत असल्याने प्रत्यक्ष व्यक्ती-व्यक्तीमध्ये संवाद हरवत चालला आहे. त्याऐवजी ‌‘आभासी संवादा‌’चे प्रमाण वाढले आहे. आनंदासाठी प्रत्यक्ष संवादाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. जगात जेथे समाजमाध्यमांचा प्रभाव अधिक आहे, त्या-त्या समाज व देशांमध्ये संवादाचे प्रमाण समाधानकारक नाही. त्यातून स्वतःचे छंद जोपासण्याची वाट हरवत जाते. आपल्या आवडी-निवडीसाठी अधिकाधिक वेळ देणे घडत नाही. माणसे आपले छंद हरवत चालल्याने सृजनाची वाट सापडत नाही. सृजन नाही म्हटल्यावर आनंद तरी कसा मिळणार? हा प्रश्नच आहे.

शेवटी, आपल्या आनंदाची वाट चालायची असेल; तर विवेक आणि शहाणपणाची वाट चालावी लागणार आहे. ही वाट चालणे घडत नाही. समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे आकलन, स्मरण, तार्किक क्षमता कमी होत असतील; तर त्याचा परिणाम विवेकावर झाल्याशिवाय राहात नाही. विवेक हरवला की, आनंदही हरवतो हे लक्षात घ्यायला हवे. आज व्यक्तीच्या आयुष्यात आनंद नसेल, तर समाज आनंदी असण्याची शक्यता मावळते. समाज दुःखी, तर राष्ट्र दुःखी! त्यामुळे आपल्याला आनंदी समाजासाठी समाजमाध्यमांपासून दूर जात संवादाच्या वाटांचा प्रवास करावा लागेल, अन्यथा भविष्यात मूका आणि दुःखी समाजच अनुभवावा लागेल.

- संदीप वाकचौरे
[email protected]