मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किनाऱ्यांवर यंदा कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाच्या वतीने कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे (Turtle festival). यामधील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी किनाऱ्यावर पार पडणाऱ्या पहिल्या महोत्सवाचे उद्घाटन १० एप्रिल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडेल (Turtle festival). एप्रिल-मे महिन्यात उभादांडा (वेंगुर्ले), तांबळडेग आणि मिठबाव येथे कासव महोत्सवाचे आयोजन होईल. (Turtle festival)
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १२२ किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर सागरी कासवांमधील ऑलिव्ह रिडलेच्या प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. अपवादात्मक परिस्थितीत काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवाच्या माद्या देखील अंडी घालून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २६ किनाऱ्यांवर सागरी कासव संवर्धनाचे काम केले जाते. किनाऱ्यावर सागरी कासवांनी खड्डा करुन घातलेली अंडी ही कोल्हे किंवा भटक्या कुत्र्यांकडून खाल्ले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या अंड्यांना वन विभागाच्या कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाने नेमलेल्या कासवमित्रांकडून हॅचरीत सुरक्षित ठेवले जाते. या हॅचरी भरतीच्या रेषेच्या पुढे बांधल्या जातात. याठिकाणी सुरक्षित केलेल्या अंड्यांमधून ५५ ते ६० दिवसांनी जन्मास येणाऱ्या पिल्लांना समुद्रात सोडले जाते.
आता १० एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता वेंगुर्ल्यातील वायंगणी किनाऱ्याहून सागरी कासवांची पिल्ले सोडली जातील. त्यानंतर दररोज सकाळी आणि सायंकाळी ६ वाजता किनाऱ्यांवरुन सोडण्यात येणाऱ्या पिल्लांना पर्यटकांना पाहता येईल. तसेच ३० मेपर्यंत वेंगुर्ल्यातील उभादांडा, तांबळडेग आणि मिठबाग याठिकाणी देखील कासवांचा हा जन्मोत्सव साजरा करण्यात येईल अशी माहिती कांदळवन कक्षाचे सिंधुदुर्गचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे यांनी दिली.