अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..!

महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस

    08-Apr-2026
Total Views |
chandra shekhar 
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचे भावनिक रूप मंगळवारी पाहायला मिळाले. मंत्रालयातील कामाचा दिवसभराचा व्याप आटोपल्यानंतर, रात्री आठच्या सुमारास ते आकाशवाणी आमदार निवासात पोचले. तिथे हे तेच ठिकाण आहे, जिथे बावनकुळे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील तब्बल ११ वर्षे व्यतीत केली होती. तिथे ते दीडतास थांबले. अनेकांशी भेटले. गप्पा केल्या. सुख दुःखांची देवाणघेवाण झाली. जुन्या आठवणींचा ओलावा आणि सहकाऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा यावेळी त्यांच्या भेटीतून अधोरेखित झाला.
 
आमदार निवासात प्रवेश करताच त्यांनी politely प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्वप्रथम तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांशी गप्पा मारल्या. त्यानंतर थेट कँटीनमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांची आस्थेने विचारपूस केली. "लोकांना चांगली सेवा द्या.. अन्नाचा दर्जा उत्तम ठेवा," अशा सूचनाही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. केवळ मंत्री म्हणून नव्हे, तर तिथे वर्षानुवर्षे राहिलेला एक जुना हक्काचा माणूस म्हणून ते सर्वांशी संवाद साधत होते. लिफ्टने वर जात असताना लिफ्टमनशी केलेली आपुलकीची चर्चा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. (Chandrashekhar Bawankule)
 
 
खोली क्रमांक ३१७ आणि तो संघर्ष...
 
जुन्या आठवणींना उजाळा देताना बावनकुळे काही काळ भावूक झाले होते. बावनकुळे आमदार निवासात आले ही बातमी क्षणभरात सर्वत्र पोचली आणि अनेक जण गोळा झाले. तेव्हा गप्पा करताना त्यांनी सांगितले की, "मी या आमदार निवासातील रूम नंबर ३१७ मध्ये राहायचो. अनेकदा गर्दी असायची, अशा वेळी जागा न मिळाल्याने कित्येक रात्री मी व्हरांड्यातही झोपून काढल्या आहेत. पण त्या संघर्षाच्या काळात कधीही हार मानली नाही. तोच अनुभव आणि कष्ट आज मला इथपर्यंत घेऊन आले आहेत."( Chandrashekhar Bawankule)
 
जुन्या मित्रांची भेट आणि भावनिक संवाद
 
सहाव्या मजल्यावरील रूम नंबर ६०१ मध्ये त्यांनी आमदार चरणसिहं ठाकूर आणि आमदार उमेश यावलकर यांच्यासह आपल्या काही जुन्या मित्रांची भेट घेतली. जुन्या गप्पा, तो काळ आणि सोबतचा प्रवास यावर मनमोकळी चर्चा झाली. निवासाबाहेर पडतानाही त्यांनी स्वागत कक्षातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि "काही अडचण असल्यास नक्की सांगा," असा शब्द दिला.(Aamdar Niwas)
 
आमदारांच्या सुविधेसाठी आग्रही
 
"आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांना मिळणाऱ्या रूम्सचा आकार सध्याच्या आकारापेक्षा थोडा मोठा असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना आपले कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल, यासाठी संबंधितांशी बोलून अडचणीचे विषय मार्गी लाऊ असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. काहींनी तिथे निवेदनेहो दिली. एका जबाबदार पदावर असतानाही आपल्या संघर्षाच्या जागा आणि तिथली माणसं विसरता येत नाहीत, हेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या भेटीतून दिसून आले.( Chandrashekhar Bawankule)