मुंबई :(Aditi Tatkare) अंगणवाडी पर्यवेक्षिकांवर असलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांना मिळणाऱ्या भविष्यातील संधी यांचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने, वयोमर्यादेची अट शिथिल करून योग्य मार्ग काढण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विभागाला दिल्या.
मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Aditi Tatkare)
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने होणाऱ्या विलंबामुळे पर्यवेक्षिका पदासाठीची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या सेविकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल." याशिवाय प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनश्रेणी आणि इतर सुविधा, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना, वैद्यकीय सुविधा, भाऊबीजऐवजी एक महिन्याचा पगार, रिक्त पदे भरणे, पदोन्नती आणि आजारपणाची रजा या मागण्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.(Aditi Tatkare)