मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मंडणगड येथील महाधनेश या संकटग्रस्त पक्ष्याच्या अधिवास संपुष्टात आला आहे (mandangad hornbill). कारण, मंडणगडमधील ज्या डोंगराच्या कुशीत महाधनेश पक्ष्यांच्या विणीच्या ढोल्या होत्या तिथेच मोठी वृक्षतोड झाली आहे (mandangad hornbill). त्यामुळे डोंगर ओसाड पडले असून खासगी जागेतील ही वृक्षतोड तालुक्यातील महाधनेश पक्ष्याचा अधिवास संपवण्यास कारणीभूत ठरली आहे. (mandangad hornbill)
महाधनेश या पक्ष्याला कोकणात गरुड, माडगरुड, ककणेर अशा विविध नावांनी ओळखले जाते. डिसेंबर ते एप्रिल महिन्यादरम्यान या पक्ष्याचा विणीचा हंगाम असतो. या काळात महाधनेश हे पक्षी जुन्या झाडांच्या ढोल्यांमध्ये आपली घरटी तयार करतात. महाधनेशाची जोडी दरवर्षी एकच ढोली वापरते. त्यामुळे या ढोल्या महत्त्वपूर्ण असतात. मात्र, मंडणगड तालुक्यातील वृक्षतोडीमुळे याच ढोल्या नष्ट झाल्या आहेत. तालुक्यातील मंडणगड रोडवरील देशमुख बाग जवळ शेणाळे, वाकवली आणि सोवेली येथील डोंगराच्या खोऱ्यात महाधनेश पक्षी वास्तव्यास होता. माणगावचे पक्षी अभ्यासक शंतनू कुवेसकर या पक्ष्याचे निरीक्षण त्या भागात करत होते. हा सर्व भाग खासगी मालकीचा होता. मात्र, त्याची विक्री होऊन या डोंगरावरील झाडांची तोड झाल्याने हा संपूर्ण भाग उजाड झाला आहे. त्यामुळे महाधनेशाची विण यंदा मंडणगड तालुक्यात होऊ शकलेली नाही.
महाधनेश हा पक्षी दक्षिण कोकणामध्ये तसा सर्वसामान्यपणे दिसतो. मात्र, उत्तर कोकणात त्यातही रायगडपासून उत्तरेकडे त्याचे दर्शन दुर्मीळ मानले जाते. सद्यपरिस्थितीत महाधनेशाचा वावर आणि त्याच्या विणीची नोंद रायगड जिल्ह्यात माणगावपर्यंत आहे. कोकणामध्ये बहुतांश खासगी जागांमधील जुन्या झाडांमधील ढोल्यांमध्ये महाधनेशाची विण होते. अशा परिस्थितीत आता जुनी झाडे एकसूरी लागवडीकरिता तोडली जात असल्याने त्याचा फटका धनेश पक्ष्यांना बसत आहे. परिणामी त्यांची संख्या देखील कमी होत आहे.
गेले काही वर्ष आम्ही मंडणगड रोडवरील देशमुख बाग जवळ शेणाळे, वाकवली आणि सोवेली येथील डोंगराच्या खोऱ्यात महाधनेशाच्या अधिवासाची नोंद करत होतो. मात्र, यंदा येथील जवळपास दोन ते तीन डोंगरावरील झाडांची तोड झाल्याने हा संपूर्ण भूभाग उजाड झाला आहे. परिणामी, यंदा महाधनेशाच्या विणीची नोंद झालेली नाही. - शंतनू कुवेसकर, पक्षी अभ्यासक