कोकणातील मच्छीमार समाज आणि समाज वास्तव

    08-Apr-2026
Total Views |

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला सुमारे 887.77 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील हजारो कुटुंबांची उपजीविका मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहे; परंतु बदलते हवामान, वाढता खर्च, बेकायदेशीर मासेमारी, समुद्री पर्यावरणातील बदल आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे कोकणातील मच्छीमार समाज आज गंभीर संकटांचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसायाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापक धोरण, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. या सामाजिक जाणिवेचा मागोवा घेणारा हा लेख...

समुद्राशी नाळ जपणारी पारंपरिक जीवनशैली

कोकणातील मच्छीमार समाज हा शेकडो वर्षांपासून समुद्रावर आधारित जीवन जगत आहे. कोळी, आगरी, भंडारी, मांगेला, माच्छी, वैती, गाबीत, खारवी यांसारख्या समाजांनी पारंपरिक होड्या, जाळी आणि स्थानिक ज्ञानाच्या आधारे समुद्रातील संसाधनांचा शाश्वत वापर केला आहे. मासेमारी हा केवळ व्यवसाय नसून, तो सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे. अनेक धार्मिक उत्सव, सण आणि सामाजिक कार्यक्रम समुद्राशी संबंधित आहेत. परंतु, आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक विकास आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे पारंपरिक मत्स्यव्यवसायावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

बेकायदेशीर मासेमारीचा वाढता धोका

कोकण किनारपट्टीवर ‌‘एलईडी‌’ लाईट वापरून केली जाणारी मासेमारी आणि बंदी असलेल्या ‌‘पर्ससीन‌’ जाळ्यांचा वापर हा गंभीर प्रश्न बनला आहे. या पद्धतींमुळे लहान मासेदेखील मोठ्या प्रमाणात पकडले जातात आणि समुद्रातील मत्स्यसंपत्ती कमी होत चालली आहे. यामुळे पारंपरिक होड्यांवर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अपेक्षित मासळी मिळत नाही. परिणामी, त्यांचे उत्पन्न घटते आणि आर्थिक संकट निर्माण होत आहे. याकरिता समुद्री संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी बेकायदेशीर मासेमारीवर कठोर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.

वाढता खर्च आणि आर्थिक ताण

मत्स्यव्यवसायातील उत्पादन खर्च गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिझेलचे वाढते दर, जाळी आणि उपकरणांचा खर्च, बर्फ व साठवणूक व्यवस्था, मजुरी यामुळे मासेमारीची एक फेरी करणेही महाग झाले आहे. अनेकदा समुद्रातून परतल्यानंतर मिळणारे उत्पन्न खर्चापेक्षा कमी पडते. त्यामुळे काही मच्छीमारांना कर्ज घ्यावे लागते आणि आर्थिक अस्थिरता वाढते. डिझेल अनुदान आणि आर्थिक साहाय्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी हा या समस्येवर एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.

हवामानबदलाचे वाढते परिणाम

हवामानबदलाचा परिणाम समुद्री जीवनावर आणि मच्छीमारांच्या उपजीविकेवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. अवकाळी पाऊस, अचानक येणारी वादळे, समुद्रातील लाटांची तीव्रता आणि समुद्र-पातळीतील वाढ या गोष्टी मच्छीमारांसाठी मोठा धोका ठरत आहेत. हवामानातील अनिश्चिततेमुळे समुद्रात जाण्याचे नियोजन करणे कठीण होते आणि अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे आधुनिक हवामान सूचना प्रणाली आणि सुरक्षा साधनांची उपलब्धता मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

पायाभूत सुविधांचा अभाव

कोकणातील अनेक मच्छीमार बंदरांमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध नाहीत. कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग, आधुनिक मच्छी बाजार आणि निर्यात सुविधा अपुऱ्या असल्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नाही. जर आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या, तर मत्स्यव्यवसायाचे मूल्यवर्धन होऊ शकते आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढू शकते.

महिलांचा सहभाग आणि सक्षमीकरण

मच्छीमार समाजातील महिलांचा सहभागही महत्त्वपूर्ण आहे. मासळी वगकरण, प्रक्रिया, सुकवणे आणि बाजारात विक्री या कामांमध्ये महिलांची मोठी भूमिका असते. तथापि, त्यांना आर्थिक साहाय्य, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची सुविधा कमी प्रमाणात मिळते. महिला स्वयं-साहाय्यता गट, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सूक्ष्म उद्योग यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊ शकते.

तरुण पिढीचा घटता सहभाग

आज अनेक तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी शोधत असल्यामुळे पारंपरिक मत्स्यव्यवसायाकडे कमी वळत आहेत. समुद्रातील जोखीम, अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अस्थिरता यामुळे तरुण पिढी इतर क्षेत्रांकडे वळत आहे.जर आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि आर्थिक प्रोत्साहन उपलब्ध झाले, तर तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षित करता येईल.

कोकणातील मच्छीमार समाज हा प्रदेशाच्या अर्थव्यवस्था, अन्न-सुरक्षा आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा आधार आहे. परंतु, बदलत्या परिस्थितीत या समाजासमोर अनेक गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. जर योग्य धोरणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने नियोजन केले गेले, तर कोकणातील मत्स्यव्यवसायाला नवे बळ मिळू शकते. समुद्राशी नाळ जपणाऱ्या या समाजाचे अनिकेत कोंडाजीसंरक्षण आणि सक्षमीकरण करणे ही केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक गरज आहे.

समुद्री पर्यावरणातील बदल

समुद्रातील जैवविविधतेमध्येही मोठे बदल होत आहेत. काही ठिकाणी जेलिफिशचे प्रमाण वाढल्यामुळे जाळ्यात मासळीऐवजी जेलिफिश जास्त अडकतात. तसेच समुद्रातील प्लास्टिक कचरा, औद्योगिक प्रदूषण आणि किनारपट्टीवरील विकास प्रकल्पांमुळे समुद्री पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. समुद्र हा नैसर्गिक संसाधनांचा महत्त्वाचा स्रोत असल्यामुळे त्याचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.

भविष्यासाठी आवश्यक दिशा

कोकणातील मत्स्यव्यवसाय टिकवण्यासाठी सरकार, संशोधन संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे.

बेकायदेशीर मासेमारीवर कठोर नियंत्रणमच्छीमारांना डिझेल आणि उपकरणांवर अनुदान

आधुनिक मच्छीमार बंदरे आणि ‌‘कोल्ड स्टोरेज‌’ सुविधा मच्छीमार युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

समुद्री पर्यावरण संरक्षणासाठी ठोस उपाय

महिला मच्छीमारांसाठी आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य

- अनिकेत कोंडाजी
7057305287