काँग्रेसचा श्वास

    08-Apr-2026   
Total Views |

"आम्ही सर्व काँग्रेसच्या तालमीतच मोठे झाले आहोत. एवढेच नाही, तर या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करीत होते, यात काँग्रेस पक्षाने आपण जो मोकळा श्वास घेतोय, तो श्वास आणि स्वातंत्र्य हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षाचे योगदान फार मोठे राहिले आहे," असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच केले. आता सुप्रियाताईंना एकाएकी काँग्रेसचा पुळका येण्याचे औचित्यही तितकेच महत्त्वाचे. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. सुनेत्रा पवार यांनी महायुतीतर्फे अर्जही दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्नही केले. परंतु, काँग्रेसने आकाश मोरे यांना बारामतीच्या रिंगणात सुनेत्राताईंविरोधात उतरविले. शरद पवार गटाने या निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही. परंतु, ‌‘काँग्रेसला आपला उमेदवार पोटनिवडणुकीत उतरवण्याचा अधिकार आहे,‌’ असे वक्तव्य करीत शरद पवारांनी ‌‘बाहेरच्या‌’ सूनबाईंपेक्षा अप्रत्यक्ष काँग्रेसचेच समर्थन केले. मग त्याचीच ‌‘री‌’ ओढत काँग्रेसची महानता दर्शविण्यासाठी, सुप्रियाताईंनी स्वातंत्र्यसंग्रामातील काँग्रेसच्या योगदानाचा पाढा वाचला. “काँग्रेसमुळे आपण आज श्वास घेतोय,” अशा आशयाचे विधान करून, आपण अजूनही विचारांनी कसे आणि किती काँग्रेसीच आहोत, हेच दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुप्रियाताईंनी केला. परंतु, इतिहासात डोकावून पाहिले असता, काँग्रेसचा महाराष्ट्रात राजकीय श्वास कोंडण्यात शरद पवारच आघाडीवर होते, हे वास्तव कदापि नाकारुन चालणार नाही.

पण, ताई म्हणतात तसे ‌‘श्वास आणि स्वातंत्र्य‌’ हे काँग्रेस पक्षाची देशाला देण असेल, तर त्याच काँग्रेस पक्षाचा त्यांच्या पिताश्रींनी वेळोवेळी श्वास का रोखला? 1978 साली वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसचा श्वास कोणी कोंडला? 1986 साली पुन्हा पवारसाहेब काँग्रेसच्या श्वासाशी एकरूप झाले खरे. पण, 1999 साली त्यांना सोनिया गांधी या ‌‘परदेशी मुळा‌’च्या असल्यामुळे त्यांना पाठिंबा देता येणार नाही म्हणत, पुन्हा काँग्रेसच्या श्वासाशी फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. असे असले तरी पुढे केंद्रात, राज्यात त्याच सोनिया गांधींचे नेतृत्व शरद पवारांनी मान्यही केले आणि सत्तासुखही अनुभवले.

पवारांचा निश्वास

याच शरद पवारांनी “काँग्रेसची स्थिती ही जमीन न उरलेल्या जमीनदारासारखी झाली आहे,” अशा शब्दांत काँग्रेसच्या सरंजामशाही वृत्तीचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर ‌‘लोक माझे सांगाती‌’ या आत्मचरित्रातूनही शरद पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या सत्तेत वाटा मिळण्याचा अंदाज आल्यानंतर काँग्रेसकडून दबावाचे राजकारण सुरू झाल्याचे पवार यांनी पुस्तकात नमूद केले. तसेच काँग्रेसचा उल्लेख त्यांनी थेट ‌‘अहंकारी‌’ असा केला. राहुल गांधींमध्येही नेतृत्वाच्या सातत्याचा अभाव असल्याचे सांगत, काही मुद्द्यांवरून पवारांनी काँग्रेसला समर्थन दिले, तर ‌‘अदानी‌’ प्रकरणावरून मात्र त्यांचे मतभेद कायम आहेत. अशा एक ना अनेक, शरद पवारांनी काँग्रेसवर केलेल्या टीकांच्या, त्यांच्या परस्पर विरोधी भूमिकांच्या, त्यांच्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसोबतच्या सुप्त संघर्षाच्या कहाण्या तर सुपरिचित. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा एवढाच की, पवारांनी ‌‘काँग्रेस‌’च्याच नावाने जवळपास सहा दशके राजकारण केले असले, तरी काँग्रेसला वेळोवेळी जागा दाखवण्याची, महाराष्ट्रातील काँग्रेसची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सूत्रे आपल्याच हाती ठेवण्याची एकही संधी सोडली नाही, हेही तितकेच खरे! आज त्याच काँग्रेसने बारामतीत, पवारांच्याच बालेकिल्ल्यात, पवार कुटुंबीयांविरोधात उमेदवार दिल्यानंतरही शरद पवारांना त्यात काहीएक गैर वाटत नाही. पवार म्हणतात, “अजित पवार अकाली गेले, त्याचे दुःख कुटुंब म्हणून आम्हाला आहे. पवारांमध्ये कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्याला लढवायची नाही, असे आम्ही ठरवले.” पण, याच पवारांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने बारामतीत उमेदवार उभा केला, त्याला मात्र पवारांचे समर्थन! मग पवार जर खरोखरच कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत आहेत, तर त्याच नात्याने, काँग्रेसला वडिलकीचा सल्ला देऊन त्यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध का केली नाही? असंही सुनेत्रा पवार बारामतीतू निवडून येतीलच. मग साहेबांनी पक्षभेद विसरून कुटुंबप्रमुख म्हणून इथेही औदार्य दाखवण्यात अडचण ती काय? एकीकडे राज्यसभेची स्वत:ची निवडणूक पवारांनी बिनविरोध केली, तर दुसरीकडे कुटुंबप्रमुख म्हणून सुनबाईंना लढण्यास भाग पाडून, स्वत: नामानिराळे राहत निश्वासही सोडला. असे हे पवारांचे कावेबाज राजकारण!


विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची