महायोगिनी, महाशिवशरणी अक्कमहादेवी

    08-Apr-2026
Total Views |

12व्या शतकातील अभूतपूर्व वैराग्याची साकार मूत अक्कमहादेवींची जयंती चैत्र पौर्णिमा तिथीला संपन्न झाली. महायोगिनी, त्रिभुवनसुंदरी, साक्षात पार्वतीच्याच रूपात अवतरलेली आणि चन्नमल्लिकार्जुनाची निस्सीम भक्त असलेली आद्य कवयित्री यांचं दिगंबरावस्थेतील जीवन आणि वचन, साहित्यातील कार्याची ओळख, शिकवणीचाही परिचय करुन देणारा हा लेख...

महायोगिनी, त्रिभुवनसुंदरी, साक्षात पार्वतीच्याच अवतारातली सौंदर्याची देवीच जणू, अत्यंत कुशाग्र बुद्धी लाभलेली, वीरशैव साहित्यातील आद्य कवयित्री, अभूतपूर्व वैराग्याची साकार मूत, मधुराभक्तीत पूर्णपणे तन्मय झालेली, शिवभक्तीत पूर्णतः मग्न झालेली ‌‘महाशिवशरणी‌’ म्हणून सुविख्यात असलेल्या अक्कमहादेवी यांची चैत्र पौर्णिमेला जयंती असते. अक्का म्हणत की, “मला अनेक नावांनी ओळखले जाते. पण, मी स्वतःला एकाच नावाने ओळखते- ‌’चन्नमल्लिकार्जुनाला‌’ वाहिलेला आत्मा! माझे खरे आई-वडील म्हणजे शिव आणि त्याची कृपा. लहान वयातच मी जाणले होते की, हा देह, हे सौंदर्य, हे वैभव सगळेच केवळ क्षणिक आहे. मात्र, शाश्वत असणारे केवळ अनुभवच आहेत. माझ्यासाठी पती निवडला जात होता. पण, मी केवळ मल्लिकार्जुनालाच माझा पती मानले होते आणि विवाह केला होता. लौकिक बंधनं मला थांबवू शकली नाहीत, राजवैभव पण मला रोखू शकले नाही. माझ्या मनात कधी काम जन्मलेच नाही, देहाच्या पलीकडे जाऊन मी शिवानुभव आपलेसे केले होते,” असे अक्का म्हणत असत.

अक्कमहादेवी यांच्या जन्मस्थळाबद्दल, आई-वडिलांबद्दल, इच्छा नसतानाही काही अटींवर राजा कौशिकाशी विवाह यासंदर्भात खूपशी मत-मतांतरे आहेत. तरीही, असे म्हणतात की, 12व्या शतकात त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील
शिवमोग्गा जिल्ह्यातील उडुतडी येथे झाला. सुमती आणि निर्मलाशेट्टी हे त्यांचे आई-वडील मोठे शिवभक्त होते. यामुळेच लहानपणापासूनच अक्कमहादेवींच्या मनात शिवभक्तीची गोडी निर्माण झाली. सती-पतीभावाची विशेष भक्ती त्यांच्या अंतःकरणात दृढ होत गेली. त्यांनी लौकिक जगाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आणि आपले जीवन आध्यात्मिक तत्त्वावर पूर्णपणे अधिष्ठित केले. वैराग्यनिधी ठरलेल्या त्या महान ‌‘शिवशरणी‌’ होत.

अक्कमहादेवींचे आराध्यदैवत

चन्नमल्लिकार्जुन. कन्नड भाषेत ‌‘चन्न‌’ शब्दाचा अर्थ होतो, ‌’अत्यंत देखणी स्त्री किंवा पुरुष‌’. विश्वाचेही आराध्य असणारे शिवाचे हे मोहक ‌‘चन्नमल्लिकार्जुन‌’ रूप बालपणापासूनच बालयोगिनी अक्कांच्या मनावर कोरले गेले होते. तोच त्यांचा पती-परमेश्वर बनून उरला होता-

श्वासांचा परिमळ असता
कुसुमाची गरज काय?
क्षमा-शांती-धैर्य-सहनशीलता असता
समाधीची गरज काय?
जगच आपले झाले असता,
एकांताची गरज काय चन्नमल्लिकार्जुना?


नितांत सुंदर अक्कमहादेवींवर मोहित झालेला कौशिक राजा तिच्याशी विवाह करण्याचा हट्ट धरतो. तेव्हा अक्कमहादेवी मोठ्या धैर्याने राजाज्ञेस नकार देते. राजा महादेवीच्या प्राप्तीसाठी तिच्या आई-वडिलांना त्रास द्यायला सुरू करतो, तेव्हा मात्र नाईलाजाने अक्का काही अटी घालून राजा कौशिकशी विवाह करते. महादेवींनी घातलेल्या तीन अटी अशा- 1.

अक्कमहादेवींना तिच्या सद्गुरूंना कधीही भेटण्याची मुभा द्यावी. 2. राजवाड्यात शिवभक्तांना कधीही येण्याची परवानगी असावी. 3. ती जेव्हा लिंगपूजेत मग्न असेल, तेव्हा प्रत्यक्ष राजानीसुद्धा त्यात व्यत्यय आणू नये.

या तीन अटींपैकी कोणतीही अट भंग झाल्यास तत्क्षणी मी राजवाड्याबाहेर पडेन, असे निर्वाणीचे बोल बोलत महादेवी राजवाड्यात प्रवेश करतात. विषयासक्त झालेला राजा कौशिक जास्त दिवस संयम बाळगू शकत नाही. मान्य केलेल्या अटी तो विसरतो. राजा महादेवीच्या सौंदर्य अभिलाषेने, ध्यानमग्न अक्कमहादेवींचा पदर धरण्याचा प्रयत्न करतो. अक्का त्याच क्षणी निर्णय घेते आणि अंगावरील केवळ साडीचाच नव्हे, तर दागदागिने, वस्त्र-प्रावरणे सर्वांचा त्याग करते आणि ‌‘दिगंबरा‌’ होऊन राजवाड्यातून बाहेर पडते. महादेवीला दिगंबरावस्थेत पाहून राजा शरमतो. दुखावलेली; पण दृढनिश्चयी अक्का दिगंबरावस्थेत, केवळ त्यांच्या सुंदर आणि लांबसडक केशसंभाराने शरीर झाकून घेते आणि बाहेर निघते.

वीरशैव लिंगायत संप्रदायाचे थोर

समाजसुधारक आणि लोकशाही विचारसरणीचे जनक महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या धार्मिक आणि आध्यात्मिक लोकसंसद ‌‘अनुभवमंटपा‌’तील श्रीअल्लमप्रभू, श्रीबसवेश्वर इत्यादी शिवशरणांच्या बरोबर झालेल्या त्यांच्या धार्मिक व तात्त्विक चर्चेतून त्यांची त्या क्षेत्रातील प्रगल्भता प्रत्ययास येते. इतर शिवशरणी, शिवशरणांप्रमाणे त्यांनी आपल्या वचनांतून तत्कालीन समाजातील म्हणजेच, 12व्या शतकातील दुष्ट रूढी, बाह्य अवडंबर, दांभिकता व अंधश्रद्धा यांच्यावर परखडपणे टीका केली आहे. मुख्यतः शिवैकनिष्ठा, नितांत श्रद्धा इत्यादी तत्त्वे आपल्या वचनांतून त्यांनी प्रतिपादिली आहेत. त्यांच्या रचनेत माधुर्य, भावनोत्कटता व रसोत्कटता, तसेच आर्तता, भावरम्यता, दृष्टान्ताची समर्पकता व सहजता, सदाचार, स्त्री-स्वातंत्र्य, पराकोटीचे वैराग्य, सत्संग हे गुण विशेषत्वाने आढळतात. प्रामुख्याने आपले आराध्यदैवत ‌‘चन्नमल्लिकार्जुनां‌’चा त्यांनी आपल्या वचनांत उल्लेख केलेला आढळून येतो -

नडे शुचि, नुडि शुचि, तनु शुचि
मन शुचि, भाव शुचि
इती पंचतीर्थंगळनोळकोंडु मर्त्यदल्लिनिंद
निम्म शरणर तोरी एन्ननुळुहिकोळ्ळा
चन्नमल्लिकार्जुना!


भावार्थ : आचारशुद्धी, वाणीशुद्धी (वाचाशुद्धी), देहशुद्धी, मनशुद्धी, भावशुद्धी अशी पंचतीर्थे आपल्या अंतःकरणात सामावून या मृत्युलोकात वास करणाऱ्या आपल्या शिवशरणांचे दर्शन घडवून, हे चन्नमल्लिकार्जुना, माझे रक्षण करा. 12व्या शतकातील एक अत्युच्च भक्तिमार्गाचा प्रसार करणारी स्त्रीमुक्तिवादी संत म्हणून अक्कामहादेवीला ओळखले जाते. कन्नड संतसाहित्यात त्यांनी आपल्या जवळजवळ 345 वचनांची अनमोल भर घातली आहे. कर्नाटक सरकारने प्रकाशित केलेल्या ‌‘समग्र वचन संपुट 5‌’मध्ये ही सर्व वचने समाविष्ट केली गेली आहेत.

धर्माच्या दांभिकतेवर कडाडून टीका, समतेचा विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न, समाजात स्त्रियांना नगण्य स्थान असण्याच्या काळात त्यांनी धाडसाने स्त्री-सबलीकरण व साक्षात्कारासाठी तळमळीने जे कार्य केले, त्यासाठी त्यांचा गौरव होतो. त्यांना बसवण्णा, चन्नबसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमप्रभू, सिद्धराम यांसारख्या शिवशरणांनी सन्मानाचे एक प्रतीक म्हणून ‌‘अक्का‌’ म्हणजे ‌‘मोठी बहीण‌’ ही उपाधी दिली. आपल्या जीवनात सुख-दुःख, आशा-निराशा, निंदा-स्तुती, चढ-उतार असतातच. पावलोपावली संघर्ष हा करावाच लागतो, तो कुणालाच चुकला नाही. जीवनातील संकटांना समर्थपणे सामोरे गेले पाहिजे. यासंदर्भात अक्काचे एक समर्पक वचन -

घर केले जर गिरीवरती,
बाळगावी का पशुंची भीती?
घर केले जर सागरतटी,
बाळगावी का लाटांची भीती?
घर केले जर भर मंडईत,
कोलाहलाने का व्हावे लज्जित?
ऐक बा चेन्नमल्लिकार्जुना,
जन्मल्यावरी या जगती,
येता जरी निंदा नि स्तुती,
मनी न होता कोपायमान,
चित्ती असो द्यावे समाधान.


कन्नड भाषेतील विचारवंत एम. आर. श्रीनिवास मूत अक्कमहादेवींबद्दल म्हणतात, महादेवी अक्काचे जीवनचरित्र म्हणजे स्त्रीच्या आत्मगौरवाची, स्त्री-स्वातंत्र्याची आणि तिच्या पारमार्थिक जीवनाची एक गाथाच आहे. माझी जन्मदात्री अक्कमहादेवीच्या रूपात येत आहे, असे म्हणत महात्मा बसवेश्वरांनी अक्कांचे स्वागत ‌‘अनुभवमंटपात‌’ केले होते. म्हणजे, बसवण्णांनी अक्कांना आपल्या मातेसम मानले होते, असे व्यक्तिमत्त्व होते अक्कमहादेवींचे. स्त्री ही केवळ वस्तू नसून, ज्ञान आणि भक्तीचा महासागर आहे. स्त्रीच्या सौंदर्याला केवळ वस्तू म्हणून बघण्याच्या दृष्टीला मी ‌‘दिगंबर‌’ होऊन उत्तर दिले आहे. माझ्या देहाला माझा अनुभव म्हणून बघा, असे अक्का म्हणत असत. माझे काव्य, वचन हे अनुभवाचा अग्नी आहेत, त्यात माझा जीवही आहे आणि माझा शिवही आहे.

असे म्हणतात की, आपला प्रवास, आपले कार्य संपल्यानंतर श्रीशैलमल्लिकार्जुन क्षेत्राजवळील कदलीवनात त्या आपले आराध्यदैवत चन्नमल्लिकार्जुनाशी एकरूप, लिंगैक्य झाल्या होत्या. येथेच त्यांचे शेवटचे वचन होते-

इंद्रनीलाचा पर्वतगिरी चढुनी
चंद्रकांता शिलेला मिठी मारूनी
तुमच्या आठवणीत
झुरते आहे शिवा.
अंगभेद मतभेद नष्ट करुनी
तुमच्या चरणी शरण
मी मल्लिकार्जुना.

अक्कमहादेवी म्हणजे केवळ इतिहास नाही, केवळ कथा नाही, स्त्रीच्या आत्म्याचे स्वातंत्र्य, धैर्ययुक्त भक्ती आणि अनुभवाचे शिखर होते.

अक्कमहादेवींची प्रमुख शिकवण


स्त्री ही केवळ वस्तू नसून, ती ज्ञानाचा आणि भक्तीचा महासागर आहे.

ईश्वराची भक्ती ही बाह्य अवडंबरापेक्षा अंतर्मनाची शुद्धी आहे.

सत्य मार्गावर चालताना जगाच्या टीकेची पर्वा करू नये.

आकाशाची उंची मोजता येईल. पण, शिवभक्ताच्या भक्तीची खोली मोजता येणार नाही.

- शिल्पा स्वामी-निंबाळकर
8390587788