चित्रसखा ‌‘श्रीधर‌’

    08-Apr-2026   
Total Views |

चित्रकलेचे विद्यार्थी घडवताना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देणाऱ्या चित्रकार श्रीधर बादेकर यांचा कलाप्रवास उलगडणारा हा लेख...

पाण्यावर अगदी अलगद विहार करणारे शांत बदक आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे. मात्र, ती स्थिरता गाठण्यासाठी त्याला पाण्याखाली किती संघर्ष करावा लागतो, याची माहिती आपल्याला नसते. कलाकारांची, चित्रकारांचीसुद्धा काहीशी अशीच अवस्था. रंगमंचावरचा एखादा प्रवेश काळजाचा ठाव घेणारा असतो. मात्र, त्यासाठी त्या कलाकाराने जीवाचं रान केलेलं असतं. तसंच एखादं चित्र डोळ्यांना इतकं भावतं की, त्याची नितळता मनावर गारुड करते. मात्र, कोऱ्या कागदावर चित्र काढण्याच्या आधी, ते चित्र असंख्य वेळा चित्रकाराच्या मनामध्ये आकार घेत असतं. ती निर्मितीची, सृजनाची प्रक्रियासुद्धा अनेक संघर्ष जन्माला घालते. एका चित्रकाराला या अनुभवामधून जावंच लागतं. मात्र, या अनुभवाचं रूपांतर अनुभूतीमध्ये होण्यासाठी गरज असते, ती एका गुरूची. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना याच अनुभूतीची साद घालणारे चित्रकार म्हणजे श्रीधर बादेकर.

कोकणच्या मातीने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशालासुद्धा हिरे दिले. सागरीकिनारा, निसर्गाची समृद्धी आणि ध्येयनिष्ठ माणसं यांचा सुरेख संगमच इथे जुळून आला. अशा या कोकणभूमीत 1957 साली श्रीधर बादेकर यांचा जन्म झाला. निसर्गाच्या सान्निध्यात आणि निसर्गातील रंगसंगतींमध्येच त्यांना त्यांच्या जीवनाचा सूर सापडला. मात्र, त्याकाळी आजच्या इतकी साधनं गाव-खेड्यांमध्ये नसल्यामुळे त्यांना मुंबईची वाट धरावी लागली. मुंबईतील कलेची पंढरी म्हणजे ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स‌’. श्रीधर यांना ‘जे.जे.‌’मध्ये प्रवेश घ्यायचा होता. मात्र, विद्यार्थी पदसंख्या भरल्यामुळे त्यांना प्रवेश घेता आला नाही. अशातच त्यांनी ‌‘बॅण्ड्रा स्कूल ऑफ आर्ट्स‌’ला प्रवेश घेतला आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. प्रा. दत्तात्रय परुळेकर त्यांच्या आयुष्यात आले आणि एका कलाकाराच्या सृजनाचा एक अत्यंत वेगळा प्रवास सुरू झाला. ‌‘फाईन आर्ट्स‌’ शाखेसाठी त्यांनी प्रवेश घेतला आणि शिक्षणाची एक नवी पाऊलवाट जन्माला आली. ‌‘कॅलिग्राफी‌’, ‌‘स्टील लाईफ‌’ अशा विविध घटकांचं ज्ञानग्रहण करताना श्रीधर यांची स्वतःची एक दृष्टी विकसित झाली.

आपल्या त्या काळातील आठवणींना उजाळा देताना श्रीधर सांगतात की, “प्रा. दत्तात्रय परुळेकर हे स्वतः एक निष्णात चित्रकार तर होतेच. मात्र, त्याचबरोबर एक उत्तम शिक्षक आणि गुरूसुद्धा होते. प्राचार्य पदावर असतानासुद्धा त्यांनी केवळ पदापुरती कामं केली नाहीत. उलट, जास्तीत-जास्त काळ ते विद्यार्थ्यांमध्ये राहायचे, रमायचे. हातात ‌‘कॅनव्हास‌’ घेऊन विद्यार्थ्यांना ते ‌‘करेक्शन‌’ सांगत. शनिवार-रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा दिवस. मात्र, परुळेकर व त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस म्हणजे नव्या गोष्टी शिकण्याची संधी होती. निसर्गचित्रं काढायची असतील, तर आधी त्या निसर्गामध्ये वावरलं पाहिजे, आपला भोवताल आपल्याला निरखून पाहता आला पाहिजे, असा विचार ते विद्यार्थ्यांमध्ये उतरवायचे. माडाचं झाड जर कागदावर उतरवायचं असेल, तर त्या झाडाच्या सावलीलासुद्धा तितकंच महत्त्व आहे, इतका सूक्ष्म विचार त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. चित्रकार ज्यावेळेला तयार होत असतो, त्यावेळी त्याच्या शैलीसोबत त्याची दृष्टीसुद्धा तयार व्हावी लागते. प्रा. परुळेकरांनी हीच दृष्टी घडवण्याचं काम केलं. श्रीधर बादेकर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आणि शिक्षणानंतर त्यांच्या व्यावसायिक जीवनाचा शुभारंभ झाला. ‌‘डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन‌’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कामानिमित्त वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची श्रीधर यांना संधी मिळाली.

1970 आणि 80च्या दशकांमध्ये चित्रपटांचे, जाहिरातींचे भले थोरले होर्डिंग्ज, पोस्टर हे सर्व काम चित्रकार अगदी आपल्या हाताने करायचे. सुरुवातीच्या काळात एन. आर. भोसले यांच्याकडे श्रीधर यांनी काम केलं. त्यानंतर डी. विश्वनाथ यांच्याकडेसुद्धा कामाचा अनुभव घेतला. याकाळात चित्रांच्या व्यावसायिक जगाशी त्यांचा परिचय झाला. केवळ शिकण्याच्या हेतूने अनेकदा वडापाव खाऊन त्यांनी दिवस काढले. ग्रॅण्ट रोड येथील ‌‘चित्रकला निकेतन‌’मध्ये सुद्धा काहीकाळ काम केलं. पुढे व्यावसायिक कामांची संधी मिळत गेली. श्रीधर दिवसेंदिवस नवनवीन तंत्र अवगत करत होते. अशातच पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात प्रा. परुळेकर यांनी प्रवेश केला. श्रीधर बादेकर यांनी विद्यार्थांना शिकवावं, असा विचार त्यांनी मांडला. पुन्हा एकदा चित्रकलेचा शिक्षक म्हणून श्रीधर बादेकर यांचा नवा प्रवास सुरू झाला. ‌‘बॅण्ड्रा स्कूल ऑफ आर्ट्स‌’चं रूपांतर नंतर ‌‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स‌’मध्ये झालं. 30 वर्षांहून अधिक काळ त्यांनी या वास्तूमध्ये हजारो विद्यार्थ्यांना घडवलं. चित्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते झटत असतात. मध्यंतरी दिवंगत चित्रकार शिवाजी तुपे यांच्या चित्रांचं प्रदर्शन ज्यावेळी त्यांनी आयोजित केलं होतं, त्यावेळी त्यांच्या या अभिनव उपक्रमाचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. श्रीधर बादेकर स्वतः निसर्ग चित्रकार आहेत. आपल्या चित्रांच्या माध्यमातून निसर्गातील अमूर्त तत्त्व ते लोकांसमोर मांडतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या काळामध्ये चित्रकलेतील अस्सलपणा टिकून राहावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. हा अस्सलपणा कसा टिकून राहील, यासाठी ते मुलांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या चिरंतर चित्रप्रवासासाठी त्यांना दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या शुभेच्छा!

9967826983

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.