‘धुरंधर २’ पाहून भारावले विराट-अनुष्का, रणवीर-आदित्यचं केलं तोंडभरुन कौतुक

    07-Apr-2026
Total Views |

मुंबई : ‘धुरंधर २’च्या चाहत्यांच्या यादीत आता क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या पॉवर कपलचीही भर पडली आहे. सोमवारी दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया शेअर केल्या. दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांनीही त्यांच्या या मनापासूनच्या कौतुकाला प्रतिसाद देत आभार मानले.

अनुष्का शर्माचे कौतुक; आदित्य धर यांचा प्रतिसाद

अनुष्काने आदित्य धर यांना टॅग करत लिहिले, “तुम्ही एक अप्रतिम चित्रपट तयार केला आहे. जवळपास चार तासांचा चित्रपट बनवण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. हा चित्रपट रंजक, गुंतवून ठेवणारा आणि अत्यंत बारकाईने घडवलेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. तुम्ही एक वेगळ्या धाटणीचे आणि आत्मविश्वासपूर्ण दिग्दर्शक आहात.”

पुढे तिने रणवीर सिंगच्या अभिनयाचेही कौतुक करत लिहिले, “तू आयुष्यात एकदाच मिळणाऱ्या संधीसारखा या भूमिकेला न्याय देत उत्कृष्ट आणि निर्दोष अभिनय साकारला आहे.”

तसेच तिने चित्रपटातील आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी यांच्यासह सर्व कलाकारांचे कौतुक केले. “प्रत्येक कलाकाराचा अभिनय परिपूर्ण आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन,” असे ती म्हणाली.

यावर आदित्य धर यांनी उत्तर देताना म्हटले, “तुमच्यासारख्या उत्कृष्ट कलाकाराकडून असे कौतुक मिळणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद अनुष्का. यामुळे आम्हाला आणखी चांगल्या आणि मनाला भिडणाऱ्या कथा सांगण्याची प्रेरणा मिळते.”

Latest and Breaking News on NDTV

विराट कोहलीची प्रतिक्रिया; आदित्य धर यांचे कौतुक

विराट कोहलीनेही चित्रपटाचे जोरदार कौतुक करत लिहिले, “आज हा चित्रपट पाहिला आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर भारतात असा सिनेमॅटिक अनुभव मी यापूर्वी कधीच पाहिला नाही. जवळपास चार तास मी एकदाही नजर हटवली नाही. आदित्य धर, तुमची प्रतिभा आणि आत्मविश्वास या चित्रपटातून स्पष्ट दिसतो. तुम्ही जीनियस आहात.”

रणवीर सिंगच्या अभिनयाबद्दल तो म्हणाला, “सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे, पण रणवीर सिंग या चित्रपटानंतर वेगळ्याच स्तरावर पोहोचला आहे. त्याचा अभिनय खरोखरच अप्रतिम आहे.”

यावर आदित्य धर यांनी विराटला ‘लेजेंड’ म्हणत उत्तर दिले, “विराट, हे खरंच अविश्वसनीय आहे. अंडर-१९ विश्वचषकापासून मी तुमचा चाहता आहे. देशासाठी तुम्ही जे करता, त्यातून आम्हालाही प्रेरणा मिळते. आम्हीही आमच्या चित्रपटांमधून भारताचा अभिमान वाढवण्याचा प्रयत्न करू.”

Latest and Breaking News on NDTV

‘धुरंधर २’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी

धुरंधर २ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने एकाच भाषेतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान पटकावला. या चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांत पहिल्या भागाची एकूण कमाई मागे टाकली. प्रदर्शनाच्या १८व्या दिवशी ‘धुरंधर २’ने भारतात १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. तर पुष्पा २ या चित्रपटाने हा टप्पा १६ दिवसांत गाठला होता.