वेदनांची वारी संपविण्यासाठी डॉ. कापुसकरांच्या विचारांची फुंकर

    07-Apr-2026   
Total Views |

कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल; तर मुंबई, ठाणे याठिकाणी जावे लागते. सरकारी योजनांचा उजेड येथील गरिबांच्या घरांपर्यंत का पोहोचत नाही, या विचारातून कल्याण पूर्वेतील फिजिशियन डॉ. उमेश कापूसकर यांनी मांडलेला ‌‘पीपीपी‌’ तत्त्वावरील रुग्णालयाचा विचार म्हणजे सामान्य रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

तुमच्या ‌‘एमबीबीएस‌’ ते ‌‘एमडी‌’पर्यंतच्या प्रवासाविषयी काय सांगाल?

माझे बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून झाले. त्यानंतर ‌‘एमबीबीएस‌’साठी कळव्याच्या ‌‘राजीव गांधी मेडिकल कॉलेज‌’ला नंबर लागला. 1999 साली ‌‘एमबीबीएस‌’चे शिक्षण पूर्ण झाले. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात ‌‘मेडिकल ऑफिसर‌’ म्हणून काम करण्याची संधी चालून आली. हा अतिदुर्गम असा परिसर आहे. सुदैवाने या काळात ‌‘हेमलकसा‌’ येथे जाण्याचा योग आला. डॉ. प्रकाश आमटे यांना भेटता आले. 2001ला पोस्टिंग पूर्ण झाल्यानंतर ‌‘बॉम्बे मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट‌’मध्ये ‌‘एमडी‌’ शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 2005ला शिक्षण पूर्ण झाले आणि कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर ‌‘तिसाई‌’ रुग्णालयाची स्थापना केली.

प्रॅक्टिस करताना तुमची रुची कोणत्या विषयात होती?

मी ‌‘एमडी जनरल मेडिसीन‌’ केले होते. ‌‘जनरल मेडिसीन‌’मध्ये मुख्यत्वे ‌‘प्रायमरी आजार‌’ म्हणजे हृदय, मूत्रपिंड, ब्लडप्रेशर, शारीरिक आजार, त्या आजारांचे निदान करणे, त्यावर उपचार करणे आणि गरज भासल्यास रुग्णाला सुपर स्पेशालिटी डॉक्टरांकडे पाठविण्याचे काम करतो. माझी रुची विशेषतः मधुमेहामध्ये आहे; मधुमेहाचे योग्य वेळी निदान करणे, साखर नियंत्रणात आणणे, मधुमेही रुग्णांचे मॉनिटरिंग करणे, मधुमेह इतर अवयवांवरदेखील परिणाम करत असतो. त्यामुळे त्याला प्रतिबंध घालणे केव्हाही उत्तम असते. म्हणून रुग्णांना ते आजार होऊ नयेत याकरिता जागृत करणे, मधुमेहींना त्यांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्याचे काम करतो. रुग्णाला योग्य डॉक्टरकडे पाठविण्याचे काम मी करत असतो.

‘तिसाई‌’ रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली, तो प्रवास कसा होता?

‌‘तिसाई‌’ रुग्णालयाची 2006 साली सात ते आठ जणांनी मिळून मुहूर्तमेढ रोवली. त्यातून सर्वजण निवृत्त होत गेले आणि या रुग्णालयाची सर्व धुरा माझ्या हातात आली. आता 2016-17 पासून हे रुग्णालय मी चालवीत आहे. पूव हे भाडेतत्त्वावर रुग्णालय सुरू होते; पण आता ओनरशिपवर सुरू आहे.

या रुग्णालयात कोणत्या आजारांचे रुग्ण सर्वाधिक येतात?

या रुग्णालयात सर्व आजारांचे निदान केले जाते. आपल्या रुग्णालयात कोणत्या रुग्णांवर उपचार करू शकतो हे पाहणे आणि गरज पडल्यास किंवा अतिगंभीर त्या रुग्णांना योग्य वेळी ‌‘टर्शिरी केअर सेंटर‌’ आहे, त्याठिकाणी पाठवतो, जेणेकरून रुग्णांचा जीव वाचविता येईल.

गेल्या काही वर्षांत मधुमेही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि मधुमेहापासून लांब राहण्यासाठी काय करू शकतो?

मधुमेहापासून लांब राहण्यासाठी गोड पदार्थांचा त्याग करता आला पाहिजे. मधुमेह हा तुमच्या जीवनशैलीशी संबंधित आहे. तो अनेकदा आनुवांशिक आजार आहे. खाण्याची शिस्त पाळली पाहिजे. वजन वाढता कामा नये. ‌‘ढेरीमुक्त भारत‌’ असे एक स्लोगन दिले पाहिजे. त्यासाठी व्यायाम करणे आणि खाताना तोंडावर नियंत्रण ठेवले पाहिजे. चरबीयुक्त पदार्थ, पिझ्झा, बर्गर, चीझ, तेल, तुप, गोड पदार्थांचे ‌‘क्रेव्हिंग‌’ कमी केले पाहिजे. त्याऐवजी फायबर, डाळी आणि पालेभाज्या यांचा आहारात समावेश केला पाहिजे. मासांहारदेखील खाता येईल. जगण्यासाठी खाणे शिकले पाहिजे, खाण्यासाठी जगणे नाही. खाण्यासाठी जगलो; तर मग मधुमेह, हदयविकार असे अनेक विकार होतात.

अनेक सरकारी योजना आहेत. पण, त्यांचा लाभ रुग्णांना हवा असेल; तर रुग्णांना मुंबई-ठाण्याकडे धाव घ्यावी लागते. या सरकारी योजना आपल्या येथील रुग्णालयात चालू केल्या जाव्यात, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रुग्णाला त्याचा लाभ मिळेल, याविषयी काय सांगाल?

सरकार आपल्या पातळीवर सर्वांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. काही योजना महात्मा फुले, ‌‘आयुष्यमान भारत योजना‌’ अशा बऱ्याचशा योजना आहेत. त्या योजनांचा जर सामान्य गरीब रुग्णांना लाभ होऊ द्यायचा असेल, तर ‌‘पीपीपी‌’ तत्त्वावर रुग्णालये उभी करावी लागतील. त्यात 50 टक्के मोफत आणि 50 टक्के पैसे देऊन उपचार केले जातात. या रुग्णालयांमुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रुग्णांना फायदा होईल. कारण, ‌‘आयसीयू‌’मध्ये ठेवण्याची वेळ आली, तर कुठे ठेवणार? असा प्रश्न पडतो. तो प्रश्न ‌‘पीपीपी‌’ तत्त्वावरील रुग्णालयामुळे सुटेल. अशाप्रकारची दोनतरी रुग्णालये उभी करता आली पाहिजेत.

खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी सेवा योजना सुरू व्हाव्यात, यासाठी काही संकल्पना तुमच्याकडे आहेत का?

मुंबईला खासगी रुग्णालये आहेत, त्याठिकाणी सरकारी सेवा देणे सोयीचे आहे. आपल्या क्षमतेनुसार रुग्णांना बेड राखीव ठेवीन. पण, छोट्या नर्सिंग रूममध्ये ते करणे शक्य नाही. कल्याण-डोंबिवली ‌‘पीपीपी‌’ तत्त्वावर रुग्णालये उभी करावी लागतील.

आजच्या ‌‘जागतिक आरोग्य दिना‌’च्या निमित्ताने वाचकांना काय सल्ला द्याल?

‌‘जागतिक आरोग्य दिना‌’निमित्त एकच गोष्ट सांगतो; आजारी पडायचे नसेल, तर सकाळी लवकर उठून व्यायाम करा. भारतीय खाद्यपदार्थ ज्यात साखरेचे प्रमाण जास्त आहे, ते टाळावे लागेल. फायबर जास्त असलेले पदार्थ खावे लागतील. त्यात फळे, पालेभाज्यांचे सेवन वाढवावे लागेल. डाळी, कडधान्य यांतून प्रोटीन मिळतील. मांसाहारामध्ये चरबी कमी असेल, असे पदार्थ निवडले पाहिजेत. साखरही शरीराला गरजेची आहे; पण त्यांची जितकी गरज आहे, तेवढेच त्याचे सेवन करावे!