बोरिवली नॅशनल पार्कमध्ये तीन बिबट्यांची शिकार; घोडबंदरचे जंगल शिकाऱ्यांचे हाॅटस्पाॅट

    07-Apr-2026
Total Views |
 leopard poached
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ या दोन महिन्यात तीन बिबट्यांची शिकार झाली आहे (leopard poached). काही दिवसांपूर्वी घडलेल्या बिबट कातडी तस्करी प्रकरणाच्या चौकशीमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे (leopard poached). घोडबदंर आणि चेना वनपरिक्षेत्रात शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत अडकून या तिन्ही बिबट्याचा मृत्यू झाला आहे (leopard poached). कातडी तस्करीतील आरोपींनी फासकीत अडकून या बिबट्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे अवयव काढून घेतले होते. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या सुरक्षेवर एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (leopard poached)
 
 
डहाणू वनविभागाने काही दिवसांपूर्वी खानिवडे येथून बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड केली होती. या प्रकरणामधून मिरा-भाईंदर येथील वरठा पाडा आणि माशाचा पाडा येथून सहा आदिवासी तरुणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विशाल वरठा, मयुर म्हात्रे, अनिल धावडे, हर्षद जाधव, दिनेश जाधव, संतोष घोशे या आरोपींचा समावेश आहे. शनिवार दि. ४ एप्रिल रोजी भाताणे वन विभागाचे कर्मचारी राष्ट्रीय उद्यानाच्या कर्मचाऱ्यांच्या समवेत या आरोपींना घोडबंदर येथील जंगलात घेऊन गेले होते. यावेळी आरोपींनी ज्याठिकाणी फासकीत बिबटे अडकले होते, त्या सर्व जागा वनकर्मचाऱ्यांना दाखवल्या. आरोपींच्या मते, त्यांनी बिबटे मारले नसून त्यांना बिबटे हे फासकीत अडकून मृत्यावस्थेत आढळले. त्यामुळे त्यांनी केवळ अवयव काढण्याचे काम केले. हे अवयवय विक्रीच्या उद्देशाने आणि पैशांच्या गरजेपोटी काढल्याचे आरोपींनी मान्य केले आहे. अशा प्रकारे प्राण्यांचे अवयव काढणे आणि त्यांची विक्री करणे गुन्हा असल्याने या आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहा पैकी पाच आरोपींना न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
 
 
शिकार क्रमांक १
आरोपी चंदर जाधव याला घोडबंदर येथील वनपरिक्षेत्रात नोव्हेंबर, २०२५ मध्ये येऊर वनपरिक्षेत्रात एक मृत बिबट्या तारेच्या फासकीत अडकल्याचे दिसून आले. त्या बिबट्याचे सर्व पंजे कुणीतरी आधीच कापले होते. जाधव यांने बिबट्याच्या त्या कुजलेल्या कलेवरातून दोन दात काढून आरोपी संतोष घोशे याच्याकडे विक्रीला दिले. याठिकाणी वन कर्मचाऱ्यांना ४ एप्रिलच्या भेटीवेळी एक पायाचे हाड आणि काही केस आढळून आले.
 
शिकार क्रमांक २
२०२५ सालच्या पावसाळ्यात आरोपी संतोष घोशे याला चेना येथील वनपरिक्षेत्रात एक मृत बिबट्या तारेच्या फासकीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्याने त्याचे चार दात काढून स्वत: जवळ ठेवल्याचे कबुल केले. त्याठिकाणी वनकर्मचाऱ्यांना ४ एप्रिलच्या पाहणीत बिबट्याचा जबडा, पायाची आणि शरीरातील इतर अवयवांची हाडे आणि तारेचा फास मिळाला.
 
 
शिकार क्रमांक ३
आरोपी संतोष घोशे आणि अनिल धावडे हे डिसेंबर, २०२५ मध्ये घोडबंदर येथील काशी वनपरिक्षेत्रात भाजी काढण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना फासकीत अडकलेला बिबट्या मृतावस्थेत दिसला. या बिबट्याची कातडी विशाल वरठा आणि अनिल धावडे यांनी काढली आणि विक्रीच्या उद्देशाने ती विशालकडे ठेवली. त्यानंतर संतोषने सहा दात काढले. मात्र, विशालला वनविभागाने अटक केल्यानंतर संतोषने शिकारीच्या तिन्ही प्रकरणामधून गोळा केलेली १२ नखे ही घोडबंदराच्या पुलावरुन खाडीत फेकून दिली. याठिकाणी वन कर्मचाऱ्यांना ४ एप्रिल रोजी बिबट्याचा जबडा आणि पायाचे व इतर अवयवांची हाडे मिळाली.