मुंबई : (Ayodhya Parv) नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे अयोध्या न्यासाद्वारा आयोजित ‘अयोध्या पर्व' (Ayodhya Parv) कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या तीन दिवसीय पर्वात वैचारिक चर्चासत्रे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि प्रदर्शने यांमधून रामकथेचे विविध आयाम सजीवपणे उलगडले गेले. संपुर्ण परिसर रामभक्तीच्या दिव्य ऊर्जेने स्फूर्त झाला होता, जिथे देशभरातून आलेले विद्वान, संत, कलाकार आणि श्रद्धाळू रामाच्या आदर्शांवर चिंतन करताना दिसले.(Ayodhya Parv)
या पर्वाचा भव्य शुभारंभ ३ एप्रिल रोजी झाला. प्रमुख अतिथी म्हणून अयोध्येचे पूज्य महंत कमल नयन दास महाराज यांनी आशीर्वचन दिले. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी उपस्थित होते. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष पद्मभूषण रामबहादुर राय, सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी, अयोध्या पर्वाचे संयोजक व फैजाबादचे माजी खासदार लल्लू सिंह तसेच माजी राज्यसभा खासदार अशोक वाजपेयी यांच्या उपस्थितीने उद्घाटन सोहळा विशेष ठरला.(Ayodhya Parv)
महंत कमल नयन दास यांनी प्रभू रामांचा आदर्श परस्पर प्रेमाचा असल्याचे सांगितले. आज देशात समरसतेसाठी रामाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भैयाजी जोशी यांनी राममंदिर बांधणी ही राष्ट्रनिर्मितीची सुरुवात असल्याचे सांगितले. मनोज सिन्हा यांनी अयोध्येला भारतीय सांस्कृतिक चेतनेचे केंद्र मानले, तर दिया कुमारी यांनी राजस्थान-अयोध्या नात्याचा उल्लेख केला. डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी कार्यक्रमांची माहिती दिली, तर अशोक वाजपेयी यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. उद्घाटन सत्रात ‘रामोत्सव’ छायाचित्र प्रदर्शनी, ‘बडी है अयोध्या’ प्रदर्शनी आणि पंडित रामकिंकर उपाध्याय यांच्याशी संबंधित प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. तसेच छायाचित्रण पुस्तकाचे प्रकाशन व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.(Ayodhya Parv)
पहिल्या दिवशी ‘भविष्याची अयोध्या नगर योजना’ या विषयावर चर्चा झाली. रामबहादुर राय यांनी काशी विश्वनाथ धामच्या विकासाचा संदर्भ देत अयोध्येच्या विकासात संतांच्या शंका दूर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. बी.एल. गौड, डॉ. शैलेष शुक्ल आणि लल्लू सिंह यांनीही आपले विचार मांडले. दिवसाचा समारोप पंडित डॉ. अभय मानके यांच्या ‘गीत रामायण’ सादरीकरणाने झाला. ४ एप्रिल रोजी ‘शबरीचे राम’ या विषयावर चर्चा झाली. भगवान रामांच्या लोकनायक स्वरूपावर भाष्य करण्यात आले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी शबरीच्या भावनांची महत्ता अधोरेखित केली. डॉ. गुरु प्रकाश पासवान, डॉ. विनोद तिवारी, डॉ. कौशल पंवार, डॉ. राजेश पासवान आणि डॉ. राजीव कुमार वर्मा यांनी सामाजिक समरसतेवर विचार मांडले.(Ayodhya Parv)
यानंतर ‘पंडित रामकिंकर उपाध्याय यांच्या दृष्टिकोनातून रामराज्य’ या विषयावर सत्र झाले. दीदी माँ मंदाकिनी रामकिंकर यांनी रामराज्यासाठी सहकार्याची आवश्यकता सांगितली. मनोज श्रीवास्तव यांनी शबरी आणि केवट यांना रामराज्याचे पहिले नागरिक मानले जात असल्याचे नमूद केले. आचार्य कृष्णकांत यांनी प्राणप्रतिष्ठेच्या संकल्पनांवर भाष्य केले. संध्याकाळी माधवी मधुकर झा यांच्या संस्कृत स्तोत्रगायनाने आणि ‘शबरी के राम’ या नाट्यप्रयोगाने वातावरण भक्तिमय झाले.
दि. ५ एप्रिल रोजी ‘भविष्याची अयोध्या – शासन आणि समाज’ या विषयावर चर्चा झाली. आचार्य मिथिलेश नंदिनी शरण, मनोज सिंह आणि चंद्रशेखर प्राण यांनी परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधण्यावर भर दिला. समारोप सत्रात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत राय उपस्थित होते. त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाला समाजजागृतीचे माध्यम म्हटले. रामबहादुर राय यांनी अयोध्या पर्वाचे महत्त्व अधोरेखित केले. संध्याकाळी ‘श्री राम विजय’ या नाट्यप्रयोगाने कार्यक्रमाची सांगता झाली.(Ayodhya Parv)
रामाच्या आदर्शांची वाटचाल
या तीन दिवसीय पर्वाने रामभक्ती केवळ स्मरणात नव्हे, तर आचरणात आणण्याचा संदेश दिला. अयोध्या पर्वाने स्पष्ट केले की राम हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून भविष्यासाठीही प्रेरणास्थान आहेत. अयोध्या न्यास आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या प्रयत्नांमुळे दिल्लीत रामाच्या चेतनेचा विस्तार झाला असून, सामाजिक समरसता आणि राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.(Ayodhya Parv)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक