पुरस्कार सोहळ्यात राजपालच्या कर्जावरुन खिल्ली, सलमानने पाठिंबा देत केली पाठराखण

    07-Apr-2026
Total Views |

मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) मागच्या काही दिवसांपासून त्याच्या थकित कर्जामुळे चर्चेत राहीला आहे. त्याने पोलीसांकडे आत्मसमर्पणही केलं होतं. पण त्यानंतर त्याला जामिन मंजूर झाला. पण आता एका पुरस्कारसोहळ्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आज मंगळवारी सहकलाकार राजपाल यादवच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे. पुरस्कार सोहळ्यात झालेल्या टिप्पणीवरून राजपाल यादवच्या सुरू असलेल्या चेक बाऊन्स प्रकरणाची खिल्ली उडवली गेल्याचं मानलं जात असून, त्यानंतर सलमान यांनी हा पाठिंबा दर्शवला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

रविवारी स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ या पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक व्हिडिओ समोर आला. या कार्यक्रमात होस्ट सौरभ द्विवेदीने राजपाल यादव यांच्या चेक बाऊन्स प्रकरणाचा उल्लेख करत टोमणा मारला. “राजपाल भाऊ, डॉलर कितीही वर-खाली झाला तरी तुम्हाला तेवढेच पैसे परत करावे लागतील, जितके तुम्ही उधार घेतले आहेत,” असे वक्तव्य करण्यात आले. या वक्तव्यावर प्रेक्षकांसह स्वतः राजपाल यादव देखील हसताना दिसला


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या वक्तव्याला उत्तर देताना राजपाल यादव काही क्षण थांबला आणि हसत म्हणाला, “एकदा माझं प्रकरण ऐका, मी ते सांगू इच्छितो.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, अनेकांनी होस्टच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी हे वक्तव्य अयोग्य असल्याचं सांगत तीव्र टीका केली आहे.

सलमान खानचा पाठिंबा

या सगळ्या वादानंतर सलमान खान यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत राजपाल यादव यांना पाठिंबा दिला. त्यांनी लिहिले की, “राजपाल भाऊ, तुम्ही ३० वर्षांपासून काम करत आहात आणि आम्ही सर्वांनी तुम्हाला वारंवार निवडलं आहे, कारण तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहात आणि त्याला एक वेगळी किंमत आहे. तुम्हाला काम मिळत राहील. कधी कधी भावना व्यक्त करताना काही गोष्टी सहज निघून जातात. काम मनापासून करा, डॉलर वर-खाली झाला तरी काही फरक पडत नाही, कारण शेवटी व्यवहार भारतातच होणार आहे.”


काय आहे चेक बाऊन्स प्रकरण?

अभिनेता राजपाल यादव हा सुमारे ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अडकलेला आहे. हे प्रकरण २०१० मध्ये त्यांच्या दिग्दर्शनाखालील पहिल्या अता पता लापता या चित्रपटासाठी घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. कर्जफेडीचे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांनी तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांना अंतरिम जामीन मिळाला असला, तरी अजूनही ७ कोटींहून अधिक रक्कम थकबाकी असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.