मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्गातील दोडामार्गात जन्मलेल्या वाघाची कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून नोंद करण्यात आली आहे (radhanagri tiger). त्यामुळे या वाघाला एसटीआर टी-१०, असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला असून त्याचे नामकरण करण्यात आले आहे राणोजी (radhanagri tiger) . या वाघाचा नोंदीमुळे राधानगरीत वास्तव्यास असणाऱ्या वाघांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे या वाघांसाठी देखील विदर्भातून वाघिणीचे स्थानांतरण करावे, अशी मागणी होत आहे. (radhanagri tiger)
डिसेंबर, २०२४ मध्ये राणोजीचे सर्वप्रथम राधानगरीत छायाचित्र टिपले गेले. त्यानंतर वर्षभर हा वाघ राधानगरीत वावरत होता का ? यावर शंका आहे. कारण, २०२५ मध्ये त्याचे छायाचित्र राधानगरीतून टिपले गेले नाही. त्यानंतर मार्च, २०२६ पासून या वाघाचे अस्तिव पुन्हा एकदा राधानगरीत अभयारण्यात दिसून आले आहे. त्यामुळे त्याला सांकेतिक क्रमांक देण्यात आला, एसटीआर-टी १०. साधारण सहा वर्षांचा असणाऱ्या या राणोजीचा जन्म दोडामार्गात झाला आहे. त्यामुळे सह्याद्री-कोकण सिरीजमध्ये त्याचा सांकेतिक क्रमांक आहे, एसकेटी-२२. सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात अधिवास करणाऱ्या वाघांना एसकेटी या सिरीजीमधील सांकेतिक क्रमांक दिले जातात.
या राणोजीची आई आहे, सह्याद्रीतल्या वयाने सगळ्यात मोठ्या वाघिणींपैकी एक असणारी एसकेटी-१२ वाघीण. २०२१ साली पहिल्यांदा तिचे छायाचित्र दोडामार्गात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपले गेले होते. ती ज्या भागात वावरत होती, तिथे एसकेटी-१३ हा प्रौढ नर देखील वावरत होता. त्यामुळे त्यांचे मिलन घडून २०२२ साली त्यांना दोन पिल्ले झाली. यामधील एक मादी आणि दुसरा नर होता. तो नर म्हणजे राधानगरीतून नोंद केलेला राणोजी वाघ. त्यामुळे एसकेटी-१२ ही वाघीण त्याची आई असून एसकेटी-१३ हे त्याचे वडील आहेत. दोडामार्गात जन्मल्यानंतर राणोजीने नव्या हद्दक्षेत्राचा शोधात उत्तरकडे प्रवास केला आणि तो आता राधानगरीत स्थिरावलेला दिसत आहे. सध्या राधानगरीत रायबा, सरदार आणि राणोजी या तीन वाघांचा अधिवास आहे. त्यामुळे वाघांसाठी याठिकाणी वाघिणीचे स्थानांतरण करावे, अशी मागणी साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी पत्राद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना केली आहे.