उखळ पांढरे करण्याच्या नादात, पाकिस्तानच्या तोंडाला काळे

    07-Apr-2026   
Total Views |

सगळ्या जगाचे लक्ष सध्या इराण आणि अमेरिका यांच्या संघर्षाकडे लागले आहे. या संघर्षामुळे अनेक देशांमध्ये सुलतानी संकट निर्माण झाले आहे. या युद्धामध्ये मध्यस्थी करावी, अशी मागणी जगभरातून होत असून, प्रत्यक्षात पुढाकार कोण घेणार यावर खलबते सुरु आहेत. पाकिस्तानने यात आपले उखळ पांढरे करण्याचा केलेला प्रयत्न फसल्याने, त्यांचेच तोंड काळे झाले आहे...

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविल्याचा जो दावा पाकिस्तानने केला होता, तो दावा इराणने साफ फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचा हा दावा बिनबुडाचा असल्याचे इराणने म्हटले आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे, असेही इराणने म्हटले आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची कडेकोट नाकेबंदी केल्याने, अनेक देशांपुढे भीषण तेलसंकट उभे राहिले आहे. होर्मुझची नाकेबंदी उठवावी अन्यथा अत्यंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम अमेरिकेने इराणला दिला असला, तरी असल्या धमक्यांना घाबरत नसल्याचे इराणने अमेरिकेला सुनावले आहे. शत्रू राष्ट्रे आणि त्यांचे मित्र देश यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ दिले जाणार नाही, असे इराणने म्हटले आहे. अमेरिकेने इराणला अत्यंत गंभीर असा इशारा दिला असला तरी, त्यातून अद्याप काही मार्ग निघाल्याचे दिसत नाही. अमेरिकेने इराणला जी मुदत दिली आहे, ती काही तासांमध्ये संपत आहे. पण अमेरिका नुसत्या धमक्या देत आहे की काही भयानक हल्ला करण्याच्या सिद्धतेत आहे, ते लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजे कोणताही अडथळा न येता भारताकडे मार्गक्रमणा करीत आहेत.

इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी अब्दुल हकीम इलाही हे सध्या भारतात आले असून, त्यांनी या युद्धासंदर्भात पाकिस्तान काहीही भूमिका बजावू शकत नाही, असे म्हटले आहे. इस्लामाबादच्या माध्यमातून कसलीही ठोस बोलणी झालेली नाहीत. जागतिक तेल बाजारावर परिणाम घडवून आणण्यासाठी, काही हितसंबंधी मुद्दामच अशा वावड्या उठवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर राहाव्यात म्हणून अशा बातम्या उठविल्या जात आहेत, असे इलाही यांचे म्हणणे आहे. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतासह जगातील विविध देश महत्वाची भूमिका बजावतील, अशी आशा देखील इलाही यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा, जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारावर विपरीत परिणाम झाला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने, तेथून होणारी तेलाची वाहतूक काही अपवाद वगळता जवळजवळ थांबली आहे. भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित जाता यावे, यासाठी भारत इराणशी चर्चा करीत आहे. अत्यंत धोकादायक परिस्थिती असताना, भारताची काही जहाजे अलीकडील काळात सुरक्षितपणे भारताच्या किनाऱ्याला लागली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हे युद्ध अवघ्या चार-पाच आठवड्यात संपेल असे म्हटले होते, पण तसे काही घडले नाही. आता महिना उलटला तरी युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. इराणला जबर अद्दल घडविण्याच्या निर्धाराने, अमेरिका रोज नवनवीन धमक्या देत आहे. पण, हे युद्ध अमेरिका आणि इस्रायलला जेवढे सोपे वाटले होते, तेवढे सोपे राहिलेले नाही. अमेरिकेला ‌‘नाटो‌’ सदस्य देशही मदत करण्यास तयार नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांचा जो जळफळाट होत आहे तो वेगळाच! या युद्धाच्या झळा जगभरातील देशांना बसू लागल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांसह अनेकांनी आवाहन करूनही, अमेरिका युद्ध थांबविण्यास तयार नाही. युक्रेन - रशिया युद्ध पण थांबलेले नाही, त्यातच अमेरिका - इस्रायल- इराण युद्धाची भर पडली आहे. सध्याच्या युगात युद्ध नको बुद्ध हवा हा विचार अत्यंत चांगला असला, तरी तो युद्धग्रस्त देश कधी स्वीकारणार हाच महत्वाचा प्रश्न आहे.

जैसलमेर भागात सरस्वती -सिंधू संस्कृतीच्या खुणा

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्याचा वायव्य भागात अलीकडील काळात करण्यात आलेल्या उत्खननामध्ये, सरस्वती - सिंधू संस्कृतीच्या खाणाखुणा सापडल्या आहेत. जैसलमेर जिल्ह्यातील रातादिया री ढेरी या ठिकाणी केलेल्या उत्खननात या संस्कृतीच्या पाउलखुणा सापडल्या. हे स्थान भारत आणि पाकिस्तान सीमेपासून, अवघ्या चार किलोमीटर अंतरावर थरच्या वाळवंटात आहे. दीड एकर परिसरात सरस्वती - सिंधू संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. मातीची विविध प्रकारची तुटलेली भांडी आणि अन्य सामग्री या ठिकाणी आढळून आली. सरस्वती नदी ही पूव राजस्थानमधील गंगानगर आणि हनुमानगढ या जिल्ह्यांमधून वाहात होती. या उत्खननातील दोन महत्वाच्या जागा म्हणजे, तारखेनवाला डेरा आणि कालीबंगा या अनुक्रमे गंगानगर आणि हनुमानगढ जिल्ह्यांमध्ये आहेत. आतापर्यंत राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या 39 जागांचा शोध घेण्यात आला आहे. त्यातील 30 जागा गंगानगरमध्ये, तर उर्वरित नऊ जागा हनुमानगढमध्ये आहेत. ज्या रातादिया री ढेरी या जागेचा प्रारंभी उल्लेख करण्यात आला, ती जागा जैसेलमेरपासून 118 किलोमीटर अंतरावर आहे. तांब्याचे तुटलेले तुकडे, मातीची तुटलेली झाकणे आदी अनेक वस्तू त्या ठिकाणी आढळल्या आहेत. मातीच्या विटाही तेथे मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. प्राचीन अशा सरस्वती - सिंधू संस्कृतीची नवनवीन स्थाने पुरातत्व अभ्यासकांना मिळत आहेत. एकेकाळी या दोन नद्यांच्या काठावर संस्कृती किती मोठ्या प्रमाणात फुलली होती, हेच या नव्या उत्खननावरून दिसून येत आहे.

सूर्य नूतन : सौर कुकर

सध्या सर्व जग इंधन टंचाईने ग्रस्त आहे. अमेरिका - इस्रायल आणि इराण युद्ध संपण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने, इंधनासाठी पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारतात एलपीजीच्या किमती वाढत आहेत आणि त्याच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता आहे. हे सर्व लक्षात घेऊन इंडियन ऑईल या कंपनीने, ‌’सूर्य नूतन‌’ या नावाच्या सौर कुकरची निर्मिती केली आहे. या कुकरचा वापर अधिकाधिक झाल्यास, आयातीत वायू इंधनावर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच स्वस्त आणि स्वच्छ इंधनावर हा सौर कुकर चालणार असल्याने, त्याद्वारे पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे. 2022 मध्ये इंडियन ऑईल कंपनीने आपला नेहमीचा व्यवसाय सांभाळत, ‌’सूर्य नूतन‌’ या नावाच्या सौर कुकरची निर्मिती केली. घरामध्ये वापरता येईल असा हा सौर कुकर आहे. इंडियन ऑइलच्या फरीदाबाद येथील संशोधन आणि विकास केंद्रामध्ये, या कुकरवर संशोधन करण्यात आले. ‌’सूर्य नूतन‌’ हा सर्वसामान्य सौर कुकर नाही. नेहमीचे सौर कुकर घराबाहेर सूर्यप्रकाशात ठेवावे लागत होते. तसेच ते कुकर जड असल्याने, हलविण्यास कठीण होते. तसेच वातावरण ढगाळ असेल, तर अशा कुकरचा काही उपयोग होत नसे. पण ‌’सूर्य नूतन‌’ या सौर कुकरसाठी घराच्या छतावर सौर नेल उभारावी लागतात. याद्वारे जी सौर ऊर्जा प्राप्त होते, ती थेट या सौर कुकरसाठी वापरली जाते. केबलद्वारे ही सौरऊर्जा कुकरला पुरविली जाते. भात, वरण, याकुक्रचा भात, वरण असे पदार्थ या कुकरचा वापर करून, सहजपणे बनविता येतात. ही जी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे, ती सौर उर्जेवर आणि वीजेवरही चालू शकते. त्यामुळे ढगाळ वातावरण असेल तर, तुमचा खोळंबा न होता तुम्ही स्वयंपाक करू शकता. हे ‌’सूर्य नूतन‌’ मॉडेल तीन प्रकारात विकसित करण्यात आले आहे. 12 हजार रुपयांपासून याची किंमत सुरु होते. यातील जे प्रीमियम मॉडेल आहे, त्याचे मूल्य 23 हजार रुपये असून, त्यावर तुम्ही सकाळ, दुपार आणि रात्रीचाही स्वयंपाक करू शकता. प्रारंभी होणारी गुंतवणूक वगळता, या ‌’सूर्य नूतन‌’साठी अन्य काहीच खर्च करावा लागत नाही. भारतातील पाच शहरांमध्ये 50 ठिकाणी, या सौर कुकरचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जात आहे. हा सौर कुकर लोकमान्य झाल्यास, स्वयंपाकाच्या इंधनासाठी भारतास कोणत्याही अन्य देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

9869020732

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.