सुदृढ बाळासाठी डॉ. ईटकरांचे खास गुपित

    07-Apr-2026   
Total Views |

आई-बाबा होणे हा एक सुखद अनुभव. पण, बाळाच्या संगोपनाची योग्य पद्धत माहीत असणेही तितकेच गरजेचे असते. नवजात शिशूची काळजी घेताना पाळायचे नियम सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनंत ईटकर आपल्याला सांगणार आहेत. बाळाची काळजी कशी घ्यायची, यावर डॉ. ईटकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीस कोणत्या प्रकारचा धोका असतो आणि त्याची लक्षणे कोणती असतात?

बाळाचा जन्म होणे हे पूर्णतः नवीन आयुष्याची सुरुवात असते. बाळ आईच्या गर्भाशयात 37 आठवडे राहिले आहे का, हे पाहावे लागते. जर ते 37 आठवडे राहिलेले असेल, तर ते ‌‘पूर्ण दिवसांचे बाळ‌’ म्हटले जाते. या बाळांना त्रास कमी असतात. ते बाळ रडले आहे का, हेदेखील पाहिले जाते. बाळ रडले म्हणजे त्याचा श्वास चालू होतो. बाळ बाहेर आल्यावर त्याचा स्वत:चा श्वास चालू होणे गरजेचे असते. बाळ गर्भाशयात असताना सर्व श्वास आई देत असते. बाळ जन्मल्यानंतर श्वास चालू झाला की, नाही पाहिले जाते. बाळ आईचे दूध प्यायला लागल्यावर त्याची काळजी कमी होते. पण, 37 आठवड्यांपेक्षा कमी काळ आईच्या गर्भाशयात राहिले असेल, तर त्यांची प्रकृती गंभीर असते. ते किती काळ आईच्या गर्भाशयात आहे, त्यावर त्याची प्रकृती किती गंभीर आहे ते दिसते. श्वासाचा मोठा त्रास असतो. फुप्फुसे तयार नसतात. त्यांना दूध पचत नाही. त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत गुंतागुतीचे असते. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ‌‘सपोर्ट सिस्टम‌’ द्यावी लागते. याकाळात जेवढा त्रास होतो, तेवढाच धोका पुढील आयुष्यातदेखील असतो. त्याच्या विकासातदेखील अनेक अडचणी येतात.

‘यशोनंदन‌’ रुग्णालयाच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारच्या उपचारपद्धती आपण बालकांना देत असता?

‌‘यशोनंदन‌’ रुग्णालय हे बालकांच्या क्षेत्रातील अग्रगण्य असे रुग्णालय आहे. मुंबईतदेखील फार कमी रुग्णालयांत अशा सुविधा असतील. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. आम्ही नवीन तंत्रज्ञान किंवा उपकरणे आत्मसात करत असतो. या रुग्णालयात कल्याण, डोंबिवली, वाडा, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा या आजूबाजूच्या 100 किलोमीटर परिसरांतील गंभीर असलेली बाळे येतात आणि उपचार करून सदृढ बनून परत जातात. आमच्या रुग्णालयाकडे मुंबईतील ‌‘ॲडव्हान्स सेंटर‌’ म्हणून पाहिले जाते. आमच्या रुग्णालयात येणाऱ्या नवजात शिशू रुग्णांपैकी 97 टक्के बरे होऊन घरी जातात.

लहान बालकांचा आहार कसा असावा? त्यांचे लसीकरण कधी केले पाहिजे? लहान बालकांच्या आहारात मिठाचा समावेश असू नये, असा एक समज पालकांमध्ये आहे; त्याविषयी काय सांगाल?

लहान बाळ पहिले सहा महिने आईच्या दुधावर असले पाहिजे. त्यामुळे त्यांना आजाराचा धोका कमी असतो. आईने तिच्या आयुष्यात ज्या-ज्या आजारांना तोंड दिले आहे, त्यांची सगळी प्रतिकारशक्ती बाळाला येत असते. सहा महिन्यांनंतर आहार सुरू करायचा झाल्यास डाळ, तांदळाची खिमटी, फळांचा ज्युस, पालक सूप अशा स्वरूपातून द्यावा. सहा महिन्यांनंतर बाहेरून आहार सुरू केल्यास ते ‌‘होममेड फूड‌’ असावे. ते हळूहळू तुमच्या घरातील जेवण पद्धतीनुसार वाढवावे. तुम्ही मांसाहारी असाल, तर नऊ-दहाव्या महिन्यांनंतर तुमच्या बाळाला सूप चालू करू शकता. बालकांना ‌‘कमर्शियल फूड‌’ देऊ नये. एक वर्षाला तुमचे मूल तुमच्या ताटात बसून जेवले पाहिजे. दीड वर्षापर्यंत अंगावरील दूध चालू ठेवावे. त्याबरोबर हा आहार चालू ठेवावा. एक वर्षानंतर बाळाच्या आहारात मिठाचा थोडाफार समावेश करावा. आईने पार्ट टाईम जॉब शोधावा. आईला बाहेर जावे लागले, तरी दूध काढून ठेवू शकतात. आईचे दूध बाळाला जास्तीत-जास्त देण्याला प्राधान्य द्यावे. आईला दूध येत नसेल, तर त्यांनी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. आईने चौरस आहार घेतला, तर दूध येण्यात काहीच अडचणी येत नाहीत. मुंबईत वरच्या दुधासाठी ‌‘ह्युमन मिल्क बँक‌’ असतात. पण, कल्याणमध्ये अशी कोणती सोय नाही. बाळांना सर्व लसी देऊन घ्याव्यात.

बालकांनी निरोगी राहावे याकरिता पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, यासाठी काय सल्ला द्याल?

नवजात बालकांचे माझे क्षेत्र आहे. पण गर्भवती महिलांनी शक्य तेवढे खूश राहावे. त्यांचा आहार चौरस असावा. घरातील नेहमीची कामे करावी, ऑफिसची कामेही करावी; पण अतिदगदग टाळावी. डॉक्टरांनी दिलेले सल्ले पाळावेत. त्यांच्या विकासाच्या टप्प्यांची तपासणी करावी. बाळ आईच्या गर्भाशयात नऊ महिने राहील, असा प्रयत्न राहावा. व्यायाम करावा, यामुळे निरोगी बाळ जन्माला येते.