Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! रॉकेट हल्ल्यात २ चिमुकल्यांचा मृत्यू; BSF जवानाची पत्नी गंभीर जखमी

पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंदीसह कर्फ्यू

    07-Apr-2026   
Total Views |
Manipur Violence
 
मुंबई: (Manipur Violence) ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसा भडकली आहे. मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यात मंगळवारी एका रॉकेटसारख्या वस्तूने एका घरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्यात हिंसाचार उसळला. अनेकठिकाणी तीव्र निदर्शने सुरू झाली. यानंतर सीआरपीएफने केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Manipur Violence)

नेमकं काय घडलं? 
 
मोइरांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रोंगलाओबी अवांग लेकाई या गावात पहाटेच्या वेळी सीमा सुरक्षा दलातील (BSF) एका जवानाच्या घरावर रॉकेट हल्ला झाला. या स्फोटात मुलांची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे १ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. संशयित अतिरेक्यांनी घरावर स्फोटके फेकल्यामुळे घरात झोपेत असलेल्या चार वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या नवजात बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलांच्या आजीने केला. (Manipur Violence)
 
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला. टायर जाळून रस्ते अडवले. संतप्त जमावाने दोन तेल टँकरसह तीन ट्रकही जाळले. हिंसक झालेल्या आंदोलकांनी मोइरांग पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर जळती लाकडे मांडून ठेवली आणि पोलीस ठाणेही अडवले. इंफाळमध्ये आंदोलक अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. निदर्शकांनी रस्ते अडवून जळते टायर रस्त्यावर पसरवले. ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. (Manipur Violence)

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मणिपूरमधील पाच जिल्ह्यांमध्ये इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णूपूर येथे तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे. तसेच ज्या बिष्णूपूरमध्ये कथित रॉकेट हल्ला झाला, तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Manipur Violence)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\