मुंबई :(Nagpur Dosar Bhavan Chowk) नागपुरात दोसर भवन चौक परिसरात बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणात संशयास्पद स्फोटक साहित्य आढळून आले. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ परिसराला घेराव घालून संपूर्ण भाग सुरक्षित केला. घटनास्थळावरून साधारण १५ काडतुसे, ५० डेटोनेटर आणि ८ कनेक्टर जप्त करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य सापडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात तणावाची स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी चंदीगड येथे भाजप कार्यालयावर ग्रेनेड हल्ला झाला होता. आता नागपुरातील हे ठिकाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून जवळ असल्याने स्फोटक साहित्य सापडण्याच्या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेतले जात आहे.(Nagpur Dosar Bhavan Chowk)
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेली एक बॅग बेवारस अवस्थेत एका घरात गेल्या १८ दिवसांपासून पडून होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड, पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव सेफ्टी ऑर्गनायझेशन आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी यांच्या विशेष पथकांनाही तपासात सहभागी करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात इतके संवेदनशील आणि धोकादायक साहित्य दोसर भवन चौकासारख्या गजबजलेल्या भागात कसे आले, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयितांचा शोध सुरू आहे. सध्या कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही, मात्र तपासाचा व्याप वाढवण्यात आला आहे.(Nagpur Dosar Bhavan Chowk)
नागपूर शहर पोलिसांचे झोन-३ चे उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. प्रत्येक बाजूने सखोल तपास सुरू आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कडक करण्यात आली आहे. स्फोटक साहित्याची गुणवत्ता आणि त्याचा संभाव्य वापर याचीही चौकशी सुरू आहे. दोसर भवन चौक हा नागपूरमधील गजबजलेला भाग असून येथे दुकाने आणि निवासी वसाहती दोन्ही आहेत. सकाळच्या वेळी साहित्य सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेचे किंवा टोळीचे नाव समोर आलेले नाही, मात्र पोलिस सर्व शक्य त्या दिशांनी तपास करत आहेत.(Nagpur Dosar Bhavan Chowk)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक