जलमार्गातील वादळे...

    07-Apr-2026
Total Views |

इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस उग्ररूप घेत असून, गेल्या महिनाभरापेक्षा जास्त चाललेल्या या संघर्षाने जगाला वेठीस धरले आहे. इस्रायलच्या बाजूने अमेरिका युद्धाच्या मैदानात उतरल्यानंतर, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमधील तेल व्यापारावर निर्बंध घातले. यामुळे इंधनाच्या जागतिक पुरवठा साखळीवरील दबाव वाढत जाऊन, जगामध्ये अनेक देशांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे या युद्धाचे पडसाद संपूर्ण जागतिक अर्थकारणावर उमटू लागले आहेत. अमेरिकेकडून सातत्याने होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग खुला करण्यासाठी इराणवर दबाव वाढवला जात असला, तरी अजूनतरी इराण अमेरिकेच्या दबावासमोर झुकत असल्याचे चित्र नाही. अलीकडेच होर्मुझ सामुद्रधुनी 48 तासांत खुली करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला असता, इराणकडून नजीकच्या भविष्यात ‌‘बाब अल-मंदेब‌’ हा दुसरा खाडी मार्ग बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी सोशल मीडियावर याबाबतच संकेत दिले आहेत.

इराणच्या या इशाऱ्यानंतर जगातील अनेक देशांची झोप उडाली असून, इराणने हा मार्ग बंद केल्यास जगावर इंधन संकटाबरोबर अन्न संकटालाही सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता उभी ठाकली आहे. सध्या ट्रम्प यांचा युद्धज्वर काही केल्या कमी होईना आणि इराण अमेरिकेसमोर दीर्घकालीन युद्धाच्या तयारीत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसमोरची आव्हाने अधिकच तीव्र होताना दिसत आहेत.

‌‘बाब-अल-मंदेब‌’ हा मार्ग लाल समुद्राला एडनच्या आखाती देशांसोबत जोडणारा महत्त्वाचा आणि मोठा समुद्रीमार्ग असून, त्याच्या एका बाजूला येमेन आणि दुसऱ्या बाजूला आफ्रिकेतील जिबूती देश आहे. या मार्गाची लांबी 20 किलोमीटर असून, यातून मालवाहतूक जहाजे सुएझ कालव्याकडे आणि नंतर युरोपकडे जातात. जवळपास जागतिक व्यापाराच्या दहा ते 12 टक्के व्यापार याच मार्गाने होतो. अर्थात, आशिया आणि युरोप यांच्यातील व्यापाराचा हा एक मुख्य मार्ग आहे. तसेच तेल वाहतुकीच्या दृष्टीनेसुद्धा हा मार्ग महत्त्वाचा असून, अलीकडील काही वर्षांमध्ये या मार्गावरून प्रतिदिवस 40 ते 60 लाख बॅरल्स तेलाची वाहतूक होत असते. त्यामुळे होर्मुझनंतर हाच मार्ग जागतिक इंधनपुरवठ्याचा महत्त्वाचा मार्ग ठरतो.

एकूणच, या मार्गाचे पुरवठा साखळीतील महत्त्व लक्षात घेता, या मार्गावर आलेला कोणताही व्यत्यय जागतिक बाजारपेठेतील किमतींचे संतुलन ढवळून काढू शकतो. जर हा मार्ग अस्थिर झाला, तर ऊर्जा आणि अन्न या दोन्ही क्षेत्रांत एकत्रित संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत येमेनमधील ‌‘हुती‌’ गटाची भूमिकादेखील या मार्गावर विशेष महत्त्वाची ठरते. इराणशी जवळीक असलेला हा दहशतवादी गट ‌‘बाब अल-मंदेब‌’ या मार्गाला प्रभावित करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या संभाव्य घडामोडींचे परिणाम बहुपेडी असतील. ऊर्जा क्षेत्रात तेलपुरवठा कमी होऊन किमतींमध्ये तीव्र वाढ होईल. त्याचबरोबर अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या मार्गातील अडथळ्यांमुळे आफ्रिका आणि आशियातील विकसनशील देशांमध्ये अन्नधान्याच्या किमती वाढण्याची आणि टंचाई निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. व्यापाराच्याही दृष्टीने, जहाजांना आफ्रिकेच्या ‌‘केप ऑफ गुड होप‌’ला वळसा घालावा लागल्यास, वाहतुकीचा कालावधी आणि खर्च मोठ्या प्रमाणावर वाढेल. जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चितता वाढून, औद्योगिक उत्पादनावर परिणाम होईल आणि शेवटी त्याचा भार ग्राहकांवरच पडेल.

या पार्श्वभूमीवर महासत्तांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. सध्या अमेरिका समुद्रमार्ग खुला करण्यासाठी इराणवर दबाव वाढवत आहेत, तर इराण याच मार्गांचा वापर भू-राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी करत आहे. चीन, रशिया आणि मुख्यत्वे भारत या देशांची भूमिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे. भारताचे स्थान पाहता, त्याची भूमिका अधिकच महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. एकूणच, इराण-अमेरिका युद्धातील तणावादरम्यान इराणने ‌‘बाब अल-मंदेब‌’ जलमार्गाकडे वळवलेले त्याचे लक्ष जागतिक व्यवस्थेसाठीच धोक्याची घंटा ठरू शकते. यामध्ये संबंधित दोन्ही देशांनी संयमाचा मार्ग स्वीकारला नाही, तर हे जलमार्ग जागतिक अस्थिरतेचेच कारण ठरतील आणि त्याचे परिणाम प्रत्येक राष्ट्राला भोगावे लागतील.

- कौस्तुभ वीरकर