मुंबई : (Ashok Kharat Case) नाशिकमध्ये खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटीने (SIT) तपासाचा वेग वाढवला आहे. एकूण ११ गुन्ह्यांचा तपास सुरू असून यात ८ गुन्हे महिला अत्याचाराशी संबंधित आहेत. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन पैसे उकळणाऱ्या या भोंदूबाबाचे पितळ आता उघडे पडले आहे. भोंदू खरातची एसआयटीद्वारे चौकशी केली जात असून दररोज या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचप्रकरणी आतापर्यंत तपासात कोणती माहिती समोर आली? याबाबतची सविस्तर माहिती एसआयटीच्या प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी ७ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.(Ashok Kharat Case)
तेजस्विनी सातपुते काय म्हणाल्या?
"अशोक खरात प्रकरणाबाबतचे एकूण ११ गुन्हे एसआयटीकडे तपासासाठी आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीकडे दोन पोलीस उपअधीक्षक, तीन सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी असे मिळून २४ जणांचं एसआयटीचं पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. अशोक खरातवर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. या १२ गुन्ह्यांपैकी अशोक खरातच्या विरोधातील ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे, तर अशोक खराच्या विरोधात नसलेले पण याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या २ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत. तसेच एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. यातील एसआयटीकडे तपासासाठी आलेले ८ गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराबाबतचे आहेत. तसेच उर्वरित ३ गुन्हे हे फसवणूक आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा याबाबतचे आहेत", अशी माहिती तेजस्विनी सातपुते यांनी दिली.(Ashok Kharat Case)
एसआयटीच्या तपासातून आतापर्यंत काय समोर आलं?
"आतापर्यंत एसआयटीने केलेल्या तपासादरम्यान ३० पेक्षा जास्त साक्षीदारांची चौकशी केली. त्यानुसार आरोपी हा पीडित महिलांचा गैरफायदा घेत होता. आरोपी हा दैवी शक्तीची भीती दाखवत होता. खडे, रुद्राक्ष, चिंचुके, विधी अशा विविध माध्यमांतून आरोपी हा पैसे उकळण्याचे काम करत होता. पीडितांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून बदनामी करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता", अशी माहिती समोर आल्याचं तेजस्विनी सातपुते यांनी सांगितलं आहे.(Ashok Kharat Case)
आक्षेपार्ह व्हिडीओच्या ४६५० लिंक्स हटवल्या
"या घटनेतील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्या व्हिडीओच्या एकूण ४६५० लिंक्स सायबर टीमने हटवल्या आहेत. यासाठी ४ जणांची टीम काम करत असून आणखी लक्ष ठेऊन आहे. तसेच या घटनेबाबत सोशल मीडियावर वारंवार शेअर करणाऱ्या ४५१ अकाउंट्स कायमस्वरुपी बंद करण्यात आलेले आहेत. तसेच पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झालेले आहेत", अशी माहिती तेजस्विनी सातपुते यांनी सांगितली आहे.(Ashok Kharat Case)