डोळ्यांचे आरोग्य तुमच्या हाती - डॉ. अनघा हेरूर

    07-Apr-2026   
Total Views |

गेल्या तीन दशकांच्या प्रदीर्घ अनुभवांच्या जोरावर हजारोंची दृष्टी आणि ओठांवर हसू उमटविणाऱ्या ‌‘महाराष्ट्र ऑप्थेल्मोलॉजिकल सोसायटी‌’च्या अध्यक्षा आणि ‌‘अनिल आय रुग्णालया‌’च्या ‌‘मेडिकल डायरेक्टर‌’ डॉ. अनघा हेरूर यांच्याशी ‌‘जागतिक आरोग्य दिना‌’च्या निमित्ताने साधलेला संवाद...

मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाचे आणि तितकेच नाजूक अवयव म्हणजे डोळे. डोळे निरोगी राहावे, म्हणून काय खबरदारी घ्यावी?

‌‘असेल दृष्टी तर पाहू सृष्टी‌’ असे बोलले जाते. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आपल्या डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्येही चष्मा लागण्याचे प्रमाण आता खूप वाढलेले आहे. 2050 पर्यंत जगातील एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांना चष्म्याचा नंबर ‌‘मायनस‌’ असणार आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल, तर नियमित डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. कोणताही डोळ्याचा त्रास नसताना वयाच्या सहा महिन्यांपासून डोळे तपासणी केली पाहिजे. त्यानंतर तीन वर्षांनंतर, पाच वर्षांनंतर डोळेतपासणी केली पाहिजे. मुले मोठी झाली की मोबाईल, टीव्हीचा वापर वाढलेला असतो. डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे वर्षभरात एकदातरी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. चष्म्याचा नंबर तपासणीनंतरच समजतो. तसेच डोळ्यात मोतीबिंदू (कॅटरॅक्ट), काचबिंदू आहे का? डोळ्यांच्या पाठीमागे अथवा पडद्यामागे काही बदल घडले आहे का? मधुमेहाचे प्रमाण किती आहे, त्यादृष्टीने डोळ्याची तपासणी केली पाहिजे. डोळ्यांच्या तपासणीनंतर निदान करून उपचार केले जातात. म्हणून नियमित तपासणी गरजेची आहे.

डोळ्यांच्या कोणकोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्या रुग्णालयात करण्यात येतात?

रुग्णालयात लहान मुलांची विशेष काळजी घेतली जाते. ‌‘मायोपिया‌’ आणि ‌‘मायनस नंबर‌’चे जे रुग्ण आहेत, त्यांची तपासणी करून ‌‘मायोपिया‌’ वाढू नये, याकरिता त्यांची विशेष चाचणी व विशेष चष्मा देतो. या चष्म्यामुळे वाढणारा ‌‘मायनस‌’ नंबर कमी होण्यास मदत होते. विशेष ड्रॉप्स देतो. काही मुलांना चष्मा नसला, तरी डोळे आणि डोके दुखणे हे ‌‘आय फोकसिंग‌’च्या अडचणी आहेत. त्यावर उपचार केले जातात. वाढत्या वयातील मुलांना चष्मा लागला, तर त्यांचा चष्मा काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. त्याला ‌‘लेसिक शस्त्रक्रिया‌’ म्हटले जाते. या परिसरातील पहिले आणि एकमेव ‌‘ब्लेडलेस लेसिक‌’ उपचार केले जाणारे आमचे सेंटर आहे. जाड भिंगाचा चष्मा यापासून अनेकांना मुक्ती या शस्त्रक्रियेमुळे मिळालेली आहे. वयस्कर माणसांमध्ये ‌‘मोतीबिंदू‌’ ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. या शस्त्रक्रियेसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि उत्तम प्रतीच्या लेनसेस वापरल्या जातात. ‌‘रोबिटिक‌’ तंत्रज्ञानाचा वापर येथे केला जातो. नेत्रपटलाच्या समस्येसाठी एक वेगळा विभाग आपल्याकडे आहे. त्यासाठी एक मशीनरीदेखील आपण आणली आहे. त्या मशीनच्या माध्यमातून छोट्या बाहुलीतून पाठीमागचा पडदादेखील चेक करू शकतो. डोळ्यांची प्लॉस्टिक सजरदेखील याठिकाणी केली जाते. याव्यतिरिक्त अनेक उपचार येथे उपलब्ध आहेत.

‘अनिल आय रुग्णालया‌’च्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे?

‌‘अनिल आय रुग्णालया‌’ची स्थापना 1972 मध्ये माझ्या सासूबाई डॉ. उमा हेरूर यांनी केली. त्यावेळी 750 स्केअर फूटचे एक छोटेसे रुग्णालय होते. त्यानंतर मी 1997 मध्ये रुजू झाले. या काळात रुग्णालयाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. आपल्याकडे आता सात सेंटर आहेत. डोंबिवलीत 15 हजार स्केअर फूटचे पाच मजली रुग्णालय आहे. हे ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठे नेत्र रुग्णालय आहे. कल्याण, बदलापूर, पलावा, ठाण्यात दोन सेंटर आहेत. नवीन तंत्रज्ञान आणि रुग्णाचे प्रेम आणि आशीर्वाद यांच्यामुळे हा विस्तार करणे शक्य झाले. माझ्या सासूबाईंनी लावलेल्या इवल्याशा रोपट्यांचे आता मोठ्या वटवृक्षात रूपातंर झाले आहे.

भविष्यात तुमच्या रुग्णालयाच्या शाखा नवी मुंबई आणि मुंबईत आम्हाला पाहायला मिळतील का?

आपल्या रुग्णांच्या विश्वास आणि प्रेमामुळे येत्या काही काळात आपल्या शाखा मुंबई आणि नवी मुंबई परिसरातदेखील दिसून येतील. आईवडील आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आपण विस्तार नक्की करू.

‘जागतिक आरोग्य दिना‌’निमित्त दृष्टिदोष असणाऱ्यांना काय सल्ला द्याल?

आपल्या डोळ्यांना कोणत्याही त्रास झाला, तरी डॉक्टरांकडे जाऊन त्यांची योग्य ती तपासणी केली पाहिजे. चाळीशीनंतर काचबिंदूचा धोका असतो. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे खाल्ली पाहिजेत. सौंदर्यप्रसाधने वापरताना काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी डोळ्यांची काळजी घेतली, तर आपले डोळे नक्कीच सुरक्षित राहतील.