DP Aryal : नेपाळच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षपदी 'डीपी अर्याल'

रेस्टॉरंटमध्ये भांडी घासणारा ते संसद अध्यक्ष; प्रेरणादायी प्रवास

    07-Apr-2026   
Total Views |
 
DP Aryal
 
मुंबई : (DP Aryal) नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे उपाध्यक्ष डोल प्रसाद (डीपी) अर्याल (DP Aryal) यांची प्रतिनिधी सभेच्या सभापतीपदी निवड झाली आहे. शीतल निवास येथे नुकत्याच झालेल्या समारंभात नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी अर्याल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यापूर्वी प्रतिनिधी सभेच्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली होती. अर्याल यांनी गेल्या शुक्रवारी संसद सचिवालयात उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि या पदासाठी ते एकमेव उमेदवार होते. संसदेत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाकडे दोन-तृतीयांश बहुमत असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती.(DP Aryal)
 
डीपी अर्याल (DP Aryal) यांचा जन्म १९७४ मध्ये धादिंग जिल्ह्यातील मैदी गावात झाला. साध्या कुटुंबात वाढलेल्या अर्याल यांनी १९९२ मध्ये चांगल्या भविष्यासाठी काठमांडूकडे वाटचाल केली. येथे त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये मजूर म्हणून काम सुरू केले, जिथे त्यांचे काम जूठी भांडी धुणे आणि टेबल साफ करणे असे होते. हळूहळू त्यांनी पर्यटन मार्गदर्शक (टुरिस्ट गाइड) म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर रोजगार आणि शिक्षणासाठी ते जपानला गेले, जिथे त्यांनी सुमारे आठ वर्षे राहून आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवला. नेपाळमध्ये परतल्यानंतर त्यांनी पर्यटन, शिक्षण, सहकारी संस्था आणि रेमिटन्स क्षेत्रात गुंतवणूक केली. एकेकाळी मजूर म्हणून काम करणारे अर्याल पुढे इजीलिंक रेमिटन्सचे सीईओही झाले.(DP Aryal)
 
राजकारणात त्यांचा प्रवेश २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या स्थापनेनंतर झाला. ते पक्षाचे संस्थापक केंद्रीय सदस्य बनले आणि पक्षाध्यक्ष रवि लामिछाने यांचे निकटवर्तीय मानले जातात. पुढे त्यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. रवि लामिछाने सहकारी घोटाळा प्रकरणात कारागृहात असताना अर्याल यांनी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. ते काठमांडू संसदीय मतदारसंघ क्रमांक ९ मधून मोठ्या मताधिक्याने निवडून प्रतिनिधी सभेत पोहोचले. २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष देशातील चौथा सर्वात मोठा पक्ष ठरला. सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर डीपी अर्याल यांना श्रम आणि रोजगार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. तथापि, त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ २२ दिवसांचा होता. मात्र नंतर पक्ष पुन्हा सत्तेत सहभागी झाल्यावर त्यांना पुन्हा त्याच मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.(DP Aryal)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक