थोरियम-आधारित ऊर्जा निर्मितीकडे भारताची निर्णायक वाटचाल, ५०० मेगावॅट क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरने गाठला महत्वपूर्ण टप्पा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संशोधकांचे अभिनंदन केले

Total Views |
India is moving decisively towards generating Power from thorium
 
नवी दिल्ली : (Civil Nuclear Energy)भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाचा टप्पा गाठत ५०० मेगावॅट क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअॅक्टरने दि.६ एप्रिल रोजी रात्री ८:२५ वाजता यशस्वीरित्या ‘क्रिटिकलिटी’ प्राप्त केली. भारताने आपल्या तीन-टप्प्यातील अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठी प्रगती साधली आहे. हा रिअॅक्टर तमिळनाडूतील कल्पक्कम येथे उभारण्यात आला आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा प्रगत रिअॅक्टर भारताच्या वैज्ञानिक व अभियांत्रिकी क्षमतेचे द्योतक आहे. नागरी अणुऊर्जा प्रवासातील हे एक निर्णायक पाऊल आहे.”(Civil Nuclear Energy)
 
या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या वेळी अणुऊर्जा विभागाचे सचिव व अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक श्रीकुमार जी.पिल्लई, भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड (भाविनी)चे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अल्लू अनंत आणि माजी सीएमडी के. व्ही. सुरेश कुमार उपस्थित होते. अणुऊर्जा नियामक मंडळाच्या मंजुरीनंतर सर्व सुरक्षा निकष पूर्ण करून हे यश मिळवण्यात आले.(Civil Nuclear Energy)
 
इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राने या रिअॅक्टरची स्वदेशी रचना व विकास केला असून त्याचे बांधकाम आणि कार्यान्वयन ‘भाविनी’ने केले आहे. फास्ट ब्रीडर तंत्रज्ञान हे सध्याच्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स आणि भविष्यातील थोरियम-आधारित प्रणाली यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. यामुळे भारताला स्वच्छ, शाश्वत आणि दीर्घकालीन ऊर्जा निर्मिती साध्य करता येणार आहे. पीएफबीआरमध्ये प्रगत सुरक्षा प्रणाली, उच्च तापमानाचे तरल सोडियम शीतलक तंत्रज्ञान आणि बंद इंधन चक्राचा वापर करण्यात आला आहे. यामुळे इंधनाचा पुनर्वापर, अधिक कार्यक्षमता आणि किरणोत्सर्गी कचऱ्यात घट साध्य होते.(Civil Nuclear Energy)
 
याशिवाय, या रिअॅक्टरची रचना भविष्यात थोरियम-२३२चा वापर करून युरेनियम-२३३ निर्मितीसाठी अनुकूल आहे, ज्यामुळे भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याला गती मिळणार आहे. मर्यादित युरेनियम साठ्याचा अधिक कार्यक्षम वापर करून थोरियम-आधारित ऊर्जा निर्मितीसाठी मार्ग मोकळा होणार आहे.(Civil Nuclear Energy)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.