कॅन्सरग्रस्तांच्या आयुष्यात आम्ही भरतोय आनंदाचे रंग!

    07-Apr-2026   
Total Views |

‘कॅन्सर‌’ या शब्दानेच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. पण, याच दुर्धर व्याधीवर आपल्या कौशल्याने मात करत हजारो रुग्णांना ‌‘जीवनदान‌’ देणारे नाव म्हणजे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर. केवळ वैद्यकीय उपचार नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही त्यांनी केले आहे. ‌‘गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट‌’च्या माध्यमातून माणुसकीचा झराही वाहता ठेवला आहे. ‌‘जागतिक आरोग्य दिना‌’निमित्त कॅन्सरचे वाढते आव्हान आणि आधुनिक उपचारपद्धती याविषयी डॉ. हेरूर यांच्याशी साधलेला संवाद...

‘अनिल कॅन्सर क्लिनिक‌’च्या स्थापनेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.

माझे बालपण सर्व शिक्षण, डोंबिवलीत झाले. त्यामुळे या शहराशी माझी एक नाळ जुळलेली आहे. त्यामुळे शहरासाठी काहीतरी करायचे होते. कॅन्सरचे निदान नाही, तर त्यापलीकडे जाऊन शल्यक्रिया आणि ‌‘केमोथेरपी‌’ करता आली; तर शहरासाठी एक चांगले योगदान ठरेल. त्यातून ‌‘डे केअर थेरपी‌’ची संकल्पना आली. ‌‘केमोथेरपी‌’नंतर लगेचच त्यांना घरी जाता येईल. त्यांना दूर जावे लागणार नाही, म्हणून ते परवडणारे होते. औषधे होलसेलरकडून घेतल्याने त्यांचाही फायदा रुग्णांना झाला. मोठ्या रुग्णालयातील औषधांच्या किमतीपेक्षा कमी दरात ती मिळत असत. ‌‘सहज उपलब्ध होणारे‌’ आणि ‌‘परवडणारे‌’ हे दोन शब्द प्रत्यक्षात कृतीत आणायचे होते आणि त्यातूनच ‌‘अनिल कॅन्सर क्लिनिक‌’ची स्थापना झाली.

‘अनिल कॅन्सर क्लिनिक‌’ची स्थापना करताना कोणता संघर्ष करावा लागला?

‌‘कॅन्सर‌’ हा शब्द ऐकल्यावर माणूस घाबरतो. रुग्णांची मानसिकताच त्यांना अध संपवते. म्हणूनच, आपला प्रयत्न रुग्णांची मानसिकता बदलण्याचा असतो. रुग्णांची मानसिकता बदलू शकलो, तरी अध लढाई आपण तिथेच जिंकतो. 25 वर्षांपूव मी ‌‘टाटा‌’मधून प्रशिक्षण घेतले. काहीकाळ विदेशात जाऊनदेखील प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर कॅन्सरचा उपचार होऊ शकतो आणि तेसुद्धा टाटा रुग्णालयाव्यतिरिक्त, यावरच कोणाचा विश्वास नव्हता. त्यामुळे पहिला लढा हा त्या मानसिकतेच्या विरोधात द्यावा लागला. कर्करोग झाला म्हणजे काशीला जाणे आले, अशी लोकांची समजूत होती. दुसरी गोष्ट म्हणजे, चाकरमान्यांना नोकरीसाठी मुंबईला जावे लागते. मग आता उपचारासाठी पण जायचे का? त्यातही महिनोन्‌‍महिने वेटिंग लिस्ट, यामुळे काही रुग्ण उपचार सोडून द्यायचे. नोकरी सोडून आपल्या आई-वडिलांना घेऊन रुग्णालयाच्या खेटा घालणे शक्य नाही, ही अनेक आव्हाने समोर होती.

कॅन्सरचे विविध प्रकार कोणते आहेत आणि त्यांची प्राथमिक लक्षणे कशी ओळखावीत?

कॅन्सर म्हणजे एक आजार, असे लोकांना वाटते. सर्व कॅन्सर प्रकार एकसारखे असतात, अशी समजूत झाली आहे; पण असे नाही. कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत. शरीरातील प्रत्येक अवयवाला कॅन्सरचा धोका आहे. अगदी डोळ्यांच्या बुबळांचादेखील कॅन्सर होऊ शकतात. स्तनाचा, पोटाचा आणि जठराचा कॅन्सर वेगवेगळे असतात. कॅन्सरची पोटजात शोधून काढली, तर मग त्यावर योग्य उपचार केला जातो. त्यासाठी ‌‘बायोप्सी‌’ केली जाते. त्यामुळे कॅन्सर पसरत नाही. गाठीचे परीक्षण करावे लागते. त्यानंतर कधीकधी शस्त्रक्रिया न करताही तो बरा होऊ शकतो. कॅन्सरचे विविध प्रकार असल्याने कोणत्या कॅन्सरवर उपचार करायचे, हे पाहावे लागते.

सर्वाधिक रुग्ण कोणत्या प्रकारच्या कॅन्सरचे आढळून येतात?

भारतात दरवष 12 ते 13 लाख नागरिक कॅन्सरग्रस्त होताना दिसत आहेत. सध्या कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पण, त्यात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दीड ते दोन लाख लोकांना स्तनाचा कर्करोग होतो. त्याचे प्रमाण वाढत आहे. मोठ्या आतड्याचे प्रमाण, मी प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा महिन्यातून एक-दोन रुग्ण येत होते. आता हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गायनेकोलॉजिकल कॅन्सरचे प्रमाणदेखील वाढत आहे.

कॅन्सर उपचारपद्धतीमध्ये मोठी तांत्रिक क्रांती झाली आहे. रुग्णालयात तुम्ही कशा पद्धतीने याचा वापर करत आहात?

कॅन्सर उपचारपद्धतीमध्ये ज्या नवीन गोष्टी येतात, ती गोष्ट आपल्याला आली पाहिजे. जग दररोज बदलताना दिसत आहे. मी जे ‌‘टाटा‌’मधून शिक्षण घेतले आणि आज कॅन्सरच्या ज्या उपचारपद्धती आहेत, त्यातील काही उपचारपद्धती ओळखताही येणार नाहीत, एवढे क्रांतिकारक बदल होत गेले आहेत. मोठ्या आतड्यांच्या रोगांवर उपचार करणे, हे माझे ‌‘पॅशन‌’ आहे. त्यात आता कमीत-कमी कट करून दुर्बिणीने शल्यचिकित्सा केली जाते. ‌‘रोबोट‌’ पद्धतीचा वापर केला जातो.उपचारपद्धतीत क्रांती झाल्याने रुग्ण तीन ते चार दिवसांत घरी जाऊ लागले आहेत. रुग्णांना वेदना कमी होतात. ‌‘क्युअर‌’ ही कॅन्सरमधील सकारात्मक गोष्ट आहे. आता 80 ते 90 टक्के रुग्ण कॅन्सरमुक्त होत आहेत. त्यात फक्त कॅन्सरचे निदान वेळेत होणे गरजेचे आहे. त्यांना ‌‘क्वालिटी ऑफ लाईफ‌’ देण्याचा प्रयत्न असतो. आमची संपूर्ण टीम रुग्णाला बरे करण्यासाठी प्रयत्न करते.

‘गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट‌’ या संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी काय सांगाल?

‌‘गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट‌’ ही 2013 पासून सुरू केली आहे. ‌‘मेमोग्रॉफी‌’च्या माध्यमातून हा उपक्रम राबवितो. कॅन्सर तपासणी, रुग्णांना मदत करणे हे काम करते. ‌‘मैत्री ग्रुप‌’ हा एक ग्रुप आहे. एका रुग्णाने आपला प्रवास सांगितला, तर रुग्णाला धीर येतो. त्यामुळे या ग्रुपची गरज वाढली आहे. मुले परदेशात राहतात, अशा वेळी त्या रुग्णांना ‌‘सपोर्ट ग्रुप‌’ धीर देणारा ठरतो.