गोर बंजारा समाजाच्या तांड्यावरील सामाजिक कार्यापासून ते राज्यभर जनसंपर्क, आंदोलन आणि संघटनात्मक कामाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या अमोल पवार यांच्या वाटचालीचा मागोवा...
गोर बंजारा समाजाच्या तांड्यांवरचं जीवन हे कष्ट, स्थलांतर आणि मर्यादांशी झुंज देत पुढे जाणारं. ऊसतोडीच्या हंगामानुसार बदलणारी जगण्याची दिशा, शिक्षणात खंड, आणि मूलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक पिढ्या वाढल्या. या वास्तवातूनच काहीजण स्वतःपुरतं आयुष्य न जगता, समाजासाठी उभं राहण्याचा मार्ग निवडतात. अमोल पवार यांचा प्रवास हा त्याच पायावर उभा आहे.
लहानपणापासूनच कष्टकरी वातावरणात वाढताना त्यांनी आयुष्याचा संघर्ष जवळून अनुभवला. घरची परिस्थिती मर्यादित असतानाही शिक्षण घेण्याची धडपड त्यांनी कायम ठेवली. काहीकाळ ऊसतोडीच्या कामाचा अनुभवही आला. या सगळ्या अनुभवांनी त्यांच्या विचारांना एक दिशा दिली, समाजातील अडचणी केवळ समजून घेण्यापेक्षा त्यावर काम करण्याची!
तांड्यावरूनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत, त्यांनी लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं. संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यात दिसून येतो. समाजात एकोपा आणि जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवले. या टप्प्यावर त्यांनी स्वतःची ओळख एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून निर्माण केली.
पुढे शिक्षण आणि उपजीविकेसाठी पुण्यात गेल्यानंतर त्यांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या. शहरात काम करताना त्यांनी स्थलांतरित कष्टकरी, बांधकाम कामगार आणि रोजंदारीवर जगणाऱ्या समाजबांधवांचं वास्तव जवळून पाहिलं. कागदपत्रांच्या अडचणी, शासकीय योजनांचा अभाव आणि अस्थिर जीवनशैली या सगळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्यांनी समजून घेतल्या. या टप्प्यावर त्यांनी त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली.
अमोल पवार यांनी या समस्यांकडे केवळ तक्रारींच्या स्वरूपात पाहिलं नाही, तर त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकवेळा संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन पाठपुरावा करणं, लोकांना अर्ज-प्रक्रिया समजावून सांगणं आणि गरज भासल्यास स्वतः पुढाकार घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं या गोष्टी त्यांच्या कामाचा भाग बनल्या. त्यामुळेच त्यांच्या कामाला प्रत्यक्ष परिणामकारकता प्राप्त झाली.
महाराष्ट्रातील वाड्या, वस्त्या आणि तांड्यांमध्ये फिरताना त्यांनी गोर बंजारा समाजाच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास केला. शिक्षण, रोजगार, जातप्रमाणपत्रं, आरक्षण आणि शासकीय योजनांपर्यंत पोहोच न होणं या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने काम केलं. त्यांच्या कार्यपद्धतीत प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधणं आणि त्यांच्या अडचणी समजून घेणं याला प्राधान्य आहे.
संघटनात्मक काम करताना त्यांनी ‘राष्ट्रीय बंजारा परिषदे’त विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. प्रदेश प्रवक्ता म्हणून त्यांनी समाजाचे प्रश्न मांडले. अमोल पवार यांची ओळख त्यांच्या जनसंपर्कातून अधिक ठळक होते. तांड्यावरचा शेतमजूर असो किंवा शहरातील कामगार, प्रत्येकाशी ते आपुलकीने संवाद साधून त्यांचं काम माग लावण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीच्या अडचणीसाठी तत्काळ प्रतिसाद देणं आणि शक्य त्या पातळीवर मदत करणं, ही त्यांची कार्यपद्धती. एखादं काम केल्यावर त्याचा गाजावाजा करण्यापेक्षा पुढचं काम काय, याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळेच त्यांच्या कामावर लोकांचा विश्वास बसतो. समाजात हा माणूस आपल्यासोबत उभा राहतो, ही भावना त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये दिसते.
गोर बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. काहीवेळा या आंदोलनांदरम्यान त्यांना त्रासही सहन करावा लागला; पण त्यांनी काम थांबवलं नाही. त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तरुणांशी संवाद. अनेक युवक त्यांच्या संपर्कात येऊन सामाजिक प्रश्नांबद्दल जागरूक होत आहेत. तांड्याच्या पातळीवरून सुरू झालेला हा संवाद आज विविध स्तरांवर पोहोचला आहे. समाजातील प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करण्याची गरज ते सातत्याने मांडतात. काही ठिकाणी त्यांनी तरुणांना संघटित करून स्थानिक प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रेरित केलं आहे.
आजही त्यांचा वावर तितकाच साधा आहे. कोणत्याही कार्यक्रमात किंवा बैठकीत ते ज्या सहजतेने बोलतात, त्याच सहजतेने तांड्यावरच्या लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्या कामात सातत्य आहे आणि ते प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं आहे, ही बाब त्यांच्या कार्याला वेगळं स्थान देते. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत एक सुसंगती दिसते, जी अनेकदा कार्यकर्त्यांमध्ये दुमळ असते.
अमोल पवार यांची वाटचाल पाहिली, तर ती केवळ एखाद्या कार्यकर्त्याची कथा म्हणून मर्यादित राहात नाही, तर गोर बंजारा समाजाच्या वास्तवाशी घट्ट जोडलेली एक जिवंत प्रक्रिया म्हणून उभी राहते. तांड्याच्या मातीशी नाळ जोडून, कोणताही गाजावाजा न करता सातत्याने काम करत राहणं, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरते.दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
- सागर देवरे
(अधिक माहितीसाठी संपर्क ः 668925469)