वर्सोवा-दहिसर किनारी मार्गासाठी तोडण्यात येणाऱ्या कांदळवनांबाबत बराच ऊहापोह होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी कांदळवने तोडण्यासाठी होकारदेखील दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्यातील कांदळवनांची परिस्थिती मांडणारा हा लेख..
2007 सालच्या सुमारास जेव्हा ‘शाश्वत विकास’ किंवा ‘ब्लू कार्बन’ या संज्ञा जनमानसात फारशा प्रचलित नव्हत्या, तेव्हा एका विलक्षण परिसंस्थेने माझे लक्ष वेधले! ती म्हणजे कांदळवने (Mangroves). ठाणे खाडीच्या किनाऱ्यावर उभे राहून मी जेव्हा पहिल्यांदा त्या चिखलातल्या जंगलात पाऊल ठेवले, तेव्हा मला जाणीव झाली की, हे इतर कोणत्याही सामान्य जंगलासारखे नाही. दिवसातून दोनदा समुद्राच्या भरतीला स्वतःच्या अंगावर घेणारी आणि ओहोटीला पुन्हा मोकळा श्वास घेणारी ही झाडे निसर्गाची एक अजब किमयाच आहेत. ज्यांनी ‘अवतार’ सिनेमा पाहिला असेल, त्यांना त्यातील ‘पँडोरा’ ग्रहावरचे जंगल आठवत असेल; माझ्यासाठी ठाणे खाडीतली ही कांदळवने (Mangroves) अगदी तशीच ‘अद्भुत’ होती.
या झाडांची रचना ही उत्क्रांतीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. जमिनीच्या वर श्वास घेण्यासाठी आलेली vicennia (तिवर) प्रजातीची पेन्सिलसारखी ‘न्यूमॅटोफोर्स’मुळे, Bruguiera (कांदळ) प्रजातीची गुडघ्यासारखी वळलेली ‘नी-रूट्स’ आणि दलदलीत घट्ट पकड ठेवण्यासाठी जमिनीत खोलवर गेलेली Rhizophora (कांदळ) प्रजातीची ‘स्टिल्ट’मुळे; हे सर्व पाहून एखाद्या ‘सायन्स फिक्शन’ चित्रपटात असल्याचा भास होतो. एकमेकांच्या जवळ वाढलेली ही झाडे आणि त्यांचे सदाबहार डौलदार छत्र (Canopy) मनाला भुरळ घालते. याच कुतूहलापोटी मी ठाणे खाडीच्या कांदळवनांवर ‘पीएचडी’ करण्याचे ठरवले.
बी. एन. बांदोडकर महाविद्यालयाच्या ‘प्राणिशास्त्र’ विभागाच्या तत्कालीन प्रमुख डॉ. माधुरी पेजावर यांच्या मार्गदर्शनाखाली माझा हा प्रवास सुरू झाला. त्याकाळी ‘रिसर्च लॅब’मध्ये आम्ही सर्व प्राध्यापक आणि संशोधक विद्याथ एकत्र बसून डबा खायचो. त्या गप्पांमधून ठाणे खाडीचा सुवर्णकाळ उलगडायचा. एकेकाळी जिथे टायगर प्रॉन्स आणि मोती वेचले जायचे, ती खाडी मी संशोधन सुरू करेपर्यंत प्रदूषणाच्या विळख्यात अडकली होती. 2005च्या महापुराने मुंबईचा वेग मंदावला आणि तेव्हा कुठे कांदळवनांचे महत्त्व न्यायालयाला आणि प्रशासनाला उमजले. परिणामी, 2005 मध्ये या क्षेत्राला ‘संरक्षित वने’ आणि पुढे 2013 मध्ये राज्य सरकारने ‘राखीव वने’ (Reserved Forest) असा दर्जा दिला. आज जनतेमध्ये जागरूकता वाढली आहे. कारण, कांदळवने ही केवळ पर्यावरण नाही, तर आपले मूलभूत हक्क (Fundamental Rights) सुरक्षित ठेवण्यासाठीचे महत्त्वाचे घटक आहेत.
2009 मध्ये सुरू झालेल्या माझ्या 18 महिन्यांच्या सखोल संशोधनातून (Field Survey) ठाणे आणि मुंबई परिसरातील कांदळवनांची काही महत्त्वाची तांत्रिक वैशिष्ट्ये समोर आली. संशोधनानुसार ठाणे खाडीत प्रतिहेक्टर एक हजार ते एक हजार, 500 झाडे आहेत. मुंबईच्या इतर किनारपट्टीवर ही घनता सरासरी 635 ते 800 प्रतिहेक्टर इतकी असल्याचे अनेक अहवाल दर्शवतात. यामध्ये प्रामुख्याने ‘तिवर’ (vicennia marina) या प्रजातीचे वर्चस्व 50 टक्के पेक्षा जास्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही कांदळवने प्रतिहेक्टर सरासरी 37.6 टन कार्बन शोषून घेतात. हा ‘ब्लू कार्बन’ जमिनीवरील उष्णकटिबंधीय जंगलांच्या तुलनेत कैकपटीने जास्त प्रभावी असून, जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे. ‘आयआयटी बॉम्बे’च्या अभ्यासानुसार, या परिसंस्थेच्या सेवांचे आर्थिक मूल्य प्रतिहेक्टर वार्षिक 7.7 लाख ते 44 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती निवारण, जलशुद्धीकरण आणि मत्स्य उत्पादकता यांसारख्या मोफत सेवांचा समावेश होतो.
वन विभागासोबत काम करताना कांदळवन लागवड (Mangrove Plantation) ही माझी मुख्य जबाबदारी होती. ज्याठिकाणी कांदळवने नष्ट झाली आहेत किंवा त्यांची स्थिती खालावली आहे (Degraded Mangrove reas), अशा क्षेत्रांच्या पुनरुज्जीवनासाठी पाच वर्षांचे ‘रेस्टोरेशन मॉडेल’ राबवले जाते. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार, सध्या ‘चार हजार 444 झाडे प्रतिहेक्टर’ या उच्चघनता (High Density) मॉडेलचा अवलंब केला जातो. या पद्धतीत सुरुवातीला मोठ्या संख्येने रोपांची लागवड केली जाते, जेणेकरून पुढील चार-पाच वर्षांत त्यांच्यात नैसर्गिक स्पर्धा निर्माण होईल. या प्रक्रियेत ‘नैसर्गिक घट’ (Natural Thinning) होऊन केवळ सशक्त झाडेच तग धरतात आणि कालांतराने एक समृद्ध, नैसर्गिक आणि दाट जंगल तयार होण्यास मदत होते.
‘भारतीय वन सर्वेक्षण’ (एफएसआय)च्या अहवालानुसार, महाराष्ट्र आणि मुंबई उपनगरात कांदळवनांच्या क्षेत्रात नैसर्गिकरीत्या वाढ झाली आहे. मात्र, या वाढीमागील तांत्रिक कारण चिंताजनक आहे. नागरी पायाभूत विकास प्रकल्प आणि जमिनीची धूप यामुळे खाडीत गाळ साचण्याचे (Siltation) प्रमाण वाढले आहे. हा गाळ कांदळवनांच्या वाढीसाठी अनुकूल ठरत असल्याने ही झाडे खाडीच्या मध्य भागाकडे (Water-ward side) सरकत आहेत. तांत्रिकदृष्ट्या जंगल वाढत असले, तरी प्रत्यक्षात खाडीची रुंदी आणि खोली कमी (Shrinking of Creeks) होत आहे. जर खाड्या अशाच बुजत गेल्या, तर भविष्यात तिथे अतिक्रमणे वाढतील आणि शहराला ना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल, ना स्वच्छ हवा.
कांदळवने इतर झाडांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त कार्बन शोषतात आणि तितक्याच पटीने ऑक्सिजन देतात; पण दुर्दैवाने, ‘देणारा देत जातो, घेणारा घेत राहतो... आणि शेवटी घेणारा भिकारीच राहतो’, ही म्हण इथे लागू पडते. आपण या निसर्गाचे हातच ओरबाडून घेत आहोत. कांदळवने हे केवळ वनस्पती नसून, ते किनारपट्टीच्या सुरक्षिततेचे आणि अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. ‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ या मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि हवामानबदलाच्या काळात मुंबई-ठाण्यासारख्या शहरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी या परिसंस्थेचे जतन करणे अपरिहार्य आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखताना कांदळवनांच्या वैज्ञानिक संरक्षणाकडे दुर्लक्ष करणे, हे भविष्यात महागात पडू शकते. कांदळवनांचे संरक्षण करणे ही आपली केवळ नैतिक नाही, तर कायदेशीर जबाबदारी आहे.
आजच्या काळात जाहिरातींद्वारे आपल्याला सतत खरेदीचे प्रलोभन दाखवले जाते. तिथे गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ‘मिनिमलिझम’ (Minimalism) स्वीकारण्याची गरज आहे. आपल्याला खरोखर गरज आहे, तितक्याच गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. आजचा हा तथाकथित क्षणिक आनंद भविष्यात केवळ ‘कचरा’ म्हणून ओळखला जातो आणि शेवटी तो कचरा आपल्या कांदळवनांना गिलंकृत करतो. वाढते प्रदूषण शोषून घेण्यासाठी आणि आपल्याला पुरेसा ऑक्सिजन पुरवण्यासाठी ही कांदळवने निसर्गाकडून मिळालेली एक नैसर्गिक ‘दुआ’ (वरदान) आहेत. शासन, नागरिक आणि आपण सर्वांनीच आता विचार करण्याची वेळ आली आहे... नाही का? अन्यथा, मुंबईची ‘दिल्ली’ व्हायला फारवेळ लागणार नाही.
- डॉ. शीतल पाचपांडे
(लेखिका कांदळवन अभ्यासक आहेत.)
7738531889