पक्ष्यांची ‌‘कृत्रिम बेटे‌’

    06-Apr-2026
Total Views |

जलाशयांमधील नैसर्गिक अथवा कृत्रिम बेटे हादेखील अधिवासाचा एक भाग असतो. पक्ष्यांना हा अधिवास अधिक फायदेशीर ठरतो. अशा वेळी संरक्षित वन क्षेत्रांमध्ये हा अधिवास निर्माण करण्यासाठी खास करून पक्ष्यांच्या अनुषंगाने त्याची बांधणी करण्यासाठी काय करावे, हे विशद करणारा लेख...

संरक्षित वन क्षेत्रामधील जलाशयांमध्ये तयार केलेली कृत्रिम बेटे ही पक्ष्यांना, विशेषतः पाणपक्ष्यांना सुरक्षित अधिवास निर्माण करण्याच्या उद्देशाने एक अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. ही बेटे पक्ष्यांना विश्रांती घेण्यासाठी, प्रजनन करण्यासाठी, बसण्यासाठी (perching) आणि मानवी हालचाल विरहित अधिवास करण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देतात. या बेटांचे योग्य नियोजन केल्यास ती पाण्याच्या मध्यभागी लहान पक्षी आश्रयस्थान (bird shelters) बनू शकतात. पक्ष्यांसाठी तयार केलेल्या बेटांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षितता. बेट पाण्याने वेढलेले असल्यामुळे कुत्रे, कोल्हे, साप आणि अगदी माणसेसुद्धा तिथे सहज पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालणे, पिले वाढवणे आणि भीतीशिवाय विश्रांती घेणे, यासाठी अधिक चांगला अधिवास मिळतो. अशी बेटे रस्ते, गावे, शेती क्षेत्रे आणि बोटींच्या मार्गांपासून दूर असल्यामुळे मानवी व्यत्यय (disturbance) कमी होतो. विशेषतः प्रजनन आणि घरटी बांधण्याच्या हंगामात पक्ष्यांना शांतता अत्यंत आवश्यक असते. ही शांतता या बेटांमुळे त्यांना मिळते.

ही बेटे उत्तम अधिवास(habitat)देखील उपलब्ध करून देतात. मोकळी जमीन, गवत, लहान झुडपे आणि निवडक काटेरी वनस्पती, यामुळे अनेक पक्षी प्रजातींसाठी हे ठिकाण अनुकूल बनते. या वनस्पतींचा वापर पक्षी घरटी बांधण्यासाठी, लपण्यासाठी, विश्रांतीसाठी (roosting) आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी करतात. जलाशयाच्या आत असल्यामुळे त्यांना मासे, कीटक, बेडूक आणि जलीय वनस्पती यांसारखे अन्न सहज उपलब्ध होते, तसेच पिण्यासाठी पाणीही मिळते. बेटांवर काटेरी झाडे किंवा झुडुपे लावल्यास सुरक्षितता आणखी वाढते. काटेरी फांद्या मांजरे, साप, घोरपड आणि माकडे यांसारख्या शिकारी प्राण्यांना सहज चढण्यापासून रोखतात. पक्षी अशा दाट फांद्यांमध्ये घरटी बांधून, त्यात अंडी लपवून पिलांचे संरक्षण करतात. तसेच दिवसा बसण्यासाठी (perch) आणि रात्री विश्रांतीसाठी (roost) या झाडांचा उपयोग करतात. अशा वनस्पती कडक उन्हापासून, वाऱ्यापासून आणि व्यत्ययांपासून संरक्षण देतात. तसेच काटेरी वनस्पतींमुळे कीटक आकर्षित होतात आणि लहान पक्ष्यांसाठी खाण्याचीही तजवीज होते. याप्रकारे काटेरी वनस्पती नैसर्गिक संरक्षण कवच (protective shelter) म्हणून काम करतात.

कृत्रिम बेटांची निर्मिती करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे कोरडा हंगाम (dry season), जेव्हा पाण्याची पातळी कमी असते. त्यावेळी काम करणे सोपे, कमी खर्चिक आणि अधिक स्थिर असते. बेटांचे बांधकाम हे प्रजनन हंगाम सुरू होण्यापूव किंवा स्थलांतरित पक्षी येण्यापूव पूर्ण करावे, जेणेकरून पक्षी कोणत्याही व्यत्ययाशिवाय बेटांचा वापर सुरू करू शकतील. बेटाच्या माध्यमातून जमिनीवर घरटी बांधणाऱ्या जलपक्ष्यांना मदत करणे हा उद्देश असल्यास, अतिशय उंच झाडे टाळावीत. कारण, ती शिकारी प्राण्यांना आकर्षित करू शकतात किंवा मोकळ्या जागेची गरज असलेल्या पक्ष्यांना अडथळा ठरू शकतात. बेट तयार झाल्यानंतर नियमित निरीक्षण आवश्यक आहे.

मातीचे क्षरण (erosion), वनस्पतींची अतिवाढ, शिकाऱ्यांचा प्रवेश आणि पक्ष्यांचा वापर यावर लक्ष ठेवावे. मी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‌‘क्षेत्र संचालक‌’ म्हणून कार्यरत असताना, अकोला वन्यजीव विभागातील ‌‘काटेपूर्णा अभयारण्या‌’त असलेल्या ‌‘काटेपूर्णा जलाशया‌’त कृत्रिम बेटे तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. यामागील उद्देश पाणपक्ष्यांसाठी सुरक्षित घरटी आणि विश्रांतीची ठिकाणे उपलब्ध करून देणे हा होता. पाण्याच्या मध्यभागी असलेली बेटे भटकी कुत्री, गुरेढोरे आणि मानवी व्यत्ययापासून पक्ष्यांचे संरक्षण करू शकतात, या संकल्पनेवर हा उपक्रम आधारित होता. अत्यंत समाधानाची बाब म्हणजे, या कृत्रिम बेटांमुळे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. अलीकडील भेटीदरम्यान, या बेटांवर ‌‘नदी टर्न‌’ (River Tern) पक्ष्यांची जवळपास 40 घरटी आढळली, ज्यामध्ये सुमारे 300 अंडी होती. हे या संवर्धन उपक्रमाच्या यशाचे स्पष्ट उदाहरण आहे.

महाराष्ट्रात अशा कृत्रिम बेटांचा प्रयोग अनेक मोठ्या जलाशयांमध्ये, बॅकवॉटर भागांमध्ये आणि जल क्षेत्रांमध्ये करता येऊ शकतो, जिथे पाणपक्षी मोठ्या संख्येने आढळतात. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जलाशय यासाठी योग्य ठरू शकतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर जलाशयांमधील कृत्रिम पक्षी बेटे ही पाण्याच्या मध्यभागी असलेली सुरक्षित घरे आहेत. योग्य नियोजन, योग्य वनस्पती आणि नियमित देखभाल, यामुळे ती पक्षी-संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात आणि जलाशयाचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणीय मूल्य वाढवतात.

बेटे तयार कशी करावीत?

कृत्रिम बेटे वैज्ञानिक पद्धतीने तयार करावीत. या बेटांच्या निर्मितीसाठी जलाशयातील उथळ भाग (shallow area) निवडणे योग्य असते. हा भाग मानवी हालचाल, बोटींचे मार्ग आणि पाण्याची अचानक वाढ होणाऱ्या भागांपासून दूर असावा. बेट तयार करण्यासाठी माती, वाळू, दगड, खडी किंवा ड्रेजिंगमधील सामग्री वापरून पाण्याच्या पातळीपेक्षा वर उंची ठिकाणी तयार करावा. बेटाचा वरचा भाग स्थिर असावा आणि बाजूंना सौम्य उतार (gentle slope) असावा, ज्यामुळे माती वाहून जाणार नाही. मोठ्या जलाशयांमध्ये एक मोठे बेट करण्यापेक्षा अनेक लहान बेटे तयार करणे अधिक फायदेशीर ठरते. कारण, त्यामुळे विविध पक्षी प्रजातींना आधार मिळतो आणि गद कमी होते.

- एम. श्रीनिवास रेड्डी
(लेखक राज्याच्या वन विभागात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून कार्यरत आहेत.)