आम्ही कोण म्हणोनी काय पुसता?

    06-Apr-2026
Total Views |

तृतीयपंथी व्यक्तींचे जीवन, त्यांचे अधिकार यांची चर्चा सातत्याने समाजामध्ये होत असते. या चर्चेपासून क्रीडा क्षेत्रही वर्ज्य राहिलेले नाही. तृतीयपंथी खेळाडूंच्या महिला गटात समावेश करण्याला अनेक खेळांनी विरोध केल्याने, या खेळाडूंसमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर सध्या स्वत:ची ओळख सिद्ध करण्याबरोबर जपण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागणार आहे...

मोदी सरकारने ‌‘तृतीयपंथी सुधारणा विधेयक‌’ अलीकडेच संमत केले. या विधेयकामुळे तृतीयपंथींना सन्मानाने जीवन जगण्याचा आधिकार, कायदेशीर संरक्षण आणि सामाजिक स्वीकृती मिळेल. त्याचबरोबर त्यांची ओळख निश्चित होईल. एकीकडे ही बातमी वाचत असताना, त्याचवेळी लॉस एंजेलिस 2028च्या ‌‘ऑलिम्पिक‌’पासून तृतीयपंथी खेळाडूंना महिला गटात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे ‌‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघा‌’ने घोषित केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. हे वाचल्यावर तृतीयपंथी खेळाडूंना पडलेला प्रश्न क्रीडा संघटनांना विचारावा, असेच माझ्या मनात येते. खेळांमध्ये आजपावेतो फक्त दोनच गट असतात, महिला गट आणि दुसरा पुरुष गट. अशा स्थितीत मग आम्ही कोण? आमची गणना नेमकी कोणत्या गटात करायची? महिला, खुला गट; की अजून आमच्यासाठी ‌‘तृतीय गट‌’ स्थापन करणार? ‌‘आम्ही कोण म्हणोनी काय पुसता‌’ नक्की ठरवा काहीतरी पक्के. आमचे भविष्य अधांतरी का? असे अनेक विचार जगभरातील तृतीयपंथी खेळाडूंच्या मनामध्ये आले असतील. आचार्य अत्र्यांनी ‌‘केशवकुमार‌’ या नावाने लिहिलेली एक प्रसिद्ध विडंबन कविता, अनेकांनी वाचली असेल. ‌‘केशवसुत‌’ अर्थात, कृष्णाजी केशव दामले यांच्या मूळ गंभीर ‌‘आम्ही कोण म्हणोनी काय पुसता‌’ या कवितेच्या विडंबनामध्ये, अत्र्यांनी उत्तम दर्जाची विनोदनिर्मिती साधली होती. आज आपण त्यांच्या स्मृतींना नमन करून, त्यांच्या त्या कवितेच्या शीर्षकाचा केवळ मराठी संदर्भ लेखासाठी घेत आहोत.

तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी व्यक्ती आपल्याला जशा दैनंदिन जीवनात आढळतात, तशाच प्रकारच्या व्यक्ती क्रीडा क्षेत्रातही असतात. अनेकदा क्रीडांगणावर, ‌‘आम्ही कोण म्हणोनी काय पुसता?‌’ हा प्रश्न, त्यांना पदोपदी भेडसावत असतो. त्यांना स्वतःची ओळख देण्याचा प्रसंग सतत येत असतो. तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी व्यक्ती म्हणजे असा समाज, ज्यांची लिंगओळख जन्माच्या वेळी ठरवलेल्या लिंगापेक्षा (पुरुष किंवा स्त्री) वेगळी असते. तृतीयपंथी व्यक्ती आपली ओळख स्वतः ठरवतात. ट्रान्स-महिला (पुरुष म्हणून जन्म; पण स्त्री म्हणून जगणे) किंवा ट्रान्स-पुरुष (स्त्री म्हणून जन्म; पण पुरुष म्हणून जगणे) हे त्यांच्यातील प्रकार आहेत. क्रीडा क्षेत्र आणि नोकरीमध्ये अशा तृतीयपंथी व्यक्तींचा समावेश असतो आणि त्याची काही उदाहरणे आपण अनेकदा बघतो देखील. क्रीडा क्षेत्रातील तशा व्यक्ती पाहण्याआधी एकाचे उदाहरण पाहूया आणि मगच क्रीडा क्षेत्राकडे वळूया. पोलीस दलात तशी एक व्यक्ती माझ्या ऐकण्यात आली होती. कोल्हापूरचे नितीन कडूकर हे पहिले तृतीयपंथी ‌‘पीएसआय‌’ झाले.

तृतीयपंथी व्यक्तींनी हळूहळू क्रीडा क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. परंतु त्यांना अजूनही सन्मानजनक समावेशासाठी मोठाच संघर्ष करावा लागतो आहे. क्रीडा क्षेत्रात अलीकडे ‌‘बायलॉजिकल मेल ट्रान्सजेंडर पर्सन‌’ वगैरे चर्चा सातत्य्याने होत असतात. लॉस एंजेलिस 2028च्या ‌‘ऑलिम्पिक‌’पासून, केवळ शरीर आणि मनाने महिलाच असलेल्या खेळाडू क्रीडाप्रकारातील महिला गटात स्पर्धा करू शकतील, असे ‌‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती‌’ने एका नवीन धोरणात जाहीर केले. यामुळे तृतीयपंथी महिला खेळाडूंसाठी असलेले, क्रीडा क्षेत्रातील दरवाजे जवळपास बंदच झाले आहेत.

वर्षभरापूवची एक बातमी मध्यंतरी माझ्या वाचनात आली होती. त्यात ‌‘इंग्लंड हॉकी संघटने‌’ने तृतीयपंथी खेळाडूंवर बंदी जाहीर केल्याचे म्हटले होते. तसेच, यापुढे हॉकी स्पर्धांचे वगकरण ‌‘महिला‌’ आणि ‌‘खुला‌’ अशा दोन गटांमध्ये केले जाणार असून, यातील खुला गट हा सर्वांसाठी खुला असेल, यामुळे तृतीयपंथी आणि नॉन-बायनरी खेळाडूंना त्यात मुक्तपणे सहभागी होता येईल. मात्र, त्यांना ‌‘महिला‌’ गटामध्ये स्पर्धा करण्यास मनाई असल्याचे प्रसिद्ध निवेदनात म्हटले होते. हॉकीमध्ये ताकद, सहनशक्ती, वेग आणि प्रवेग यांसारख्या शारीरिक क्षमतांची आवश्यकता असते. त्यामुळेच हॉकी हा एक लिंग-प्रभावित खेळ मानला जातो.

गेल्या वर्षभरात इतर अनेक क्रीडा संघटनांनीही त्यांच्या धोरणांमध्ये बदल केला आहे. ‌‘पॅरिस-2024 ऑलिम्पिक‌’ आणि ‌‘पॅरालिम्पिक‌’ खेळांदरम्यानही, तृतीयपंथी वाद अधिकच चर्चेत आलेला दिसतो. गेल्याच महिन्यात ‌‘लेडीज प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन‌’ आणि ‌‘युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशन‌’ यांनीही नवीन नियम लागू केले असून, जे महिलांसाठी असलेल्या स्पर्धांमधील सहभाग जन्मतः स्त्री असलेल्या किंवा पुरुष वयात येण्यापूव लिंगबदल केलेल्या खेळाडूंपुरते मर्यादित करतात. ‌‘लॉन टेनिस असोसिएशन‌’नेदेखील डिसेंबरमध्ये आपले नियम बदलले आहेत. तर ॲथलेटिक्स, सायकलिंग, जलतरण आणि इतर खेळांमध्येही, अशाच प्रकारची बंदी लागू करण्यात आली आहेत.

‌‘या ऑल‌’ : ‌‘या ऑल‌’ या मराठी आणि इंग्रजी शब्दांचा सरळसरळ अर्थ काढला, तर ‌‘या साऱ्यांनो, या रे या‌’ थोडक्यात, ‌‘साऱ्यांनी या‌’ असा होतो. ज्या देशात लोकांच्या चेहऱ्यावर लगेचच नाराजी उमटते, जिथे त्यांची खिल्ली सहजपणे उडवली जाते, त्यांना वाळीत टाकणे, धमकावणे, त्यांच्याशी भेदभाव करणे आणि त्यांना त्रास देणे अशा तृतीयपंथी समुदायाबद्दल खरी जागरूकता अजूनही, हवी तेवढी दिसूनच येत नसते. अशा परिस्थितीत ईशान्य भारतात दूरवर वसलेल्या या समुदायासाठी मणिपूरमधील ‌‘या ऑल‌’ नावाच्या एका संस्थेने, हे तृतीयपंथींबाबत 2022मध्येच प्रयत्न केल्याची बातमी माझ्या वाचनात आली होती.

लैंगिक अल्पसंख्याकांसाठी वापरली जाणारी ‌‘क्विअर‌’ ही एक इंग्रजी परिभाषा. ज्या समाजाला लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स, आणि एसेक्स्युअल अशा अनेक प्रकारच्या संज्ञांनी संबोधण्यात येते. अशा ‌‘क्विअर‌’ समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, या समाजाचे सदस्य अविरतपणे लढा लढत आहेत. त्याला बळ देण्यासाठी स्वतःही याच समुदायाचा एक भाग असलेल्या आणि सद्दाम हंजाबम यांनी स्थापन केलेल्या ‌‘या ऑल‌’ या संस्थेने, खेळाच्या माध्यमातून या लोकांना एकत्र आणण्याचा आणि त्यांना एक सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला केवळ ‌‘ट्रान्स-पुरुष फुटबॉल संघ‌’ तयार करून, ‌‘या ऑल‌’ने विविध पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक ‌‘क्विअर‌’ खेळाडूंना एकत्र आणण्याचे काम केले आहे. हे खेळाडू खेळाच्या आवडीने प्रेरित होऊन, नियमितपणे सामन्यांमध्ये सहभागी होतात. या कल्पनेचा उगम या वस्तुस्थितीतून झाला की, ईशान्य भारतातील बहुतांश तृतीयपंथी लोकांना सुरक्षित जागा उपलब्ध नाहीत. आधार मिळवण्यासाठी यातील बहुतांश लोक देशाच्या इतर भागांमध्ये स्थलांतर करतात. परंतु, ज्या तरुण-तरुणींना स्थलांतर करणे शक्य नसते, त्यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण असते. म्हणूनच, आम्ही एक अशी संस्था सुरू केली, जिथे लोक एकत्र येऊन आपल्या समस्यांवर चर्चा करू शकतील, असे त्या संस्थेच्या हंजाबम यांनी एका क्रीडा मासिकाच्या मुलाखतीत सांगितले. फुटबॉलवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच, ‌‘या ऑल‌’ दरवष ‌‘ईशान्य क्विअर गेम्स‌’चेदेखील आयोजन करते.

तृतीयपंथी सर्रासपणे खेळू शकत नाहीत. खेळ आणि खेळाडू सर्वत्र आहेत; पण तृतीयपंथी का खेळत नाहीत याचा कोणी विचारही करत नाही. अनेक तृतीयपंथी लोकांची खेळाच्या मैदानावर खिल्ली उडवली जाते आणि त्यामुळे ते आपली ओळख उघड करून खेळत नाहीत, असे हंजबाम कबूल करतात.

ट्रान्स-पुरुषांचा संघ नियमितपणे साप्ताहिक सराव करतो. यांच्यासाठी सर्वसाधारण प्रशिक्षकही येऊन त्यांना प्रशिक्षण देतात, त्यांच्या फिटनेस आणि खेळाच्या शैलीमध्ये मदत करतात. या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर निधीसंकलनही केले जाते, जेणेकरून दूरवरून येणाऱ्या तृतीयपंथी खेळाडूंना प्रवास भत्ता देता येईल. तसेच स्पर्धांदरम्यान अल्पोपाहार देण्यासारख्या मूलभूत गरजांसाठीही आम्ही या पैशांचा वापर करतो, असे ते स्पष्ट करतात. इतकेच नाही, तर संयुक्त राष्ट्रांनीही या संस्थेला मान्यता दिली आहे. कारण, ते तृतीयपंथी समाजात बदल घडवण्यासाठी काम करत आहेत.

‌‘या ऑल‌’चे फुटबॉलपटू आशा करतात की, लवकरच तृतीयपंथी लोकांसाठीही खेळाची एक स्वतंत्र श्रेणी उपलब्ध होईल, जेणेकरून तेही मुक्तपणे स्पर्धा करू शकतील. मात्र, सध्या त्यांच्याबद्दलच्या समाजाच्या जुन्या विचारांशी लढा देणे आणि हळूहळू; पण सातत्याने ही कथा बदलून, त्यांना आज आणि दररोज अभिमानाने जगता यावे, हा त्यांचा रोजचा संघर्ष आहे. आता येऊ आपण एकत्र आणि क्रीडा क्षेत्रात ‌‘आम्ही कोण म्हणोनी काय पुसता?‌’ हा प्रश्न त्यांना न पडो आणि भारताचा ध्वज फडकवण्याची संधी त्यांनाही मिळो, ही आपली शुभेच्छा देत या लेखाला येथे स्वल्पविराम देऊ.

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयामप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704