नंदिताची पुन्हा एकदा नवी सुरुवात, लग्न करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

    06-Apr-2026
Total Views |

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ आणि तितक्याच प्रभावी अभिनयामुळे ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नंदिता पाटकर (Nandita Patkar) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिच्या आयुष्यातील नवी सुरुवात. नंदिताने विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. नंदिताने नाट्यदिग्दर्शक विपुल महागावंकर (Vipul Mahagaonkar) यांच्यासोबत लग्न केलं असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

विपुल महागावंकर हे नाव सध्या मराठी रंगभूमीवर लक्ष वेधून घेत आहे. ‘पै पैशाची गोष्ट’ आणि ‘उध्वस्त धर्मशाळा’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत त्यांनी नाटकाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि हळूहळू दिग्दर्शनात स्वतःची छाप उमटवली. अंतर्मुख स्वभावामुळे व्यक्त होण्यासाठी त्यांनी नाटकाची वाट निवडली, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांच्या ‘ते’ या एकांकिकेलाही राज्यस्तरावर सन्मान मिळाला होता.


दुसरीकडे, नंदिता पाटकर हिचा अभिनयप्रवासही तितकाच उल्लेखनीय आहे. रंगभूमीपासून सुरुवात करत तिने चित्रपटांमध्ये स्वतःची मजबूत ओळख तयार केली. एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाने तिच्या करिअरला मोठी दिशा दिली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं आणि तिला फिल्मफेअर मराठी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं.

यानंतर खारी बिस्किट, बाबा, लालबागची राणी आणि पाणी अशा अनेक चित्रपटांमधून तिने आपली अभिनयाची ताकद सिद्ध केली. ‘खारी बिस्किट’मधील भूमिकेसाठी तिला ‘झी चित्र गौरव’ पुरस्कारही मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत नंदिताने तिच्या पहिल्या लग्नाबद्दलही स्पष्टपणे बोलत त्या काळातील आव्हानं सांगितली होती. वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जात तिने स्वतःला सावरलं आणि नव्याने उभं राहण्याचा निर्णय घेतला. आता वयाच्या ४२ व्या वर्षी नंदिताने आयुष्यातील नव्या टप्प्याला सुरुवात केली असून, तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.